शेअर बाजारासाठी निराशादायक वर्ष
- नृपेन्द्र गुप्ता
सन 2007 शेअर बाजारासाठी चांगलेच लाभदायक होते. बाजाराच्या निर्देशांकात वाढ होत होती. सामान्य गुंतवणूकदारही शेअर बाजाराकडे आकर्षित होत होते. नवनवीन विक्रम बाजारात निर्माण होत होते. यामुळे काहींनी पैसे उधार घेऊन किंवा कर्ज काढून गुंतवणूक केली. परंतु, 2008 सुरू होताच त्यांना मोठमोठे धक्के बसायला सुरूवात झाली. 25 हजारापर्यंत निर्देशांक जाईल अशी अपेक्षा करणार्यांची स्वप्ने भंग पावली. वर्षाच्या सुरवातीला 21 हजारापर्यंत गेलेल्या निर्देशांकाने सात हजारापर्यंत नीचांकी पातळी गाठली. बाजारात रिलायन्स पॉवरच्या आईपीओचा मोठा बोलबाला झाला. परंतु, त्यात गुंतवणूक करणार्यांचा मोठा अपेक्षाभंग झाला. सतत विक्रमाच्या चर्चेत असणार्या बाजारातील मोठमोठ्या कंपन्यांचे शेअर धडाधड कोसळू लागले. रिलायन्स इंफ्रा, रिलायन्स कम्यूनिकेशन आणि भेल यांच्यासारखे प्रमुख शेअर मोठ्या प्रमाणावर कोसळले. वर्षाच्या सुरवातीला रिलायन्स इन्फ्राचा शेअर 2631 रुपयांवर गेला होता. तो डिसेंबरपर्यंत 618 पर्यंत खाली आला. आर्थिक मंदीचा फटका: 1929
नंतर आलेल्या सर्वात मोठ्या आर्थिक मंदीचा फटका अमेरिकेतील शेअर बाजारास बसला. अमेरिकेतील बाजार पडताच जगातील सर्वच बाजारावर त्याचा परिणाम झाला. अनेक मोठ्या ब्रोकरेज कंपन्यांना आपल्या कर्मचार्यांमध्ये कपात करावी लागली. सेंसेक्स या वर्षी 58.3 टक्के खाली आला. आशियात सर्वांत खराब कामगिरी करणार्या बाजारात भारतातील शेअर बाजाराचाही समावेश आहे. शेअर बाजारातील या परिस्थितीमुळे अनेक राष्ट्रांनी आर्थिक पॅकेज जाहीर केले असून त्याचा परिणाम सन 2009 मध्ये दिसणार आहे.आयपीओ : आयपीओंसाठी हे वर्ष चांगले गेले नाही. रिलायन्स पॉवरचा आयपीओ आल्यानंतर भारतीय शेअर बाजार घसरला. गुंतवणूकदारांना बोनस देण्याच्या घोषणेनंतर रिलायन्स पॉवरच्या शेअर्सला मागणी आली नाही. रिलायन्स पॉवरची परिस्थिती पाहून दुसर्या बलाढ्य कंपन्यांनीही आपले आयपीओ बाजारात आणले नाही.
विदेशी गुंतवणूकदार : सन 2008 मध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली. यामुळे शेअर बाजारात नवनवीन विक्रम निर्माण झाले. परंतु, त्यानंतर बाजार घसरल्याने विदेशी गुंतवणूकदारांनीही काढता पाय घेतला. विदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर शॉर्ट सेलिंग केले.विदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीमुळे बाजार जास्तच घसरला. जगातील सर्वांत मोठ्या दोन कंपन्या लेहमॅन ब्रदर्स आणि मेरील लिंचने दिवाळखोरी जाहीर केल्याने गुंतवणूकदार जास्तच घाबरले. विदेशी गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक काढून घेतली. म्युच्युअल फंड : शेअर बाजारातील जोखमीमुळे सामान्य गुंतवणूकदार म्युच्युअल फंड कंपन्यांकडे आकर्षित झाला होतो. कमी जोखमीमध्ये चांगल्या परताव्याचा दावा करणार्या कंपन्या बाजार घसरताच अडचणीत आल्या. जेव्हा बाजार 15 ते 20 हजारादरम्यान होते तेव्हा म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून गुंतवणूक करणार्यांचे मोठे नुकसान झाले. काही फंड 70 टक्क्यांपर्यंत खाली आले. बहुतेक कंपन्यांनी एसआयपीवर बंदी आणली. म्युच्युअल फंडामध्येही होणार्या विक्रीमुळे सेबीने क्लोज एंडेड फंड्समधून विक्रीवर मर्यादा आणण्यासाठी कठोर उपाय केले. बँकींग, उर्जा आणि रिअल एस्टेट : मागील वर्ष बँकींग, उर्जा आणि रिअल इस्टेटसाठी खूपच लाभदायक होते. परंतु, हे वर्ष मात्र खूपच निराशाजनक राहिले. या तिन्ही विभागातील शेअर्सची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. रिझर्व्ह बँकेने गृहकर्जावरील व्याजदर कमी केल्यानंतर रिअल एस्टेट क्षेत्रातील शेअर्समध्ये थोडीफार खरेदी झाली. रेपो दरामधील बदलामुळे बँकींग शेअर्सच्या परिस्थितीतही सुधारणा झाली.सामान्य गुंतवणूकदारांना फटका: शेअर बाजार ज्या वेगाने वर गेला त्यापेक्षा जास्त वेगाने खाली आला. यामुळे 15 ते 20 हजार निर्देशांक असतांना गुंतवणूक करणार्यांचे पैसे अर्ध्यापेक्षाही कमी झाले. इन्ट्रा- डे व्यवहार करणार्या गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला. या फटक्यातून बरेचजण सावरु शकले नाही. लहान कंपन्यांमध्ये पैसे लावणार्यांचेही नुकसान झाले तसेच ब्लू चीप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणारेही वाचू शकले नाही. तसेच मनी प्लस सारख्या योजनांमधून मोठ्या प्रमाणावर लालच देणार्या विमा कंपन्याही जमिनीवर आल्या. परत आशा वाढल्या: पंतप्रधान, अर्थमंत्री, रिजर्व्ह बँक आणि सेबी यांच्या प्रयत्नामुळे बाजार सावरण्याची आशा निर्माण झाली आहे. 20 डिसेंबरपर्यंत बाजाराच्या निर्देशांकाने पुन्हा 10 हजारापर्यंत पातळी गाठली होती. शासकीय कर्मचार्यांना मिळालेल्या सहाव्या वेतन आयोगामुळेही बाजाराची परिस्थिती सुधारण्यास मदत झाली. एंकदरीत सन 2008 बाजारासाठी खूपच खराब होते. सन 2007 मधून जो विश्वास मिळाला होता तो 2008 मध्ये कायम राहू शकला नाही. यामुळे आता सन 2009 पासून गुंतवणूकदारांना चांगल्या अपेक्षा आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वृत्तामुळे बाजाराची वाढ सकारात्तमक द्दष्टीने सुरू आहे.