रविवार, 8 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आवश्यक माहिती
Written By
Last Modified: गुरूवार, 25 जुलै 2024 (17:15 IST)

खते-बियाणे खरेदी करताना 'या' गोष्टी पाहायलाच हव्यात

- श्रीकांत बंगाळे
पाऊस पडला की शेतकऱ्यांची खते आणि बियाणे खरेदीसाठी लगबग सुरू होते. पण, बऱ्याचदा शेतकरी गडबडीत किंवा काही गोष्टींची न बघता खते आणि बियाणे खरेदी करतात. त्यामुळे मग शेतकऱ्यांचं नुकसान होतं. फसवणूक होते.
 
अशीच काही फसवणुकीची प्रकरणं जालना आणि अमरावती जिल्ह्यात समोर आली आहे.
 
काही कंपन्यांची निकृष्ट दर्जाची खतं वापरल्यामुळे पिकांचं नुकसान झालं आहे.
 
त्यामुळे खते-बियाणे खरेदीत फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी कोणत्या गोष्टी बघितल्या पाहिजेत? जाणून घेऊया.
 
शेतकरी काय विचार करतात?
छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न उत्पन्न बाजार समितीत खतं आणि बियाण्यांच्या विक्रीची बरीच दुकानं आहेत. इथं शेतकरी मोठ्या प्रमाणात खतं आणि बियाणे खरेदी करतात.
 
अशाच एका दुकानात माझी भेट शेतकरी कैलास मोकासे यांच्याशी झाली.
 
तुम्ही ज्यावेळेस बियाणे खरेदी करायला येता, तेव्हा बियाण्यांच्या थैलीवर तुम्ही नेमकं काय बघता? या प्रश्नावर ते म्हणाले, “दुकानात गेल्यावर सगळ्यात आधी आम्ही बॅगची किंमत आणि गेल्यावर्षी आपल्याला ती किती रुपयांत मिळाली ते बघतो. याशिवाय हे वाण ज्या शेतकऱ्यानं वापरलं आहे त्याला आम्ही दुकानात यायच्या अगोदर भेटतो. या दोन गोष्टी आम्ही बघत असतो.”
 
कैलास याचं प्रातिनिधिक उदाहरण आहे. शेतकरी दुकानात गेल्यावर ज्या दोन गोष्टी बघतात त्या त्यांनी सांगितल्या. पण, या व्यतिरिक्तही शेतकऱ्यांनी काही गोष्टी बघणं गरजेचं असतं. त्या कोणत्या ते आता पाहूया.
 
बियाणे खरेदी करताना ‘या’ गोष्टी पाहा
एखाद्या दुकानात खतं, बियाणे खरेदी करण्यापूर्वी दुकानदाराकडे त्यासाठीचा परवाना आहे किंवा नाही ते बघणं आवश्यक असतं. महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाकडून हा परवाना दिली जातो. खते आणि बियाणे विक्रीसाठी वेगवेगळे स्वतंत्र परवाने असतात. दर्शनी भागात हा परवाना लावलेला असतो.
 
त्यावर वरच्या बाजूला त्या परवान्याची व्हॅलिडिटी दिलेली असते. त्यावर दुकानदार किती वेळापर्यंत, वर्षापर्यंत खते-बियाणे विक्री करू शकतात याची नोंद असते.
 
बियाण्यांच्या बॅगवर काय काय माहिती बघितली पाहिजे? यावर औरंगाबादमधील गुण नियंत्रण अधिकारी संतोष चव्हाण सांगतात, “ज्यावेळेस तुम्ही अधिकृत विक्रेत्याकडे जाता, त्यावेळी खरेदीनंतर त्यांच्याकडून तुम्हाला पावती दिली जाते. त्या पावतीनंतर संबंधिताचा परवाना क्रमांक नमूद केलेला असतो. त्यानंतर बियाण्याचं वर्णन असतं. ते कोणतं बियाण आणि वाण कोणतं आहे?
 
