बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Updated : सोमवार, 18 जानेवारी 2021 (17:28 IST)

'BBC स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर' पुरस्काराचं दुसरं वर्ष

18 जानेवारी 2021 : बीबीसी न्यूजच्या 'इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर' पुरस्काराचं (BBC ISWOTY) वितरण या वर्षीही केलं जाणार आहे.
 
या पुरस्कारासाठी पाच खेळाडूंना नामांकन दिलं जाणार असून 8 फेब्रुवारीपासून तुम्ही तुमच्या आवडत्या खेळाडूला ऑनलाईन मतदान करू शकता.
 
'बीबीसी स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर' पुरस्काराचं हे दुसरं वर्ष आहे. गेल्या वर्षी 8 मार्च रोजी BBC ISWOTY 2019 हा पुरस्कार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू यांना देण्यात आला होता. त्याचप्रमाणे यंदाच्या वर्षीही 'बीबीसी स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर 2020' पुरस्काराची घोषणा 8 मार्च रोजी केली जाणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञ, ज्येष्ठ पत्रकार तसंच बीबीसीचे संपादक पाच खेळाडूंची नामांकनं ठरवली जातील. या खेळांडूंसाठी मतदान करण्याचं आवाहन बीबीसीच्या विविध भाषांच्या वेबसाईट्सवरून तसंच बीबीसी स्पोर्ट्सच्या जगभरातील वाचक-प्रेक्षक आणि क्रीडाप्रेमींना करण्यात येईल. सर्वाधिक मतं मिळवणाऱ्या खेळाडूला 'बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर' म्हणून निवडण्यात येईल.

या वर्षी BBC ISWOTY सोबतच स्पोर्ट्स हॅकेथॉन उपक्रमाचंही आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये विविध भाषांमधील पत्रकारितेचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सहभाग असेल. हे विद्यार्थी भारतातील महिला खेळाडूंबद्दलची माहिती विकिपीडियावर अपडेट करतील.

इंग्रजी, हिंदी, गुजराती, मराठी, पंजाबी, तामीळ आणि तेलुगू भाषांमध्ये या महिला खेळाडूंविषयीची परिपूर्ण माहिती विकिपीडियामध्ये अपडेट करून दिली जाणार आहे. यामुळे या खेळाडूंची महत्त्वाची माहिती सर्वांना उपलब्ध होऊ शकेल. याबाबत अधिक माहिती 8 फेब्रुवारी रोजी दिली जाईल.
 
टीम डेव्ही - डायरेक्टर जनरल, बीबीसी
"बीबीसीच्या इंडियन स्पोर्ट्सवुमन पुरस्काराचं दुसऱ्यांदा आयोजन होत असल्याचा मला अतिशय आनंद वाटतो. महिला खेळाडूंसाठी ही एक सर्वोत्कृष्ट संधी आहे. यामधून महिला खेळाडूंचा सन्मान करण्याची संधी देशातील नागरिकांना मिळणार आहे. या महिला खेळाडूंनी मिळवलेल्या यशाची दखल घेण्यात बीबीसीने पुढाकार घेतला, याचा मला अभिमान वाटतो, " असं बीबीसीचे डायरेक्टर जनरल टीम डेव्ही यांनी म्हटलं आहे.

रूपा झा - भारतीय भाषा प्रमुख, बीबीसी.
"बदल घडवणाऱ्या खेळाडूंकडे लक्ष वेधण्यासाठी बीबीसीने या पुरस्काराचं आयोजन केलं आहे. कोरोना संकटाच्या काळातही अत्यंत कठीण परिस्थितीवर मात करून यश संपादित करणाऱ्या महिला खेळाडूंचा गौरव या पुरस्काराच्या माध्यमातून केला जाणार आहे. बीबीसीच्या या उपक्रमात जगभरातील वाचक-प्रेक्षकांचा सहभागसुद्धा आवश्यक आहे. सर्व वाचक-प्रेक्षकांनी स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयरच्या मतदानात सहभाग नोंदवून आपल्या आवडत्या खेळाडूला मत द्यावं, असं आवाहन मी करते."

BBC ISWOTY 2020 साठीची नामांकनं जाहीर होताच 8 फेब्रुवारी 2020 पासून सर्वांना ऑनलाईन मतदान करता येणार आहे. या पाच खेळाडूंची संघर्षाची कहाणी आपल्याला बीबीसीच्या वेबसाईट्स तसंच सोशल मीडियाच्या पानांवर पाहायला मिळेल. लेख, व्हीडिओ आणि डॉक्युमेंट्रीच्या स्वरूपात बीबीसी आपल्यासाठी या खेळाडूंचा रंजक प्रवास घेऊन येणार आहे. त्यासाठी बीबीसीने स्पोर्ट्स चेंजमेकर या मालिकेचे आयोजनही केले आहे.

गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही क्रीडा क्षेत्रातला जीवनगौरव पुरस्कार देण्यात येईल. क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या महिला खेळाडूला बीबीसीकडून हा पुरस्कार देण्यात येतो. तसंच सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडूलाही इमर्जिंग प्लेयर पुरस्कार देण्यात येणार आहे.
 
गेल्या वर्षी बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू यांना बीबीसी ISWOTY तर माजी धावपटू पी. टी. उषा यांना जीवनगौरव पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. यात आता उदयोन्मुख खेळाडू पुरस्काराचाही समावेश करण्यात आला आहे.