कुस्ती क्षेत्राला आलेली मरगळ दूर होईल : हिंदकेसरी पै. संतोषआबा वेताळ
Hindikesari Pai santosh aba vetal
गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे कुस्त्या झाल्या नाहीत. या क्षेत्राला एकप्रकारे मरगळ आली होती. मात्र साताऱ्यात होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या माध्यमातून कुस्तीला नवचैतन्य प्राप्त होऊन कुस्तीला आलेली मरगळ दूर होईल, असा विश्वास हिंदकेसरी पै. संतोषआबा वेताळ यांनी तरूण भारतशी बोलताना व्यक्त केला.
पै. संतोषआबा वेताळ म्हणाले की, पै. खाशाबा जाधव यांनी हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये देशाला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून दिले होते. श्रीरंगआप्पा जाधव यांनीही ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला होता. महाराष्ट्र केसरीच्या एकूण 5 गदा सातारा जिल्हय़ातील मल्लांनी आतापर्यंत आणल्या आहेत. सहावी गदा पै. किरण भगत याच्या रूपाने जिल्हय़ाला मिळेल, असा विश्वास आहे. तो नक्कीच सार्थकी ठरेल.
गेली 3 ते 4 वर्षे महाराष्ट्र केसरी स्पर्धा साताऱ्यात व्हावी, असा प्रयत्न करण्यात येत होता. मात्र स्पर्धा पुण्यातच होत होती. देशाचे नेते शरद पवार यांचे सातारा जिल्हय़ावर विशेष प्रेम असल्याने यावर्षी स्पर्धा त्यांनी साताऱ्याला दिली आहे. या स्पर्धेतून कुस्ती क्षेत्राला नवचैतन्य प्राप्त होईल. स्पर्धेतून ऊर्जा घेत गावोगाव मैदाने, आखाडे भरतील. यामुळे गावोगावच्या मल्लांना उदरनिर्वाहाचे साधन प्राप्त होणार आहे. कारण गेल्या दोन वर्षात निर्बंधांमुळे मैदानेच न भरल्याने मल्लांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे या स्पर्धेच्या माध्यमातून कुस्तीवर आलेले मरगळीचे सावट दूर होईल. या स्पर्धेतून उदयोन्मुख मल्लांना मोठी प्रेरणा मिळेल, असे ते म्हणाले.
महाराष्ट्र केसरीची स्पर्धा आतापर्यंत पुण्याला जास्त वेळा झाली आहे. साताऱ्यात ही स्पर्धा 59 वर्षानंतर होत आहे. कुस्तीतील महत्वाची असणारी ही स्पर्धा साताऱ्यात होणे ही जिल्हय़ासाठी अभिमानाची बाब आहे. सर्वांच्या सहकार्याने साताऱयातील स्पर्धा यशस्वी केली जाईल. या स्पर्धेच्या माध्यमातून कुस्तीला नवी ऊर्जा प्राप्त व्हावी, अशी अपेक्षा असल्याचे पै. संतोषआबा वेताळ यांनी सांगितले.
Photo: Twitter