मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 19 नोव्हेंबर 2022 (14:14 IST)

FIFA वर्ल्डकप 2022 : कतारमध्ये होणारा विश्वचषक 'या' 7 कारणांमुळे ठरणार लक्षवेधी

Qatar World Cup
रविवारपासून (20 नोव्हेंबर) कतार या आखाती देशात FIFA म्हणजेच फुटबॉल वर्ल्डकप सुरू होणार आहे.
ही स्पर्धा आतापर्यंतची सर्वात आगळीवेगळी ठरणार आहे, असं म्हटलं जात आहे. अर्थात, चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही अर्थांनी हे बोललं जात आहे. मात्र, कोणत्या गोष्टींमुळे यंदाची ही वर्ल्डकप स्पर्धा गाजणार आहे?
 
1) दैनंदिन सामन्यांची संख्या वाढवली
यंदाच्या स्पर्धेत दैनंदिन सामन्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. त्यामुळे 1978 च्या अर्जेंटिना वर्ल्डकप स्पर्धेनंतर यंदाचा हा वर्ल्डकप सर्वात कमी कालावधीची दुसरी स्पर्धा असेल.
 
स्पर्धेतील सलामीचा सामना 20 नोव्हेंबर रोजी होईल. तर अंतिम सामना 18 डिसेंबर  रोजी खेळवण्यात येणार आहे. म्हणजे एकूण 29 दिवस ही स्पर्धा चालेल.
 
या स्पर्धेदरम्यान ग्रुप स्टेजमध्ये प्रतिदिन चार सामने खेळवण्यात येतील. ग्रीनवीच प्रमाणवेळेनुसार, रोज सकाळी 10, दुपारी एक, सायंकाळी 4 आणि सात असे चार सामने दररोज खेळवले जातील.
 
पूर्वी बहुतांश वर्ल्डकप स्पर्धांमध्ये रोज जास्तीत जास्त तीन सामने खेळवले जात असत.
 
ग्रुप स्टेज आणि लास्ट सिक्सटीन या फेरींमध्येही कोणताही मोकळा दिवस ठेवण्यात आलेला नाही. ग्रुप स्टेजच्या पुढच्याच दिवशी नॉकआऊट राऊंट (बाद फेरी) सुरू होईल.
 
या स्पर्धेत राजधानी दोहाच्या उत्तरेकडील अल बायत स्टेडियम तर दक्षिणेकडील अल जैनब स्टेडियममधील अंतर सर्वाधिक आहे. हे 64 किलोमीटरचं अंतर कापण्यास वाहतुकीची अडचण आली नाही तर 50 मिनिटे लागतात.
 
2) डिस्पोजिबल स्टेडिअम
कतारच्या फिफा वर्ल्डकपसाठी 8 मैदाने बांधण्यात आली आहेत. त्यापैकी 7 मैदाने ही डिस्पोजेबल आहेत. म्हणजेच ती वापर झाल्यानंतर नष्ट करण्यात येतील. तसंच त्याच्या इतर वस्तूंचा पुनर्वापर करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे.
 
सातही स्टेडियममधील खुर्च्या हटवण्यात येतील. त्यानंतर स्टेडियम पूर्णपणे नष्ट केलं जाईल.
 
हटवण्यात येत असलेल्या खुर्च्यांची संख्या दोन लाखांच्या घरात आहे. या खुर्च्या काढून विकसनशील देशांना त्या देण्यात येतील, असं आयोजकांनी स्पष्ट केलं आहे.
 
स्पर्धा पार पडल्यानंतर केवळ अहम बिन अली स्टेडियम हेच त्याठिकाणी राहील.
 
3) राहण्यासाठी सोयी-सुविधांचा अभाव
खरं तर कतार हा देश लोकसंख्या किंवा आकाराच्या बाबतीत जगातील पहिल्या 100 देशांमध्येही समाविष्ट नाही.
 
त्यामुळे साधारणपणे इतर वर्ल्डकपमध्ये केल्या जाणाऱ्या सोयीसुविधा इथेही उपलब्ध करण्यात काही अडचणी आहेत.
 
मार्च महिन्यात कतारमध्ये केवळ 30 हजार हॉटेल रुम होते. दुसरीकडे या स्पर्धेसाठी जगभरातून सुमारे 15 लाख फुटबॉलप्रेमी येतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
 
आयोजकांच्या मते, आणखी 1 लाख 30 हजार खोल्यांची व्यवस्था ते करू शकतील. यामध्ये फॅन्स व्हिलेज, टेंट आणि मेटल केबिन यांमध्ये 9 हजार बेड्स, अपार्टमेंट आणि व्हिलामध्ये 60 हजार खोल्या, हॉटेलांमध्ये 50 हजार खोल्या निर्माण केल्या जातील. याव्यतिरिक्त समुद्रकिनाऱ्यावर थांबवून ठेवलेल्या दोन जहाजांवरही 4 हजार खोल्यांची सोय करण्यात येईल.
 
