रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आवश्यक माहिती
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 जुलै 2024 (08:08 IST)

नारीशक्ती दूत ॲपवर 'लाडकी बहीण' योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’साठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या योजनेद्वारे सरकार पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देणार आहे.
 
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'साठीचे अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीनं करता येणार आहे.
 
ऑनलाईन अर्ज राज्य सरकारच्या 'नारीशक्ती दूत' या मोबाईल ॲपद्वारे किंवा सेतू सुविधा केंद्रावर जाऊन करता येऊ शकतात.
 
पण, ज्यांना ऑनलाईन अर्ज करता येत नसेल त्या महिला अंगणवाडी केंद्रात जाऊन आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीनं दाखल करू शकतात. नंतर अंगणवाडी सेविका तो अर्ज ऑनलाईन ॲपद्वारे अपलोड करतील. यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रती पात्र लाभार्थी 50 रुपये एवढा प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे.
 
ऑनलाईन अर्ज कसा करायचा?
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला गुगल प्ले-स्टोअर वरुन Narishakti Doot नावाचं राज्य सरकारनं तयार केलेलं ॲप्लिकेशन डाऊनलोड करायचं आहे आणि ते Install करायचं आहे. ते केलं की पुढे या application विषयी माहिती दिलेली दिसेल.
त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्याखालच्या terms and conditions accept करायच्या आहेत. मग लॉग-इन या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर OTP पाठवला जाईल. तो टाकून Verify OTP वर क्लिक करायचं आहे. मग तुमची प्रोफाईल पूर्ण करायची आहे.
 
यात अर्जदार महिलेचं पूर्ण नाव, ई-मेल आयडी टाकायचा आहे. पुढे जिल्हा, तालुका आणि नारी शक्तीचा प्रकार (सामान्य महिला, बचतगट अध्यक्ष/सचिव/सदस्य, गृहिणी, ग्रामसेवक) निवडायचा आहे. मग अपडेट करा पर्यायावर क्लिक करायचं आहे.
 
मग नवीन पेज ओपन होईल. इथं स्क्रीनवर दिसणाऱ्या नारीशक्ती दूत या पर्यायावर क्लिक करायचं आहे. मग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर योजनेचा अर्ज ओपन होईल.
 
यात सुरुवातीला अर्जदार महिलेचं संपूर्ण नाव, पती किंवा वडिलांचे नाव, जन्म दिनांक टाकायचं आहे.
 
पुढे अर्जदाराचा पत्ता, यात जन्माचं ठिकाण- जिल्हा, तालुका, गाव किंवा शहर, ग्रामपंचायत किंवा महापालिकेचं नाव आणि पिनकोड टाकायचा आहे. मग पूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक आधार क्रमांक टाकायचा आहे.
 
शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांचा लाभ घेता का, या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. होय किंवा नाही, असं हे उत्तर द्यायचं आहे. होय असेल तर लाभाची रक्कम तिथं नमूद करायची आहे.
 
पुढे लाभार्थ्यांची वैवाहिक स्थिती निवडायची आहे. अर्जदार महिलेनं अविवाहित, विवाहित,विधवा, परित्यक्त्या, निराधार, घटस्फोटित इ.पैकी योग्य पर्याय निवडायचा आहे.
अर्जदाराच्या बँक खात्याचा तपशील टाकायचा आहे. यात बँकेचे पूर्ण नाव, खातेधारकाचं नाव, खाते क्रमांक आणि IFSC कोड टाकायचा आहे.
 
आपला आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला आहे का, असा प्रश्न तिथं असेल. हो किंवा नाही ते उत्तर निवडायचं आहे. आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक नसेल तर तो लिंक करुन घ्यायचा आहे.
 
यानंतर खाली दिलेली सर्व कागदपत्रं अपलोड करायची आहेत-
 
आधार कार्ड
अधिवास प्रमाणपत्र – 15 वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला यापैकी एक.
उत्पन्न प्रमाणपत्र – अडीच लाखापर्यंतचा उत्पन्न दाखला नसेल तर पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड.
अर्जदाराचे हमीपत्र – अर्जदाराचे स्वयंघोषणा पत्र, त्याचा नमुना खालील Accept हमीपत्र इथं दिलेला आहे. एका कागदावर तुम्ही ते लिहून त्यावर सही व दिनांक टाकून इथं डाऊनलोड करू करू शकता.
बँक पासबुक
अर्जदाराचा फोटो – कॅमेरा सुरू होईल आणि मग फोटो काढायचा आहे.
Accept हमीपत्र या पर्यायावर क्लिक करुन खालील स्वीकारा या पर्यायावर क्लिक आहे आणि मग माहिती जतन करा या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
 
त्यानंतर तुम्ही भरलेली सगळी माहिती तुम्हाला दाखवली जाईल, ती माहिती वाचून फॉर्म सबमिट करा या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
 
त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर OTP येईल, तो टाकला की तुमचा फॉर्म सबमिट होईल. मग मुख्य पेजवर तुमचा अर्ज, त्याची स्थिती दाखवली जाईल. तिथं सर्वेक्षण क्रमांक म्हणजेच अर्जाचा क्रमांक दिला जाईल. जो तुम्हाला अर्जाची स्थिती जाणून घेण्याकरता वापरता येईल.
 
अशाप्रकारे तुमच्या अर्जाची प्रक्रिया पूर्ण होईल.
 
सूचना - ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया नुकतीच सुरू झाल्यामुळे अर्ज भरताना काही वेळेस तुम्हाला अडचण येऊ शकते. माहिती अपलोड होण्यास विलंब लागू शकतो.
 
अर्ज केल्यानंतर पुढे काय?
अर्ज दाखल केल्यानंतर त्याची छाननी प्रक्रिया पार पडेल. त्यानंतर पात्र अर्जदारांची माहिती प्रसिद्ध केली जाईल.
 
या योजनेसाठी राज्य आणि जिल्हास्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे. योजनेसाठीचे अंतिम पात्र लाभार्थी ठरवणे आणि योजनेवर देखरेख ठेवण्याचं काम ही समिती करणार आहे.
 
अर्ज केल्यानंतर पुढे काय होईल, याविषयी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिवेशनात म्हणाले की, “जो आपला जुना डेटाबेस आहे त्याची माहिती घेऊन ज्यांचं अडीच लाखांपेक्षा उत्पन्न कमी आहे, त्यांच्या खात्यात तत्काळ पैसे जमा करण्यात येईल. पण समजा त्यांचे अर्ज जुलै महिन्याच्या शेवटी आले, ऑगस्ट महिन्यात त्यांची प्रक्रिया झाली, तर जुलै-ऑगस्ट दोन्ही महिन्याचे पैसे त्यांना मिळतील.”

Published By- Priya Dixit