मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: सातारा , सोमवार, 4 एप्रिल 2022 (07:19 IST)

महाराष्ट्र केसरीसाठी 55 हजार कुस्तीप्रेमींना बसण्याची सोय

येथील छत्रपती शाहु क्रीडा संकुलात होणाऱ्या 64 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेस केवळ दोन दिवस उरले आहेत. तत्पूर्वी आखाडे दि.5 रोजी सकाळी तयार होणे अपेक्षित असल्याने त्या दृष्टीने पाचही आखाडय़ांचे काम अंतिम टप्यात आले आहे. तसेच या कुस्त्या पाहण्यासाठी किमान 55 हजार कुस्तीप्रेमी येतील असे अपेक्षित धरुन त्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या आखाडय़ांच्या कामकाजाची व शाहु क्रीडा संकुलातील नियोजनाची पाहणी सातारचे प्रांत मिनाज मुल्ला यांनी रविवारी केली. दरम्यान, खेलो इंडियाच्या कार्यालयाचेही उद्घाटन दुपारी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
 
साताऱ्यात दि. 5 पासून 64 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे रण सुरु होणार आहे. तत्पूर्वी ज्या आखाडय़ात कुस्त्या होणार आहेत ते आखाडे तयार करण्याचे काम अंतिम टप्यात आले आहे. सातारा तालुक्यातील पश्चिम भागातून लाल माती आणून ती कसून या आखाडय़ात वापरण्यात येत आहे. रविवारी दुपारी आखाडय़ात माती टाकण्याचे काम सुरु होते. तसेच व्यासपीठही तयार करण्यात आले आहे. संयोजनकर्ते गेल्या सात दिवसांपासून दररोज नियोजनात व्यस्त आहेत. रविवारी दुपारी सातारचे प्रांत मिनाज मुल्ला यांनी पाहणी केली. दरम्यान, खेलो इंडियाच्या कार्यालयाचे उद्घाटन यावेळी करण्यात आले.
 
याबाबत माहिती देताना जिल्हा तालिम संघाचे दीपक पवार म्हणाले, मैदानाची तयारी सुरु आहे. वरच्या गॅलरीत 35 हजार लोक बसतील. इतर गॅलऱ्या तयार करण्यात आल्या असून तेथे 6 हजार अशी 55 हजार लोकांची बसण्याची सोय करण्यात आली आहे. 55 हजार लोक कुस्त्या पाहू शकतील अशी सोय करण्यात आली आहे. चौथ्या आणि पाचव्या दिवशी बघायला येणारे कुस्ती शौकिनांची संख्या वाढणार आहे. दि.8 आणि दि.9 रोजी चांगल्या कुस्त्या पहायला मिळणार आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन पालकमंत्री बाळासाहेब पाटील, राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते दि. 5 रोजी होणार आहे. सकाळी 7 ते 9 व सायंकाळी 5 ते रात्री 9.30 दरम्यान कुस्त्या सुरु राहतील. दुपारी कुस्त्या होणार नाहीत. सातारा शहरात 59 वर्षानंतर महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत आहे. त्याचा आनंद घ्या. चुकवू नका, असे आवाहन त्यांनी केले आहे.