बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आवश्यक माहिती
Written By
Last Modified: मंगळवार, 19 जुलै 2022 (21:30 IST)

आता व्होटिंग कार्ड आधार कार्डशी लिंक करा, विशेष मोहीम सुरु

व्होटिंग कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यासाठी 1 ऑगस्टपासून विशेष मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी दिली. ते म्हणाले की, मतदारांची ओळख प्रस्थापित करून मतदार यादीतील नोंदींचे प्रमाणीकरण करणे आणि एकापेक्षा जास्त मतदार संघात किंवा एकापेक्षा जास्त वेळा त्याच मतदार संघात एकाच व्यक्तीच्या नावाची नोंदणी ओळखली जावी, यासाठी विद्यमान मतदान ओळखपत्राशी आधार कार्ड संलग्न करण्यासाठी 1 ऑगस्ट 2022 पासून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
 
या विशेष मोहिमेत मतदान ओळखपत्रासोबत आधार क्रमांक संलग्न करण्यासाठी नमुना अर्ज क्र. 6ब तयार करण्यात आला आहे. हा अर्ज भारत निवडणूक आयोगाच्या आणि मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आला आहे. तसेच मतदारांना ऑनलाईन पद्धतीने आधार क्रमांक भरण्यासाठी ERO Net, GARUDA, NVSP, VHA या माध्यमांवर देखील उपलब्ध असेल. त्याचबरोबर मतदारांकडून छापील नमुना अर्ज क्र 6ब व्दारे आधार क्रमांक गोळा करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे, असेही जिल्हाधिकारी निवतकर यांनी सांगितले.
 
आधार कार्ड नसेल तर?
मतदाराकडे आधार क्रमांक नसल्यास नमुना क्र. 6ब मध्ये नमूद केल्याप्रमाणे त्यांना मनरेगा जॉब कार्ड, फोटोसहित किसान पासबूक, आरोग्य स्मार्ट कार्ड, वाहन परवाना, पॅनकार्ड, NPR अंतर्गत RGI द्वारा दिले गेलेले स्मार्ट कार्ड, पासपोर्ट, फोटोसहित पेन्शन कागदपत्रे, केंद्र/राज्य शासन कर्मचाऱ्याचे ओळखपत्र, आमदार/खासदार यांना दिलेले ओळखपत्र, सामाजिक न्याय विभागाकडील ओळखपत्र या 11 पर्यायापैंकी कोणताही एक दस्तावेज सादर करता येईल.
 
मतदान ओळखपत्राशी आधार क्रमांक संलग्न करण्याच्या या विशेष मोहिमेत मुंबई शहर जिल्ह्यातील जास्तीजास्त मतदारांनी सहभाग घ्यावा, असेही आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी निवतकर यांनी केले आहे.