बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. लेख
Written By मनोज पोलादे|

चक दे इंडिया....पण हॉकीत

चेन्नईत झालेल्या सातव्या आशियाई करंडकात भारतीय हॉकी संघाने बलाढ्य दक्षिण कोरियाचा 7-2 ने धुव्वा उडवून या करंडकावर नाममुद्रा कोरली. एकीकडे भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडविरूद्ध नामुष्कीजनक पद्धतीने हरत असताना दुसरीकडे भारतीय हॉकी संघ मात्र दृष्ट लागेल असा खेळ खेळत होता. स्पर्धेत सातही सामन्यात अपराजित राहात भारताने हा करंडक पटकावला. स्पर्धेतील करंडकावर निर्विवाद हक्क असल्याचेच जणू भारताने दाखवून दिले.

भारताने प्रतिस्पर्धी संघांविरूद्ध 57 गोल नोंदवून आतापर्यंत कोणत्याही संघाच्या तुलनेत सर्वाधिक गोल नोंदवले. भारताच्या विजयी मोहिमेतील धडाका मोठमोठ्या संघाच्या उरात धडकी भरविणारा होता. आकडेवारीकडे पाहिले तरी ते सहज सिद्ध होईल. चीनवरी 1-0 या निसटत्या विजयाने भारताने करंडकाकडे वाटचाल सुरू केली. भारताचा विजयरथ कोरीया 3-2, बांगलादेश 6-0, थायलंड 16-0, श्रीलंका 20-0 या संघांना चिरडत पुढे चालला. उपांत्य सामन्यात जपानला 4-1 ने पराभूत करून अंतिम सामन्यापर्यंत धडक मारली.

अंतिम सामन्यातील ‍आकडेवारीवरून भारताच्या खेळाडूंकडे किती आत्मविश्वास होता ते दिसून येते. अंतिम सामन्यात न डगमगता खेळ केला. अचूक क्रॉसेस, मैदानावरील चपळ हालचाली व संघाचे हित सर्वस्व मानणारे पासेस. या सर्वांचा अतिशय सुंदर मिलाफ दिसून आला. पूर्ण क्षमतेनिशी सांघिक भावनेने खेळ केल्यास काय होते हे या संघाने दाखवून दिले. हॉकीचा महान वारसा असणारा भारतीय हॉकी संघ काय जादूई करिष्मा करू शकतो याचेच ते प्रा‍त्याक्षिक होते.

भारतीय संघाच्या अपराजित रहाणाऱ्या मोहिमेची सुरूवात करणार्‍या प्रभुज्योतच्या अतुल्य कामगिरीवर इग्नेस तिर्कीने आपल्या जादुई खेळाने कळस चढविला. रविवारच्या सामन्यात दहा हजाराहून अधिक प्रेक्षकांच्या जल्लोषाच्या साथीने चेन्नईतील मेजर राधाकृष्णन स्टेडियममध्ये भारताने स्वप्नातीत विजय नोंदवून भारतीय हॉकीच्या सुवर्णकाळाची पहाट उगवल्याचा संदेश तमाम हॉकी रसिकांना दिला आहे. त्यादिवशीचे संध्याकाळचे वातावरण हॉकीच्या जादुने भारलेले होते.

भारताच्या शिवेंद्र सिंगने खेळाच्या तिसर्‍या मिनिटास गोल नोंदवून भारतीय संघासाठी प्रार्थना करणार्‍या प्रेक्षकांना आनंदाची पहिली भेट दिली. हा... हा... म्हणता खेळाच्या मध्यांतरापर्यंत भारतीय हॉकीने बलाढ्य दक्षिण कोरीयावर 3-1 ने आघाडी घेतली. कोरीयाने यापूर्वी 1994 मध्ये आशिया करंडकातील अंतिम सामन्यात भारतास रोखले होते. तो वचपा भारतीयांना या सामन्यात काढला. या सामन्यात भारतीय हॉकी संघाने आक्रमक खेळ करत कोरीयास डोके वर काढण्यास संधीच दिली नाही.

