शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Updated : बुधवार, 4 ऑगस्ट 2021 (18:31 IST)

Tokyo Olympic : भारतीय महिला संघाला पराभवाचा धक्का; कांस्यपदकाची लढत खेळणार

ऑलिम्पिक स्पर्धेत पहिल्यांदाच उपांत्य फेरी गाठणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाला अर्जेंटिनाविरुद्ध पराभवाला सामोरं जावं लागलं. अर्जेंटिनाने हा सामना 2-1ने जिंकत दिमाखात अंतिम फेरी गाठली.
 
ऑस्ट्रेलियाविरुद्ध गोल करणाऱ्या गुरजीत कौरने सामना सुरू झाल्यानंतर काही क्षणातच गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली.
 
मात्र अर्जेंटिनातर्फे मारिआ बारिओन्युइव्होने 18व्या मिनिटाला गोल करत बरोबरी करून दिली. मारिआनेच दुसरा गोल करत अर्जेंटिनाला आघाडी मिळवून दिली.
भारतीय संघ अर्जेंटिनाच्या आक्रमणासमोर हताश ठरल्याचं चित्र दिसलं. कांस्यपदकासाठी भारतीय संघाचा आता ब्रिटनशी मुकाबला होणार आहे.
 
भारतीय पुरुष संघाला उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. पुरुष संघ जो टप्पा ओलांडण्यात अपयशी ठरलं तो टप्पा ओलांडण्यासाठी महिला संघ आतूर होता.
 
भारतीय महिला संघ केवळ तिसऱ्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. 1980 मध्ये मॉस्को इथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय महिला संघ पहिल्यांदा क्रीडाविश्वातल्या या सर्वोच्च स्पर्धेसाठी पात्र ठरला.
 
त्यानंतर तब्बल 36 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारतीय महिला संघाला ऑलिम्पिकचे दरवाजे उघडले. मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही. कारण भारतीय महिला संघाला एकही सामना जिंकता आला नाही. गटात तळाशी राहण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली.
यंदाही भारतीय संघाची ऑलिम्पिक मोहिमेची सुरुवात निराशाजनकच झाली. महिला संघाने सलग तीन सामने गमावले.
 
प्रशिक्षक जरोड मार्जिन यांनी संघाच्या कामगिरीवर जोरदार टीका केली होती. खेळाडू एकेकट वैयक्तिक स्वरुपाचं खेळत असून त्यांनी संघ म्हणून खेळायला हवं असं त्यांनी सांगितलं. व्यवस्थापन त्यांना तसं खेळण्यापासून रोखत होतं पण ते वैयक्तिक पद्धतीनेच खेळत होते.
रिओप्रमाणेच भारतीय संघाची पाटी कोरी राहणार असं चित्र असतानाच त्यांनी पवित्रा बदलला. भारताने आधी आयर्लंड आणि नंतर दक्षिण आफ्रिकेला धूळ चारली. या दोन विजयांसह भारतीय संघाने उपउपांत्यपूर्व फेरीत मजल मारली. त्यानंतर भारताने ऑस्ट्रेलियासारख्या दमदार संघाविरुद्ध जिंकण्याचा पराक्रम केला. या विजयासह भारतीय संघाने उपांत्य फेरीत स्थान मिळवलं.
 
अर्जंटिनाने शेवटच्या लढतीत जर्मनीवर 3-0 असा विजय मिळवला. सलामीच्या लढतीत अर्जेंटिनाला न्यूझीलंडविरुद्ध पराभवाला सामोरं जावं लागलं. मात्र त्यानंतर त्यांचा केवळ एका लढतीत पराभव झाला आहे. जर्मनीविरुद्धच्या सामन्यात त्यांनी आक्रमक आणि वेगवान खेळाचं प्रदर्शन केलं होतं. अर्जेंटिनाने याआधीच्या तीन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पदक पटकावलं आहे. पाच वर्षांपूर्वी रिओत त्यांना उपउपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता.
 
भारतीय संघाचे डावपेच
भारतीय संघाला संघ म्हणून एकोप्याने खेळ करावा लागेल जसा त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध केला होता. पेनल्टी कॉर्नर्सचं गोलमध्ये रुपांतर करण्याचं भारतीय संघाचं प्रमाण अतिशय कमी आहे. त्या आघाडीवर भारतीय संघाला बळकट व्हावं लागेल.
 
गुरजीत कौरने सुरेख गोल करत भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली होती. मोठ्या संघांविरुद्ध पेनल्टी कॉर्नरच्या संधी अभावानेच मिळतात. त्यामुळे त्याचं सोनं करावं लागेल.
अर्जेंटिनाचा संघ सुरुवातीपासून जोरदार आक्रमण करतो. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सविताने बचावाची अभेद्य भिंत उभी करत गोलचं आक्रमण रोखलं होतं. अर्जेंटिनाविरुद्ध सवितावर मोठी जबाबदारी आहे. मात्र त्याचवेळी बचावाची ताकद वाढवावी लागेल. ऑस्ट्रेलियाला हरवू शकतो तर अर्जेंटिनालाही चीतपट करू शकतो असा आत्मविश्वास भारतीय संघाला दाखवावा लागेल. कारण ऑस्ट्रेलियाने अर्जेंटिनाला प्राथमिक फेरीत नमवलं होतं. भारतीय संघाने त्याच ऑस्ट्रेलियाच्या संघाला आसमान दाखवत उपांत्य फेरी गाठली आहे.