गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आवश्यक माहिती
Written By
Last Modified: रविवार, 15 ऑक्टोबर 2023 (12:31 IST)

रानडुकरांची दहशत: रानडुकरांपासून पिकांची नासाडी रोखण्यासाठी काय करायचं?

जुनागढच्या जामवाला रेंजमधील कोडीनारजवळील आनंदपूर आणि पेधवाला गावांदरम्यान काही दिवसांपूर्वी एका सिंहाचा वीज पडून मृत्यू झाला होता.
 
या घटनेनंतर वनविभागानं आनंदपूर गावातील जितू आणि वरसिंह परमार या दोघांना अटक करून कोडीनार न्यायालयात हजर केलं.
 
डिसेंबर 2022 मध्ये, तापी जिल्ह्यातील वालोड तालुक्यातील मोरदेवी गावात एकाच कुटुंबातील तीन सदस्य त्यांच्या शेतातील विद्युत कुंपणाच्या संपर्कात आल्यानंतर त्यांचा वीजेचा धक्का लागून मृत्यू झाला.
2022 मध्येच, सुरतमधील 45 वर्षीय महिला शेतमजूर शेतात काटेरी तारांना गुंडाळलेल्या विद्युत तारांच्या संपर्कात आल्यानं विजेचा धक्का लागून मृत्यू झाला.
 
या घटनेतही पोलिसांनी शेतमालकांविरोधात तक्रार नोंदवली. या तिन्ही घटनांना रानडुकरांची दहशत कारणीभूत असल्याचा आरोप आहे.
 
गुजरातमधील अनेक भागातील शेतकरी रानडुकरांचा त्रास टाळण्यासाठी विद्युत कुंपणाचं तंत्र अवलंबत आहेत. त्यामुळं कधी प्राणी तर कधी मनुष्य बळी पडतात.
 
गुजरात राज्यात डुकरांचा उपद्रव वाढला? यातून सुटका करण्यासाठी दुसरा मार्ग नाही का? या लेखात आपण याबद्दल तपशीलवार चर्चा करू.
 
शेतात डुकरांची दहशत
या विषयावर बीबीसी गुजरातीशी बोलताना राजकोटमधील शेतकरी रवी रंगानी यांनी सांगितलं की, “ माझी संपूर्ण शेतातील उभी पीकं मुळापासून उपटून टाकलं आहेत.
 
एका रात्रीत तुमच्या शेताकडे तुमचं दुर्लक्ष झालं तर ते महागात पडतं. डुक्करांनी माझं भुईमुगाचं पीक फस्त केलं. उभ्या ज्वारी पिकाची नासाडी केली.
 
खुमानसिंग डोडिया हे सुरेंद्रनगर जिल्ह्यातील मूली तालुक्यातील दुधई गावातील शेतकरी आहेत.
 
बीबीसी गुजरातीशी बोलताना ते सांगतात, “ डुकरं ही माझ्या कापूस पिकाचं नुकसान करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी एकदा ज्वारीचं संपूर्ण पीक उपटून टाकलं. त्यामुळं आम्हाला रात्रंदिवस सतर्क राहावं लागतं.”
राजकोट किसान संघाचे अध्यक्ष दिलीप सखिया सांगतात, “शहरातून डुक्कर नेऊन खेड्यात टाकण्यात आली. ते शेतातील पिकं कमी खातात आणि जास्त नुकसान करतात.
 
ते जमिनीतून एक एक उभं पीक काढून टाकतात. डुक्कर कळपात येतात आणि शेतात शिरण्यासाठी कुंपण तोडतात.”
 
"शेतकऱ्यांची अवस्था इतकी वाईट आहे की दिवसभर शेतात काम करतात आणि रात्री ही ते शेतावर लक्ष ठेवतात."
 
नवसारी कृषी विद्यापीठाच्या वनीकरण विभागाचे प्रमुख पी के श्रीवास्तव हे डुक्करांच्या वर्तणुकीबद्दल बोलताना म्हणतात, “डुक्कर जमिनीत पिकाखाली गाडलेल्या अळी खाण्यासाठी संपूर्ण पीक नष्ट करतात.
 
