1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 9 फेब्रुवारी 2023 (08:31 IST)

महाराष्ट्र केसरी’ जिंकण्याची खूणगाठ मी मनाशी बांधलीय - सिकंदर शेख

Maharashtra Kesari
हमाली करणाऱ्या माझ्या वडीलांच्या डोक्यावर महाराष्ट्र केसरी किताबाच्या अपेक्षेचे ओझे आहे याची मला जाणीव आहे. महाराष्ट्राच्या लाल मातीतील महाराष्ट्र केसरी हा मानाचा किताब जिंकून आई वडीलांचे स्वप्न पूर्ण करण्याची खूणगाठ मी मनात बांधली आहे. भूतकाळ विसरून नव्या जिद्दीने मी वाटचाल सुरू केली आहे. तमाम मायबाप कुस्तीशौकिनांचे प्रेम माझ्या पाठीशी असल्याने मी निश्चित ध्येय साध्य करीन असा विश्वास महान भारत केसरी सिकंदर शेख याने व्यक्त केला.
 
तरुण भारतशी सिकंदर मनमोकळेपणाने आणि दिलखुलासपणे बोलत होता. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत झालेल्या वादाचा लवलेश देखील त्याच्या बोलण्यात जाणवला नाही. कुस्तीच्या आखाड्यात जात-धर्म पाहिली जाते का? या प्रश्नावर तो म्हणाला महाराष्ट्रातील कुस्तीला मोठा वारसा आणि परंपरा आहे. लोकांनी कुस्तीवर भरपूर प्रेम केले आहे यामुळेच कुस्ती आजही लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मैदानात कुस्तीशौकिन पैलवानाचा खेळ बघतात त्याची जात पहात नाहीत. उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करणाऱ्या पैलवानाला लोक डोक्यावर घेतात याचा अनुभव मी आजही घेत आहे. पैलवानाला जात आणि धर्म नसतोच कुस्ती हाच आमचा श्वास आणि धर्म आहे. लालमाती ही आमची माता आहे तीने आम्हाला कुशीत आधार दिल्यामुळेच मी इथपर्यंत येऊन पोहचलो आहे. लाल मातीचा पांग फेडण्यासाठीच मी आखाड्यात कष्ट करणार आहे.
Edited by: Ratnadeep Ranshoor