आशुतोष गोवारीकर
कला व व्यावसायिकतेची सांगड घालणारा दिग्दर्शक
आगामी काळात ज्याच्याकडून खूप अपेक्षा ठेवायला हरकत नाही अशा दिग्दर्शकांमध्ये आशुतोष गोवारीकर आहे. ऑस्करपर्यंत धडक मारलेला लगान, समीक्षक व अभिजात प्रेक्षकांची वाहवा मिळवलेला स्वदेस हे दोन हीट चित्रपट त्याच्या गाठीला आहेत. त्याच्या चित्रपटात कलात्मक व कमर्शियल सिनेमाचे सुरेख कॉम्बिनेशन आढळते. पण हे ठिकाण गाठेपर्यंत त्याच्या आयुष्यात केवळ संघर्ष व चाचपडणं एवढंच होतं. सुरवातीला अभिनता म्हणून. 'सर्कस, सीआयडी' या मालिकांमधून त्याने काम केले. पण नियतीला बहुदा त्याचं दिग्दर्शक होणं पसंत असावे. दिग्दर्शक म्हणून त्याचा 'पहला नशा' हा चित्रपट आमीर खान नायक असूनही फ्लॉप ठरला. यानंतर बाजीही चालला नाही. याच काळात त्याने आमीरला लगानची कथा एेकवली. अठराव्या शतकात ब्रिटिशांशी भारतीयांनी खेळलेला क्रिकेटचा सामना ही वन लाईन स्टोरी. वेगळ्या भूमिकांच्या शोधात असलेल्या आमीरला कथा खूप आवडली. एवढेच नव्हे तर चित्रपटाची निर्मिती स्वतः करण्याचे त्याने जाहीर केले. त्यासाठी कंपनीही स्थापन केली. वास्तविक हा मोठा धोका होता. कारण कथा अठराव्या शतकातील होती. त्यातही चित्रपटभर क्रिकेट लोकांच्या किती पचनी पडेल याचा अंदाज नव्हता. शिवाय महिलावगर् चित्रपटापासून दूर राहण्याचा धोका होता. पण निर्मितीवर हात राखून खर्च न करता हा चित्रपट त्यांनी तयार केला. त्यानंतर जे झालं तो इतिहास आहे. गदरसारखा भडक चित्रपट स्पर्धेत असूनही लगानला मोठे यश मिळाले. समीक्षकांनीही कौतुक केले. नंतर चित्रपटाने थेट आॅस्करची वारी केली. सलाम बॉम्बेनंतर आॅस्करपर्यंत पोहचणारा हा केवळ दुसरा चित्रपट. भलेही त्याला आॅस्कर मिळाले नाही, पण यानिमित्ताने हिंदी चित्रपटांचा दर्जा उंचावला आहे, हे भान आले. यानंतर आशुतोष गोवारीकर हे अस्सल मराठी नाव हिंदी चित्रपटसृष्टीत अदबीने घेतले जाऊ लागले. लगाननंतर आलेल्या 'स्वदेस'ने निराश केले नाही. अमेरिकेतून आलेल्या मूळ भारतीय तरूणाला दिसणारा भारत आणि त्याला या भारताची झालेली जाणीव असा विषय आशुतोषने अतिशय छान हाताळला. विषयाची संयत, नेमकी आणि वेधक हाताळणी हे त्याचे वैशिष्ट्य. शिवाय कलात्मक हाताळणी करताना कमर्शियल चौकटही त्याच्या ध्यानात असते. त्यामुळे ते चित्रपट तिकिट खिडकीवरही यशस्वी ठरले आहेत. पॅकेज म्हणून चित्रपट देताना तो सर्व बाबींचे योग्य कॉम्बिनेशन देतो. त्यामुळे व्यावसायिक यशही मिळते. सध्या आशुतोष त्याच्या महत्त्वाकांक्षी अकबर जोधा या चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे.
आशुतोष गोवारीकरचे चित्रपट- जोधा अकबर (आगामी), स्वदेश, लगान, बाजी, पहला नशा.