मेदवेदेवचा पराभव करून जोकोविच अंतिम फेरीत , सलग 33वा विजय नोंदवला
सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने शनिवारी डॅनिल मेदवेदेवचा पराभव करत अॅडलेड आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. जोकोविचने पुरुष एकेरीचा हा उपांत्य सामना 6-3, 6-4 असा सरळ सेटमध्ये जिंकला. जोकोविचचा ऑस्ट्रेलियातील हा सलग 33वा विजय आहे. 2018 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत तो हायऑन चुंगकडून पराभूत झाला होता.
सामन्यादरम्यान जोकोविचच्या पायाला दुखापत झाली होती, पण त्याचा त्याच्या कामगिरीवर परिणाम झाला नाही आणि तो विजयी झाला. पहिल्या सेटच्या सातव्या गेममध्ये जोकोविच घसरला आणि त्याच्या डाव्या पायाला दुखापत झाली.
जोकोविच वैद्यकीय वेळ काढून या दुखापतीतून सावरला. जोकोविचने सामन्यानंतर सांगितले की, ही गंभीर दुखापत नाही आणि मी अंतिम फेरीसाठी तयार आहे. अंतिम फेरीत जोकोविचचा सामना सेबॅस्टियन कोर्डाशी होणार आहे.
Edited By - Priya Dixit