गुरूवार, 10 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 16 नोव्हेंबर 2022 (08:52 IST)

कोल्हापूरचा दिव्यांग जलतरणपटू स्वप्निल पाटीलला अर्जुन पुरस्कार

क्रीडानगरी कोल्हापुरातील दिव्यांग जलतरणपटू स्वप्निल संजय पाटील हा देशाच्या क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेचा समजला जाणाऱ्या अर्जुन पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकुर यांनी सोमवारी स्वप्निलसह देशातील विविध खेळांमधील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अत्युच्य कामगिरी केलेल्या 25 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर केले. 2018 साली इंडोनेशियामध्ये एशियन पॅरागेम्सअंतर्गत झालेल्या जलतरण स्पर्धेत स्वप्निलने 100 मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात रौप्य, 100 मीटर फ्रिस्टाईल प्रकारात कांस्य आणि 400 मीटर फ्रिस्टाईल प्रकारात कांस्य पदक मिळवले होते. या बहुमोल कामगिरीची दखल घेऊन स्वप्निला अर्जुन अ‍ॅवॉर्ड जाहीर करण्यात आला आहे.
 
येत्या 30 नोव्हेंबरला राष्ट्रपती भवनात पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणाऱ्या या पुरस्काराचे मानचिन्ह (अर्जुन अ‍ॅवॉर्ड), 15 लाख रुपये, प्रमाणपत्र असे स्वरुप आहे. 2006 साली कोल्हापुरात सायकलीवरुन मित्राकडे जात असताना स्वप्निलचा अपघात झाला होता. यात डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली. यातूनच त्याच्या पायाला अपंगत्व आले. पुढील सहा महिने त्याला धड चालताही आले नाही. पण फिजीओथेरपी करत करत त्याने स्वतःला सावरले. शिक्षण घेत भवानी जलतरण तलावात पोहोण्याच्या सरावाला सुरुवात केली. हाच सराव स्वप्निलचे जीवन बदलून टाकणारा ठरला.

प्रशिक्षक श्रीकांत जांभळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वप्निल तयारीचा जलतरणपटू बनला. त्याने 2008 साली झालेल्या दिव्यांगांच्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग मिळवत पहिले राष्ट्रीय सुवर्ण पदक मिळवले. या पदकामुळे त्याला 2011 साली अमेरिका येथे झालेल्या आयवॉस ज्युनिअर वर्ल्ड गेम्समधील जलतरण स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली. या स्पर्धेतही त्याने भारताचे प्रतिनिधीत्व करताना 50 व 100 फ्रिस्टाईल व 50 व 100 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये प्रत्येकी 1 अशी चार सुवर्ण पदके मिळवून अमेरिकेत भारताचे नाव रोशन केले.

Edited By- Ratnadeep Ranshoor