शुक्रवार, 1 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 4 ऑगस्ट 2022 (11:41 IST)

कॉमनवेल्थ 2022: हॉकीमध्ये भारताची कॅनडावर 8-0 ने मात, भारताला पदकाची आशा

hockey
कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने कॅनडावर 8-0 ने मात केली आहे. इंग्लंडच्या तुलनेत भारताने कमी गोल केले आहेत. आता इंग्लंड कॅनडावर विजय मिळवण्यासाठी किमान डझनभर गोल करावे लागतील. तरच भारत दुसऱ्या स्थानावर राहील.
 
भारताला गटात उच्चस्थानी राहणं महत्त्वाचं आहे कारण असं झालं तर त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध उपांत्य फेरीत खेळावं लागणार नाही आणि भारताची पदक मिळवण्याची शक्यता आणखी वाढेल.
 
भारत उच्चस्थनावर राहिला तर त्याला न्यूझीलंडबरोबर खेळावं लागेल. न्यूझीलँड हा दुबळा संघ नसला तरी ऑस्ट्रेलियाशी खेळण्यापेक्षा यांच्याशी खेळणं कधीही फायद्याचं आहे.
 
भारताने या आधी कॅनडावर 2018 च्या वर्ल्ड कपमध्ये आणि 1988 च्या ऑलिम्पिकमध्ये विजय मिळवला होता. तेव्हा भारताने कॅनडाला 5-1 ने पराभूत केलं होतं.
 
2019 मध्ये सुलतान कपमध्येही भारताने कॅनडावर मोठा विजय मिळवला होता. मात्र तेव्हा सातपैकी तीन गोल ग्राह्य धरले नव्हते. त्यामुळे हा विजय आजवरचा सर्वात मोठा विजय आहे.
 
आकाशदीपने सामन्यात आणली रंगत
भारतीय खेळाडू आकाशदीप सिंह गेल्या वर्षी ऑलिम्पिकमध्ये दुखापतीमुळे भाग घेऊ शकला नाही. एकदा संघाच्या बाहेर गेलं की खेळाडूंच्या मनोबलावर परिणाम होतो. मात्र आकाशदीपने या सामन्यात दोन गोल करत रंगत निर्माण केली.
 
इतकंच नाही तर वेगवेगळ्या पद्धतीने मनदीप आणि ललित उपाध्याय यांच्यासाठी गोल करण्याच्या दृष्टीने व्यूहरचनाही तयार केली. त्यामुळे आकाशदीप आता उत्तम खेळतोय हे पाहून चांगलं वाटलं. आकाशदीपने पाचवा आणि आठवा गोल केला. हे दोन्ही गोल अतिशय उत्तम पद्धतीने करण्यात आले.
 
भारतीय फॉर्वर्ड लाईन वर खेळणाऱ्या भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध केलेल्या कामगिरीचा दबाव होता. पण ज्या पद्धतीने भारत खेळला आहे ते पाहता इंग्लंड विरुद्धच्या अपयशातून बाहेर आला आहे असं म्हणायला हरकत नाही.