डुकरांना होणारा 'झूनोटिक' रोग (प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरणारे रोग) इतरत्र पसरु शकतो. जंगलात रानडुकरांची वाढती संख्या अन्नसुरक्षेलाही धोका आहे."
 
डुकरांना शेतांपासून दूर ठेवण्यासाठी काय पेरावं ?
संशोधनानुसार, आदिवासी समुदायांमध्ये काही पद्धती आहेत ज्याद्वारे ते डुकरांना पिकांपासून दूर ठेवतात. रंगीत साड्या वापरणं, कोरडं शेण जाळणं, काटेरी झुडपं लावणं, रानडुकरांना घाबरवण्यासाठी कुत्र्यांचा वापर करणं, पाण्यात मिरची पावडर मिसळणं आणि कुंपणावर शिंपडणे अशा पद्धती वापरतात.
 
रानडुकरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी या पद्धती प्रभावी ठरल्या आहेत. या पारंपरिक उपायांमुळं पिकांचं नुकसान 65 ते 70% नियंत्रणात येतं.
 
आयसीएआर (ICAR) सर्वेक्षणात केंद्र सरकारनं काही सोप्या आणि स्वस्त पद्धतींचं वर्णन केलं आहे, ज्याद्वारे शेतकरी डुकरांना दूर ठेवू शकतात.
 
शेतकऱ्यांनी त्यांच्या भुईमुगाच्या शेती भोवती चारही बाजूला करडईची काटेरी रोपं लावावीत. त्यामुळं डुक्कर शेतीपासून दूर राहतात आणि पिकांचं नुकसान टाळता येतं.
 
करडईचं पीक काटेरी आहे आणि भुईमूग पिकाच्या गंधापेक्षा करडईचा गंध उग्र असतो. डुकरांना करडईचा वास येतो आणि या पद्धतीमुळं पिकांचं नुकसान 75-90% कमी होऊ शकतं आणि शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न देखील मिळू शकतं.
 
दुसरी पद्धत म्हणजे मका आणि ज्वारीच्या पिकांभोवती 4 ते 5 ओळींमध्ये एरंडेलची पेरणी करणं. ते डुकरांमुळं होणारं 75-90% नुकसान प्रभावीपणे नियंत्रित करतं.
 
एरंडेलचा तीव्र वास मक्यांच्या वासावर पेक्षा उग्र असतो. हा डुकरांसाठी एक अप्रिय गंध देखील मानला जातो. या पद्धतीमुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नही मिळतं. याशिवाय एरंडेलची पेरणी कोणत्याही हंगामात करता येते.
 
याशिवाय नारळाच्या दोऱ्या पिकाभोवती तीन ओळींमध्ये लावाव्या. ज्यामध्ये दोन ओळींमध्ये लाकडी खांब ठेवलेले असतात. गंधक आणि घरगुती तेलाचं द्रव्य नारळाच्या दोऱ्यात मिसळलं जातं.
 
हे गंधानं भरलेलं आहे. ही पद्धत 60-80% प्रभावी असल्याचं सिद्ध झालं आहे. जैव-ध्वनीशास्त्र (बायोएकॉस्टिक्स) हा डुकरांना शेतीपासून दूर ठेवण्याचा सर्वात यशस्वी मार्ग आहे.
 
शेतकरी रात्रीच्या वेळी डुक्करं घाबरतील अशा प्राण्यांचे आवाज रेकॉर्ड करुन ते चालवतात. शेतात हा आवाज रात्रभर सुरू असल्यानं डुक्कर शिकारी प्राणी आजूबाजूला आहे असं समजून शेतापासून दूर राहतो. ही पद्धत 92 % प्रकरणांमध्ये सर्वात यशस्वी आणि प्रभावी आहे.
 
डुकरांना दृष्टी आणि ऐकण्याची क्षमता कमी असते. त्यामुळं डुक्कर हे गंध आणि आसपासच्या हालचालींवर अवलंबून असतात.
 
एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर तिथल्या मातीचा गंध घेऊन तो मार्ग शोधतात. मानवी केसांच्या वासानं डुकरांना नाकात जळजळ होते, त्यामुळं डुकराला मानवी केसांचा वास आला तर ते त्या ठिकाणापासून दूर राहतात.
 