“कंपनीचं नाव, बॅच नंबर, अंतिम मुदत (expiry date), एमआरपी दिलेली असते. उत्पादकाचं नाव दिलेलं असतं. यामध्ये दाखवलेली एमआरपी आणि बॅगवरील एमआरपी एकच असल्याची खात्री करावी, ती जर जास्त असेल तर संबंधितांबाबत तुम्ही कृषी विभागाकडे तक्रार दाखल करू शकता.”
 
बियाण्याच्या पाठीमागच्या बॅगवर पिकाचं नाव, व्हरायटी कोणती आहे, जर्मिनेशन म्हणजे उगवण क्षमता किती आहे, जनुकीय शुद्धता सुद्धा सांगितलेली असते.
 
पाकिटावर जितकं वजन दिलंय त्याचं प्रत्यक्षात वजन करून बघू शकता. याशिवाय डेट ऑफ पॅकिंग आणि डेट ऑफ एक्स्पायरी दिलेली असते. तेसुद्धा बघावं. त्याची खात्री करावी.
 
खते खरेदी करताना काय काळजी घ्यायची?
बियाण्यांच्या बाबतीत काय काळजी घेतली पाहिजे आता आपण पाहिलं. पण खत खरेदी करतानाही शेतकऱ्यानं विशेष खबरदारी घेतली पाहिजे.
 
चव्हाण सांगतात, "रासायनिक खतांची विक्री पॉश मशीनमधून करण्याची केंद्र सरकारची सूचना आहे. त्यासाठी शेतकऱ्याला स्वत:चं आधार कार्ड सोबत बाळगणं अनिवार्य आहे. ज्यावेळेस पॉश मशिनमधून प्रिंट काढली जाते, त्यावेळेस त्यावर किती रुपयाला खत मिळालं त्या एमआरपीचा उल्लेख केलेला असतो.
 
"उदाहरणार्थ एक डीएपीची बॅग आहे, तिचा दर 1700 रुपये असेल हा दर आणि ई-पॉश मशिनची जी प्रिंट आहे, तिच्यावरचा दर एकच असला पाहिजे. यात जर कुणी दुकानदार जास्त दरानं विक्री करत असेल तर याबाबतची तक्रार तुम्ही कृषी विभागाकडे करू शकता."
 
पण बियाणे किंवा खते खरेदी करण्यापूर्वी हे बघणं का गरजेचं आहे?
 
चव्हाण सांगतात, "ज्यावेळेस आपण बियाणे खरेदी करतो त्यावेळेस आपल्याकडे त्याची पावती, टॅग, लेबल असेल आणि बियाण्यातला काही भाग जतन करून ठेवला असेल तर भविष्यात याच्या उगवण क्षमतेबाबत, जनुकीय शुद्धतेबाबत काही प्रॉब्लेम आला तर कृषी विभागाकडे किंवा ग्राहक मंचात तक्रार दाखल करू शकता. त्यावेळेस या सर्व गोष्टी तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या आहेत."
 
अनधिकृत विक्रेत्याकडून खते खरेदी केली आणि नुकसान झालं तर भरपाई मिळते का? याचं उत्तर देताना कृषी विभागातील अधिकारी सांगतात, खते ही अत्यावश्यक वस्तू म्हणून गणले जातात. अधिकृत परवान्याशिवाय खतांची विक्री करताच येत नाही. अनधिकृत विक्रेत्यांकडून खते घेतली आणि नुकसान झालं तर अनधिकृत मटेरियल म्हणून त्यावर काही कारवाई करता येत नाही, परिणामी भरपाईही मिळत नाही, असं कृषी अधिकाऱ्यांच्या बोलण्यातून समोर येतं.
 
यासोबतच आपल्याला ज्या कंपनीचं खत खरेदी करायचं आहे, नेमकं तेच नाव खताच्या बॅगवर आहे का हेही तपासून पाहायला हवं. त्यात थोडाफार जरी बदल असेल तर कृषी विभागाशी संपर्क साधून त्या खताच्या कंपनीविषयी माहिती घ्यायला हवी. कंपनीचा अधिकृतपणा पडताळूनच खत खरेदी करावं.