मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. टी-20 विश्वचषक 2024
Written By
Last Updated : मंगळवार, 25 जून 2024 (12:26 IST)

सुपर 8 - अफगाणिस्तानची सेमिफायनलध्ये धडक

Afghanistan, Bangladesh, India, Australia
वेस्ट इंडिजच्या अर्नोस व्हेल स्टेडियमवर आज (25 जून) सकाळी इतिहास घडला आहे. या मैदानावर इंग्लंडचा माजी खेळाडू जोनाथन ट्रॉट अफगाणिस्तानच्या रहमानुल्ला गुरबाजला खांद्यावर घेऊन फिरत होता, वेस्ट इंडिजचा माजी खेळाडू ड्वेन ब्राव्होच्या डोळ्यात अश्रू होते आणि संपूर्ण मैदानात एकच आनंद साजरा केला जात होता, तो आनंद होता अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाने मिळवलेल्या विजयाचा.
 
अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये सुरू असलेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानने बांगलादेशचा 8 धावांनी पराभव केला आणि मागच्या वर्षी एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकात जगज्जेता ठरलेला ऑस्ट्रेलियाचा संघ टी-20 वर्ल्डकपमधून बाहेर पडला आहे.

सुपर-8 फेरीतील शेवटच्या सामन्यांपर्यंत उपांत्य फेरीत कोण पोहोचणार याची उत्सुकता होती आणि अत्यंत चुरशीच्या सामन्यात अफगाणिस्तानने बांगलादेशचा पराभव केला.
 
अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि त्यानंतरच्या 4 तासांमध्ये जे काही घडलं ते केवळ अविश्वसनीय होतं.
 
अफगाणिस्तानची संथ फलंदाजी आणि कर्णधार राशिदची फटकेबाजी
रहमानुल्ला गुरबाज आणि इब्राहिम जादरान या सलामीवीरांच्या जोडीने अत्यंत संथ सुरुवात केली. सुरुवातीला बांग्लादेशच्या गोलंदाजांचा चेंडू चांगलाच उसळी घेत होता त्यामुळे रहमानुल्ला आणि इब्राहिमने अत्यंत सावध फलंदाजी केली. त्यानंतर इब्राहिम बाद झाला आणि अफगाणिस्तानचा डाव आणखीनच संथ झाला.
 
अफगाणिस्तानचा शंभरी तरी पार करेल की नाही अशी शंका वाटत असताना डावाच्या शेवटी अफगाणिस्ताचा कर्णधार राशिद खान फलंदाजीला उतरला आणि त्याने 10 चेंडूत 19 धावांची वेगवान खेळी करत अफगाणिस्तानला 115 धावांचा टप्पा गाठून दिला.
 
आयपीएलमध्ये धावांचे डोंगर बघायची सवय झालेल्या क्रिकेट रसिकांसाठी ही धावसंख्या कमी असली तरी किंगस्टाऊनच्या मैदानावर सरासरी एवढ्याच धावा बनत होत्या. अफगाणिस्तानच्या कमी धावसंख्येमुळे बांगलादेशलाही उपांत्य फेरीत पोहोचण्याची संधी निर्माण झाली होती.
 
लिटन दासची एकाकी झुंज
बांगलादेशला उपांत्य सामन्यात पोहोचण्यासाठी 12.1 ओव्हर्समध्ये 116 धावा काढाव्या लागणार होत्या आणि अफगाणिस्तानच्या नेमकं हेच पथ्यावर पडलं. वेगाने धावा काढण्याच्या नादात बांगलादेशचे फलंदाज एकामागून एक बाद होत गेले आणि अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी सामन्यात पुनरागमन केलं.
 
एका बाजूला फलंदाज बाद होत होते आणि दुसऱ्या बाजूला सलामीला उतरलेल्या लिटन दासने बांगलादेशच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या होत्या. लिटन दास शेवटपर्यंत नाबाद राहिला आणि दुसरीकडे बांगलादेशच्या फलंदाजांमध्ये तंबूत जाण्याची स्पर्धा लागली होती. अफगाणिस्तानच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ 105 धावाच करू शकला.
 
दरम्यान किमान चारवेळा पावसाचा व्यत्यय आला, डकवर्थ लुईसची नियमावली चर्चिली जाऊ लागली पण अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा करत बांगलादेशच्या फलंदाजांना आउट केलं.
 
कर्णधार राशिद खानने 4 ओव्हरमध्ये 23 धावा देत 4 विकेट घेतल्या आणि अफगाणिस्तानचा विजय सुकर केला. तर सामनावीर ठरलेल्या नवीन उल-हकनेही 3.5 ओव्हरमध्ये 26 धावा देत 4 विकेट घेतल्या.
 
आमच्यासाठी हा विजय स्वप्नवत - राशिद खान
विजयानंतर प्रतिक्रिया देताना अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खान म्हणाला की, "मी आज खूप आनंदी आहे. आमच्यासाठी हा विजय स्वप्नवत आहे.
 
वेस्ट इंडिजचा महान खेळाडू ब्रायन लाराने आमच्यावर खूप आधी विश्वास दाखवला होता आणि आम्ही वेस्ट इंडिजमध्ये आलो तेंव्हा त्याने आमच्यासाठी वेलकम पार्टी दिली होती त्या पार्टीत त्याने आमच्यावर दाखवलेला विश्वास आम्ही ढळू दिला नाही. माझ्या देशवासियांसाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे."
 
वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराने याआधीच अफगाणिस्तान उपांत्य फेरीत पोहोचेल असं भाकीत केलं होतं.
 
विजयानंतर अफगाणिस्तानचे खेळाडू, अफगाणिस्तानच्या संघाचं समर्थन करणारे चाहते आणि प्रशिक्षकांच्या डोळ्यात अश्रू होते कारण या संघाने मागच्या वीस वर्षांमध्ये क्रिकेटमध्ये केलेली प्रगती अविश्वसनीय आहे.
 
टी-20 वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत आता 27 जूनला भारतीय वेळेनुसार पहाटे साडेपाच वाजता अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका असा सामना होईल आणि त्याचदिवशी संध्याकाळी भारत विरुद्ध इंग्लंड अंतिम फेरीत जाण्यासाठी एकमेकांशी लढत असतील.