त्यामुळं शेतकऱ्यांनी सलूनमधून मानवी केस स्वस्तात विकत घेऊन शेतात ठेवले तर डुक्कर आपोआप दूर राहतील. ही पद्धत शेतकऱ्यांसाठी 70-80% यशस्वी ठरली आहे.
 
गुजरातमध्ये डुकरांची संख्या किती आहे?
रवी रंगानी सांगतात, “लागवड सुरू झाली की डुकरांचा कळप येतो. जर डुक्कर रागावलेल असेल तर ते सर्व पिकं खाऊन टाकतं.
 
गुजरात राज्याच्या अधिकृत आकडेवारीनुसार, कच्छ, देवभूमी द्वारका, जामनगर, राजकोट, मोरबी, बोताड, सुरेंद्रनगर, पाटण, बनासकांठा, मेहसाणा, साबरकांठा, गांधीनगर, अहमदाबाद आनंद, खेडा आणि वडोदरा.
 
यासह राज्यातील 17 जिल्ह्यांमध्ये रानडुकरांचा धोका आहे.
डुकरांमुळं उभ्या पिकांचं होणारं नुकसान लक्षात घेऊन गुजरात राज्यानं याआधी केंद्र सरकारला 'वन्यजीव संरक्षण कायदा, 1972' च्या अनूसूची-3 नुसार या प्राण्यांच्या शिकारीच्या बंदीतून सूट देण्याची विनंती केली आणि सूची-5 अंतर्गत ठेवण्यास सांगितलं होतं.
 
शेती भोवती कुंपण लावण्याची योजना केल्यानं हा कलम निरर्थक ठरतं. त्यामुळं गुजरात सरकारनं आपला पूर्वीचा अर्ज मागे घेतला.
 
2021-22 मध्ये प्रकाशित झालेल्या गुजरातच्या अधिकृत वन आकडेवारीनुसार, 2015 मध्ये राज्यात रानडुकरांची संख्या 1 लाख 79 हजार 500 होती.
 
डुक्करांपासून पिकांच्या संरक्षणासाठी शेत-कुंपण योजना
शेतकरी-केंद्रित योजनेबद्दल बोलताना अहमदाबादचे जिल्हा कृषी अधिकारी हितेश पटेल म्हणतात, "गुजरात सरकारनं डुकरांपासून पिकांचं संरक्षण करण्यासाठी तार-कुंपण योजना लागू केली आहे."
 
“पीक संरक्षणाच्या उद्देशानं शेताच्या भोवती कुंपण घालण्याची योजना यापूर्वी वनविभागाकडे सुपूर्द करण्यात आली होती, परंतु यावर्षी ती अधिक प्रभावी करण्यासाठी महत्त्वपूर्ण बदल करून करण्यात आले आहेत.
 
या योजनेंतर्गत कृषी विभाग एकूण 350 कोटी रुपये खर्च करणार आहे. या योजनेंतर्गत शेतकरी एका गटात किमान 2 हेक्टर क्षेत्रामध्ये कुंपण घालण्यासाठी अर्ज करू शकतात.
 
प्रत्येक क्लस्टरसाठी एक गटनेता शेतकऱ्यांनी ठरवावा. यासाठी शेतकऱ्याला 'आय-खेडूत' पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
 
ही योजना कृषी संचालक कार्यालयामार्फत राबविण्यात येणार असून ही योजना राज्यभर राबविण्यात येणार आहे.
 
पटेल पुढे म्हणतात, “छोट्या शेतकर्‍यांच्या फायद्यासाठी ही योजना चांगली असली तरी प्रत्येक लहान क्लस्टरसाठी कुंपण बांधण्यासाठी सरकारकडे आवश्यक निधी नाही आणि त्यासाठी आणखी वेळ लागेल. कारण छोट्या क्लस्टरसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज असतील तर सर्वांना लगेच लाभ देता येणं शक्य नाही.
 
पण मोठ्या क्लस्टर्ससाठी कुंपण तयार करणं सरकारसाठी सोप आहे. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन फॉर्म भरल्यास काम वेगानं होईल.
 
