चिरतारूण्याचे दुसरे नाव हेमामालिनी
वाढदिवस विशेष
|
तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊन तिच्याविषयीच्या काही मनोरंजक बाबी.
जन्मापूर्वीच नाव
जन्मापूर्वी कुणाचं नाव ठेवल्याचं कधी ऐकलंय? नाही ना? कारण मुलगा होणार की मुलगी हेच माहिती नसताना नाव कसं ठेवणार? पण हेमामालिनीच्या आई जया चक्रवर्ती यांना मुलगीच होईल हा पक्का विश्वास होता. म्हणूनच तिचं नाव हेमामालिनी ठेवायचं हे त्यांनी पक्कं केलं होतं. गर्भार असताना त्यांनी घरात दुर्गा, सरस्वती, लक्ष्मी यांची चित्रे लावली होती. त्यांना स्वतःला खरे तर नर्तक व्हायचे होते. पण ते शक्य झालं नाही. म्हणून मुलीने तरी नर्तकी व्हावे अशी त्यांची तीव्र इच्छा होती. अर्थात पुढे मुलीने ती पूर्ण केली. १६ ऑक्टोबर १९४८ ला हेमामालिनीचा जन्म झाला. गोरीपान दिसणारी, गब्दूल दिसणारी ही मुलगी पुढे जाऊन ड्रिमगर्ल बनले असे कुणालाही त्यावेळी वाटले नसते.
ड्रिमगर्लचे आगमन...
हिंदी चित्रपटसृष्टीत नायिकांना विविध विशेषणे जोडली आहेत. देविकाराणींना फर्स्ट लेडी ऑफ इंडियन स्क्रीन, नर्गिस यांना लेडी इन व्हाईट, मीनाकुमारी ट्रॅजेडी क्वीन, सायराबानू ब्युटी क्वीन. या मांदियाळीत हेमामालिनी अतिशय योग्य असे म्हणजे ड्रीमगर्ल हे विशेषण मिळाले. स्वप्नात येणारी मोहक ड्रिमगर्ल. हेमामालिनीने रूपेरी पडद्यावर पदार्पण केले ते शोमॅन राजकपूरबरोबर. चित्रपट होता सपनोंका सौदागर. आणि साल होते १९६८.
|
बडबडी बसंती
दक्षिण भारतीय अभिनेत्री हिंदी चित्रपटसृष्टीला नविन नाहीत. पद्मिनी, वैजयंतीमाला, वहिदा रहमान, मीनाक्षी शेषाद्री, श्रीदेवी, जयाप्रदा अशी तारकांची मांदियाळीच आहे. पण यातही सर्वाधिक काळ रूपेरी पडद्यावर चमकणारी अभिनेत्री एकमेव म्हणजे हेमामालिनी. आता तिच्या मुली चित्रपटात काम करत असतानाही तीही काम करते आहे. (आणि मुलींपेक्षा चांगली दिसतेय.) नुकत्याच आलेल्या 'लागा चुनरी में दाग' मध्येही ती आहेच. तिला पाहिल्यावर आजही लोक टाळ्या वाजवतात, हे तिच्या लोकप्रियतेचे लक्षण.
संसदेत खासदार असलेली हेमामालिनी पण लोकांच्या मनात आजही बसंती म्हणूनच आहे. तिची 'शोले'मध्ये चालणारी अखंड बडबड आजही धमाल उडवते. म्हणूनच कोणत्याही प्रचारसभेत गेल्यानंतर हेमामालिनीला बसंतीचे संवाद म्हणण्याचा आग्रह केला जातो.
हेमामालिनी - फारशी माहित नसलेली
* राजकपूरच्या सत्यम शिवम सुंदरममध्ये सुरवातीला हेमामालिनीला घेण्याचे ठरले होते. पण अंगप्रदर्शन करणारी भूमिका असल्याने तिने नकार दिला.
* माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना सीता और गीता हा चित्रपट एवढा आवडला होता, की त्यांनी तो अनेकदा बघितला आहे.
* हेमामालिनी सौंदर्य राखण्यासाठी आजही योग व व्यायाम करते.
* आठवड्यात दोन उपवास ती करते. शुक्रवार हा त्यातला एक दिवस.
* मुलगी इशाच्या बाबतीत कोणता चित्रपट स्वीकारायचा कोणता नाही, हा निर्णय हेमामालिनी घेतात.
* कांजीवरम साड्या, शेवंतीचा गजरा आणि दागिने या हेमामालिनीच्या आवडीच्या बाबी आहेत.
