बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 07
  4. »
  5. मागोवा-२००७
Written By वेबदुनिया|

लोकशाहीची 'आशा' निमाली

- अभिनय कुलकर्णी

NDND
काहींची नावे खऱोखरच त्यांना किती शोभतात. बेनझीर हे नावही असेच. बेनझीर या शब्दाचा अर्थ आहे, अतुलनीय. जिच्याशी तुलनाच होऊ शकणार नाही अशी. बेनझीरला हे किती लागू होतंय नाही? जेथे बुरखा काढणेही पाप असे समजल्या जाणाऱ्या अत्यंत कट्टरवादी मुस्लिम देशाची ती पहिली महिला पंतप्रधान. लष्करशाहीच्या वरवंट्याखाली सतत दडपल्या गेलेल्या देशाला लोकशाही मार्गावर आणण्याचा वसा घेतलेली महिला आणि म्हणूनच पाकमधील सध्याची अशांत परिस्थिती पाहता तिच्या हातीच सत्ता सोपवली तर देश सावरू शकेल असा लोकांमध्ये विश्वास निर्माण करणारी रणझुंजार नेता.

पित्याचा हत्यारा झिया उल हकशी लढणारी, नवाझ शरीफ यांना आव्हान देणारी आणि लष्करी वर्दीतल्या मुशर्रफ यांच्या विरोधात उभी ठाकलेली बेनझीर. तिचा मृत्यूही अगदी तिच्या नावासारखाच झाला. कुणाशी तुलना न करता येण्यासारखा. पंतप्रधानपद भूषवलेल्या कुणाही महिला नेत्याला असा मृत्यू आल्याचे ऐकिवात नाही.....

बेनझीर म्हणजे पठाणी सौंदर्य. सिंध प्रांतातील वडिल आणि सिंधी-कुर्दीश कूळ असणारी आई अशी सरमिसळ असणाऱ्या आई-बापांची ही अतिशय देखणी कन्या. गोरापान चेहरा. चष्म्यातून बोलणारे डोळे आणि बोलण्यात जाणवणारा ठामपणा...बेनझीर यांची ही पहिल्यांदा जाणवणारी वैशिष्ट्य.

बेनझीर राजकारणात अपघाताने नाही शिरली. अगदी ठरवून शिरली. तेही राजकारणी पित्याची- झुल्फिकार अली भुट्टो यांची हत्या झाली असतानाही.....

भुट्टो घराणे पाकिस्तानच्या राजकारणात गांधी-नेहरू घराण्यासारखे प्रसिद्ध. बेनझीरचे वडिल झुल्फिकार अली भुट्टो सत्तरच्या दशकात पाकिस्तानचा राज्यशकट चालवत होते. विशेष म्हणजे लष्करी वरवंट्याखाली असलेला पाकिस्ताना त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात लष्करमुक्त होता.

अशा झुल्फिकार अली भुट्टो यांची बेनझीर ही कन्या. त्यांचा जन्म २१ जून १९५३ मध्ये पाकिस्तानातील सिंध प्रांतात झाला. कराचीत प्राथमिक शिक्षण झालेल्या बेनझीर यांनी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत धाव घेतली. तेथे हार्वड व ऑक्सफोर्ड विद्यापीठात त्यांनी उच्च शिक्षण घेतले.

पित्याचा निर्घृण खून
बेनझीर पित्याचा राजकीय वारसा चालविण्यासाठी तयार होत असतानाच पाकचे लष्करप्रमुख झिया उल हक यांनी १९७७ मध्ये बंड करून भुट्टो यांचे सरकार उलथवले. सत्ता ताब्यात घेऊन त्यांनी भट्टो यांना तुरूंगात टाकले. त्यानंतर बंडखोर राजकीय नेते अहमद रझा कसुरी यांची हत्या केल्याच्या आरोपावरून त्यांना दोन वर्षांनी फाशी देण्यात आली. त्यानंतर बेनझीर यांनाही अटक करण्यात आली. त्यानंतरची त्यांची पाच वर्षे तुरूंगातच गेली. हा काळ तिने अतिशय धैर्याने काढला.

पाकिस्तान पीपल्स पार्टीची स्थापना
त्यावेळी उपचारासाठी बाहेर येण्याच्या बहाण्याने त्यांनी लंडन गाठले. तेथे त्यांनी पाकिस्तान पीपल्स पार्टीची (पीपीपी) स्थापना केली आणि झियांविरोधात आघाडी उघडली. त्यानंतर त्या १९८६ मध्ये पाकिस्तानात परतल्या. योगायोग काय असतो पहा. ज्या झिया उल हक यांनी बेनझीरच्या वडिलांना फासावर लटकावले त्यांचेच विमानात बॉम्बस्फोट होऊन निधन झाले. त्यानंतर पाकिस्तानात लष्करमुक्तीची आणि स्वातंत्र्याची हवा खेळू लागली. अशाच वातावरणात झालेल्या निवडणुकीत निवडून येत बेनझीर देशाची पहिला महिला पंतप्रधान बनल्या. लोकशाही मार्गाने झालेली ही पाकमधील पहिली निवडणूक.

पंतप्रधानपदाची कारकिर्द
पण बेनझीर यांची ही कारकिर्द जेमतेम वीस महिने टिकली. बेनझीर यांचे पती असीफ अली झरदारी यांच्यावर व पर्यायाने बेनझीरवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि त्यांचे सरकार बरखास्त करण्यात आले. त्यांच्यानंतर झिया उल हक यांचे शिष्य नवाझ शरीफ सत्तेत आले. पण १९९३ मध्ये झालेल्या निवडणुकीत पुन्हा एकदा बेनझीर निवडून आल्या. पण पुन्हा तीन वर्षांनंतर भ्रष्टाचाराच्याच आरोपावरून त्यांचे सरकार बरखास्त करण्यात आले.


आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप
सरकारी पैशाचा गैरव्यवहार केल्याचा बेनझीर व त्यांच्या पतीवर आरोप होता. त्यामुळे लोकांचा बेनझीरवरील विश्वास उठू लागला. अर्थात झरदारी यांच्यावरील १८ पैकी एकाही आरोपात ते दोषी ठरले नाही. पण दहा वर्षे ते तुरूंगात होते. अखेर पुराव्याअभावी त्यांना २००४ मध्ये जामीन मिळाला.

बेनझीरने आपल्यावरील आरोप राजकीय हेतूंनी प्रेरीत असल्याचे सांगून ते फेटाळून लावले होते. १९९९ मध्ये बेनझीर यांना एका खटल्यात दोषी ठरविण्यात आले. त्यानंतर मग याच वर्षी बेनझीर स्वतःच्या मर्जीने देश सोडून निघू गेल्या होत्या. आपली तीन मुले व पतीसमवेत त्या दुबईत रहात होत्या.

राजकीय विजनवास
नवाझ शरीफ यांना हटवून मुशर्रफ सत्तेवर आल्यानंतर बेनझीर यांचे पाकमध्ये आणे अनिश्चितच बनले होते. पण मुशर्रफ यांनी लष्करी वर्दी त्यागण्याचे ठरविल्यानंतर पाकमध्ये पुन्हा लोकशाहीचे वारे वहायला लागतील, असे चित्र होते. म्हणूनच बेनझीर आठ वर्षांच्या विजनवासानंतर पुन्हा पाकमध्ये परतल्या होत्या. अर्थातच शरीफ यांना पाकमध्ये परतल्यानंतर आल्यापावली परत पाठविणाऱ्या मुशर्रफ यांनी बेनझीर यांच्याशी समझोता करार केला होता. त्यामुळे बेनझीर आल्यानंतर त्यांनी कुठलाही विरोध केला नाही. त्यांच्यावरील आरोपही मागे घेण्यात आले होते. बेनझीर यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान होता यावे यासाठी घटनेतही तशी दुरूस्ती करण्यात आली होती. त्याचवेळी बेनझीर यांना एकूणच मिळणारा पाठिंबा पहाता त्याच सत्तेवर येतील असे चित्रही दिसत होते.

पण बेनझीर यांचे पाकिस्तानातील स्वागत एका आत्मघातकी स्फोटानेच झाले. यात शंभराहून अधिक जण मरण पावले होते. बेनझीर यांची वाट बिकट होती, याची कल्पना तेव्हाच आली होती. त्यांना मारण्याचे प्रयत्न त्यानंतरही झाले. अगदी आजच पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाने राजकीय व धार्मिक नेत्यांवर हल्ल्याची भीती वर्तवली होती. त्यासाठी सुरक्षा यंत्रणांनाही सजग केले होते. पण अखेर हल्लेखोरांनी त्यांचा वेध अखेर घेतलाच.

लोकशाहीची आशा....
बेनझीर इतर पाकिस्तानी नेत्यांप्रमाणे धर्मांध नव्हत्या. त्यांचे शिक्षणही अमेरिकेत झाले असल्याने तेथील खुलेपणा त्यांच्या विचारातही आला होता. त्या पुन्हा सत्तेवर आल्या असत्या तर पाकिस्तानातील धर्मांध शक्ती कमी झाल्या असता असा लोकांना विश्वास होता. त्यांच्या काळात भारत-पाक संबंधातही सुधारणा झाली होती. कट्टरवादी शक्तींच्या त्याही विरोधात होत्या. म्हणूनच लाल मशिदीवर मुशर्रफ यांनी केलेल्या कारवाईचे त्यांनी समर्थन केले होते. म्हणूनच त्याही कट्टरपंथीयांच्या बंदुकीचे लक्ष्य होत्या. अखेर प्रयत्नांती कट्टरपंथीयांनी त्यांचे लक्ष्य साधले. पण त्यामुळे लोकशाहीची ज्योत प्रज्वलित करून ती तेवत ठेवण्याची आशा जिच्याकडून ठेवता येईल, अशी ज्योती मात्र निमाली.

भुट्टो कुटुंब आणि मृत्यूचे थैमान
बेनझीरचे वडिल झुल्फिकार अली भुट्टो यांना झिया उल हक यांनी फासावर लटकवल्यानंतर भुट्टो कुटुंबात अनैसर्गिक मृत्यूचे सत्रच सुरू झाले. बेनझीरला एक मुर्तझा नावाचा भाऊही होता. पण पित्याच्या मृत्यूनंतर तो तत्कालीन साम्यवादी अफगाणिस्तानात पळून गेला. तेथे त्याने झिया उल हक यांच्या विरोधात एक अतिरेकी संघटना स्थापन केली. अफगाणिस्तानातून तो मध्यपूर्वेतील अनेक देशातही गेला होता. १९९३ मध्ये निर्वासित राहून त्याने पाकिस्तानात निवडणूक लढवली. त्यात तो निवडूनही आला. पण पाकमध्ये परतल्यानंतर त्याची रहस्यमयरित्या हत्या करण्यात आली. बेनझीरचा दुसरा भाऊ शहानवाझ हाही राजकारणात होता. पण तो हिंसाचारी राजकारणी नव्हता. पण त्याचाही १९८५ मध्ये फ्रांसमध्ये रहस्यमयरित्या मृत्यू झाला होता. आता या साखळीत बेनझीरचाही समावेश झाला आहे.