आक्रमक खेळ व डावपेचांची मैदानवरील तंतोतंत अंमलबाजावणी करत कोरीयास निष्प्रभ करून टाकले. मध्यांतरानंतर कोरीयाने आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला मात्र अनुनभवी व कमजोर मानल्या जाणार्‍या भारतीय मध्यम फळीने कोरीयास गोल करण्याची संधीच दिली नाही. गोलरक्षकानेही जीव ओतून खेळ करत गोलपोस्टमध्ये चेंडू जाणार नाही याची दक्षता घेतली.

आशिया करंडकातील भारताची आजपर्यंची कामगिरी देदिप्यमान म्हणता येईल अशी नसली तरी अनुल्लेख करता येईल अशीही नाही. सात वेळा झालेल्या आशिया करंडकात भारताने दोनदा अजिंक्यपद मिळवले आहे. तब्बल चारदा (1982, 85, 89, 94) उपविजेतेपद मिळविले होते. 1999 मध्ये तिसर्‍या स्थानावर समाधान मानावे लागले होते. या स्पर्धांत दक्षिण कोरीया व भारतीय संघात दोनदा लढती झाल्या. त्यामध्ये 1994 मध्ये कोरीयाने भारतीय संघावर 1-0 मात करत करंडकावर आपले नांव कोरले होते. रविवारी भारताने कोरीयावर विजय मिरवत बरोबरी साधली.

गौरवशाली हॉकी परंपरा
भारताची हॉकी परंपरा उज्ज्वल आहे. ऑलिम्पिकमध्ये भारताने हॉकी या एकमेव क्रीडाप्रकारात आठ सुवर्ण पदके पटकावली आहेत. त्याकाळच्या भारतीय हॉकी संघाने वर्णन ब्रिटीश, पाश्चिमात्य खेळ समीक्षक, पत्रकार 'जादूई' खेळ असाच करायचे. मेजर ध्यानचंदानी तर भारतीय हॉकीची कीर्ती दाही दिशांना पसरवली. भारतीय हॉकीच्या महान परंपरेच्या र्‍हासास किवा अध:पतनास सुरूवात ती 1960 पासून. भारतीय उपखंडातील आपल्या शेजारी देशानेच त्यास सर्वप्रथम सुरूंग लावला.

पाकच्या रियाउद्दीन अहमद यांची भविष्यवाणी खरी ठरली. रोम येथील ऑलिम्पिकमध्ये पाकने भारतावर 1-0 ने मात करत संघाची विजयी परंपरा खंडीत केली. तोपर्यंत म्हणजे 1928 ते 1956 दरम्यान भारताचे या खेळावर निर्विवाद वर्चस्व होते. हॉकीच्या झळाळत्या सुवर्णकाळात भारताने जागतिक ऑलिम्पिक स्पर्धेत तमाम हॉकी खेळणार्‍या देशांना पराभूत करत सलग 6 सुवर्ण करंडकावर आपले नाव कोरले होते. त्यानंतरही दोन सुवर्णपदके मिळवली. ती 1964 मधल्या टोकीयो व 1980 मधल्या मास्को ऑलिम्पिमध्ये. त्यानंतर भारताच्या हॉकीमध्ये असे क्षण क्वचितच आले. रविवारच्या विजयानंतर असे दिवस पुन्हा येतील असे संकेत दिसताहेत.

चक दे इंडिया
पराकोटीला पोहचलेले क्रिकेट वेड बाजूला सारून आपला राष्ट्रीय खेळ हॉकी आहे, आपणांस हॉकीचा वैभवशाली इतिहास व गौरवशाली परंपरा आहे, याची तमाम भारतीयांना आठवण करून देतानाच देशभरात राष्ट्रीय खेळाच्या पुनरूज्जीवनासाठी वातावरण निर्मिती करण्यात शाहरूख खान अभिनित चक दे इंडिया चित्रपटाने मोलाची कामगिरी बजावली आहे. चक दे प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसातच भारतीय हॉकी संघाने आशिया करंडक जिंकला हा योगायोग चांगलाच जुळून आला. चक दे ... ने देशातील क्रीडा वातावरणात नवचैतन्य निर्माण करण्याचे काम नक्कीच केले आहे.