‘सदमा’तील श्रीदेवीची भूमिका विद्या साकारणार?
1983 मधील सदमा चित्रपटात श्रीदेवीने साकारलेली प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेली होती. आतापर्यंत तिच्या गाजलेल्या भूमिकांपैकी महत्त्वाची मानली जाणारी ही पुरस्कारप्राप्त भूमिका विद्या बालनच्या वाटय़ाला येण्याची शक्यता आहे. सदमा चित्रपटाचा रिमेक करण्याची कल्पना लॉईड बापिस्ता यांच्या डोक्यात आहे. चित्रपटात श्रीदेवीने साकारलेली अँम्नेशियाग्रस्त तरुणी लहान मुलीसारखे वर्तन करते. ही व्यक्तिरेखा समर्थपणे पेलू शकेल अशा अभिनेत्रीचा शोध सुरु आहे. विद्या बालनला ही भूमिका देण्याचा त्यांचा मानस आहे.
श्रीदेवीची प्रचंड मोठी चाहती असलेली विद्या बालन हे आव्हान पेलण्यास कचरत आहे. श्रीदेवीने गाठलेली उंची कोणीच गाठू शकत नाही, अशी विद्याची धारणा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विद्या सध्या तीन प्रोजेक्टस्मध्ये व्यस्त आहे. त्याचप्रमाणे रिमेकपेक्षा मूळ पटकथांकडे विद्याचा भर असल्याची माहिती आहे.