म्हणजे, काही फुटबॉल चाहत्यांना शेजारच्या ओमान, सौदी अरेबिया आणि UAE अशा देशांमध्ये थांबावं लागू शकतं. त्यानंतर विमान पकडून त्यांना सामने पाहण्यासाठी यावं लागेल.
 
ओमान देशाने मस्कत ते दोहादरम्यान रोज 24 विशेष उड्डाणांसाठी परवानगी दिली आहे. तसंच फ्री व्हीसाची सुविधाही त्यांनी उपलब्ध करून दिली आहे.
 
4) पायाभूत सुविधांची निर्मिती
FIFA वर्ल्डकप 2022 चं यजमानपद मिळाल्यानंतर कतारने आपल्या देशात मोठ्या संख्येने पायाभूत सुविधांची निर्मिती केली.
 
स्टेडियमशिवाय 100 नवे हॉटेल बनवण्यात आले. नवे रस्ते आणि एक मेट्रो लाईनचं बांधकाम करण्यात आलं.
 
लुसैलमध्ये शेवटच्या स्टेडियमच्या चारही बाजूंना एक नवंच शहर वसवण्यात येत आहे.
 
स्टेडियम आणि प्रशिक्षण केंद्रांचंच बजेट सुमारे 5.3 अब्ज पाऊंड (सुमारे 48 हजार 816 अब्ज रुपये) आहे.
 
5) मोठ्या संख्येने तिकीट विक्री
राहण्याची पुरेशी सोय नसली तरी तिकीट विक्रीला चाहत्यांना चांगला प्रतिसाद आहे.
 
ऑक्टोबरपर्यंत 28.9 लाख तिकीटांची विक्री झाली. याचा अर्थ आजवरच्या कोणत्याही वर्ल्डकपपेक्षा यंदाच्या स्पर्धेला गर्दी जास्त असणार आहे.
 
6) बिअरची व्यवस्था
कतारमध्ये एका बिअरची किंमत 10 ते 15 पाऊंड (सुमारे 1000 ते 1500) इतकी आहे. पण ती तुम्ही कुठून विकत घेऊ शकता, याच्यावर खूप सारे निर्बंध आहेत.
 
कतारमध्ये परवानाधारक हॉटेल, बार आणि रेस्टॉरंटमध्ये बिअर सहज उपलब्ध आहे.
 
त्याशिवाय फॅन झोनमध्ये 500 मिली बिअर 1125 रुपयांना मिळेल.
 
मात्र निश्चित ठिकाणांव्यतिरिक्त इतर ठिकाणी बिअर पिता येणार नाही. इतर ठिकाणी बिअर पिताना आढळल्यास 6 महिन्यांचा तुरुंगवास किंवा 700 पाऊंड (67 हजार 934 रुपये) इतका दंड भरावा लागू शकतो.
 
7) स्पर्धेतील कार्बन उत्सर्जन
स्पर्धेदरम्यान 36 लाख कार्बन डाय ऑक्साईडचं उत्सर्जन होणार आहे. रशियामध्ये हेच उत्सर्जन 21 लाख टन इतकं होतं.
 
स्थलांतरित मजूरांच्या मृत्यूवरून टीका
गेल्या वर्षी गार्डियनने यासंदर्भात एक बातमी छापली होती.
 
त्यानुसार, कतारला FIFA वर्ल्डकपचं यजमानपद मिळालं, तेव्हापासून म्हणजेच 2010 ते 2020 या कालावधीत त्यासाठी राबणाऱ्या भारतीय, पाकिस्तानी, नेपाळी, श्रीलंकन आणि बांगलादेशी अशा सुमारे 6500 स्थलांतरित कामगारांचा मृत्यू झाला.
 
मात्र, ही आकडेवारी दिशाभूल करणारी असल्याचं कतार सरकारने म्हटलं.
 
अम्नेस्टी इंटरनॅशनल या मानवाधिकार संस्थेच्या मते, त्याचा नेमका आकडा समोर येऊ शकला नाही कारण, गेल्या दहा वर्षांत कतार प्रशासन स्थलांतरित कामगारांच्या मृत्यूंचा तपास करण्यास पूर्णपणे अयशस्वी ठरलं आहे.
 
Published By- Priya Dixit