अपेक्षा संपन्न पंचवार्षिक योजनेची...
- केदार पाटणकर
|
|
खुदाला गवाह ठेवून दाढी वाढवली तरी सुरकुत्या लपणार नाहीत. मग, पाच वर्षं जाऊ दिली. 'मृत्युदाता' चा फुगा पहिल्याच आठवड्यात फुटला. समजलं, शाहरूख, अजय, सुनील, अक्षय मस्त खेळत आहेत. 'जाहिरात आणि मी? झोप झाली नाही का?' हा प्रश्न विचारता विचारताच 'बीपीएल'ची जाहिरात केली. तेव्हाच जोर का झटका धीरेसे लागला होता. आपलं काय होणार, भीती कुठेतरी होतीच. करोडपतीनं तारलं. नवं रूप सा-यांना आवडलं. तेच तेच करून उपयोग होत नाही, अक्षय, सैफची पिढी आपल्याला पाहत नाही पण तेच ते करण्याची खुमखुमी जातही नाही अशा कात्रीत.
|
|
|
पण कळलंच नाही. मेहरा, देसाईंनी वापरून घेतलं. मुखर्जी, चोप्रांनी वेगळ्या भूमिकांसाठी क्वचित विचारलं. निहलानींनीशी अगदी चुकामूक होता होता भेट झाली. बेनेगलांशी लपाछपी सुरू आहे. फसवणूक स्वतःची झालीच. प्रेक्षकांचीही.
|
प्रत्येक सिनेमात बाप-मुलाचे गहिवरते प्रसंग. इकडचा उचलून तिकडे ठेवावा. पण चाललंय... नक्कीच काही वेगळं चाललंय. काहीतरी नवलाई आहे. 'लक्ष्य' नक्कीच काही वेगळं देऊन गेला. 'चीनी कम' असूनही चवदार होता. 'ब्लॅक' ने अभिनय उजळवला. मनापासून दाद मिळवून गेला. प्रेक्षक 'निशःब्द' झाले. 'पहेली' सुटली. हे खरं वेगळेपण. थोडं उशिराच असलेलं...
पण मध्येच 'बब्बन' बनून स्वतःचा 'गोपाळ' केला. घाव चाहत्यांच्या 'वर्मी' लागला. सिनेमानं 'राम' म्हटला. मोटारसायकली चालवून, उंचावरून उड्या मारून सुपरस्टारपद मिळतं. अभिनेतेपद नाही. नसीर, ओम पुरी, कमल हासन चे नुसते एक फुटी चेहरेच समोरच्याला खाऊन टाकतात. अख्खे सहा फूटही कधी कधी थिटे पडतात.
वाढदिवसाच्या शुभेच्छा तर आहेतच. बघायला मिळेल एखादा कादंबरीकार?, एखादा वकील जो केवळ दमदार संवाद टाकेल आणि केस जिंकून देईल?, आणखी कुणीही जो केवळ मुद्राभिनयाने खिळवून ठेवेल? मिळेल का 'एखादा मैंने गांधी को नही मारा' साऱखा एखादी भूमिका? मासेसला खूप खूष केलं. आता क्लासेसचं भरपूर अपील घेऊऩ जाईल. तशा भूमिकांची सुरूवात तर झालेलीच आहे. पोटेन्शिअली अजून पाच वर्षं नक्कीच आहेत. ती आणखी अभिनयसंपन्न होतील का? तरूण दिग्दर्शक खास भूमिका लिहून घेत आहेत, हे खरं असेल तर व्हायलाच पाहिजेत..
बघू या. 'टाईम मशीन' काय करतंय, 'अल्लादीनचा दिवा' काही प्रकाश पाडतोय का?
वेल डन टिल डेट. स्टिल समथिंग मोअर...