गुजरातमधील अंदाजे 56 लाख शेतकऱ्यांपैकी केवळ 10 लाख शेतकरी या योजनेत नोंदणी करू शकले आहेत.
 
गुजरातमध्ये डुकरांची कोणती प्रजाती आढळते?
भारतीय कृषी संशोधन परिषदेनं (ICAR) 2016 मध्ये मानव-पशुधन संघर्षावरील सर्वेक्षण प्रसिद्ध केलं होतं.
 
या अहवालानुसार, जगभरात 16 रानडुकरांच्या प्रजाती आहेत. त्यापैकी युरेशियन रानडुक्कर भारतात आढळतात.
 
सर्वेक्षणानुसार, वन्य डुकरांना कमीत कमी धोकादायक श्रेणीच्या प्राण्यांमध्ये सूचीबद्ध केले आहे आणि ते भारताच्या 'वन्यजीव संरक्षण कायदा, 1972' च्या अनुसूची 3 अंतर्गत येतात.
 
रानडुकरांच्या प्रजननाचा कालावधी मुख्यत्वे अन्न उपलब्धता आणि इतर हवामान घटकांशी संबंधित असतो. नर डुकर 5 ते 7 महिन्यांनंतर लैंगिकदृष्ट्या प्रौढ होतात, तर मादी डुकर 4 ते 6 महिन्यांच्या वयात परिपक्व होतात.
 
रानडुकरे सहसा कळपात आढळतात आणि पहाटे आणि संध्याकाळी सक्रिय असतात.
त्यांच्या घ्राणेंद्रिय अधिक संवेदनशील असल्यानं ते पीक घेतलेलं क्षेत्र ओळखतात. अलीकडे, ही प्रजाती पिकांवर आक्रमण केल्यामुळं शेतीसाठी एक प्रमुख समस्या बनली आहे.
 
शेतकरी रविभाई रंगानी सांगतात, “आम्ही डुकरांना हाकलण्यासाठी जॅटको मशीन बसवतो पण ते काम करत नाही, कारण डुकरं माती खणतात आणि खालून बाहेर पडतात.
 
अशा प्रकारे, डुकरांना दूर ठेवण्याची कोणतीही पद्धत कार्य करत नाही. लागवडीनंतर चार महिने आम्ही शेत रात्रभर उघडे ठेवतो.”
 
खुमानसिंग डोडिया म्हणतात, “आम्ही सर्व उपाय करून पाहिले पण एकही उपाय कामी आला नाही. आता आम्ही रात्रभर ओरडून डुकराला शेतापासून दूर ठेवतो आणि तरीही ते शेतात आले तर आम्ही त्याचा पाठलाग करतो. लागवडीनंतर चार महिने आम्ही दिवसा शेतात काम करतो आणि डुकरांना हाकलण्यासाठी रात्री जागे राहतो.”
 
डुकरांच्या शिकारीबद्दल मतं विभागली आहेत
प्रख्यात पर्यावरणशास्त्रज्ञ माधव गाडगीळ यांच्या मते, आपल्याला वन्यजीव संरक्षण कायदा रद्द करून नैसर्गिक साधनसंपत्तीच्या योग्य व्यवस्थापनाची व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे.
 
गाडगीळ स्वसंरक्षणासाठी किंवा मालमत्तेच्या संरक्षणासाठी आणि संसाधनांचा दीर्घकालीन वापर करण्यासाठी वन्यजीवांच्या कायदेशीर शिकार करण्याच्या आंतरराष्ट्रीय पद्धतींना पाठिंबा देतात.
 
वन्यजीव छायाचित्रकार राजन जोशी म्हणतात की, “सरकारनं रानडुकरांबद्दल कोणतीही व्यापक माहिती गोळा केलेली नाही.
 
जेव्हा सर्वसमावेशक सर्वेक्षण केलं जातं तेव्हाच डुकरांसाठी शाश्वत व्यवस्थापन योजना आखली जाऊ शकते. पण एखाद्या प्राण्याची हत्या करणं किंवा त्यांची शिकार करणं हा कधीही शाश्वत दृष्टिकोन असू शकत नाही.”
 
 



















Published By- Priya Dixit