गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आवश्यक माहिती
Written By
Last Modified: गुरूवार, 12 ऑक्टोबर 2023 (18:15 IST)

ई-पीक पाहणी कशी करायची? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

farmer e pik bima
शेतकरी वर्गात सध्या ई-पीक पाहणीविषयी बरीच चर्चा सुरू आहे. ई-पीक पाहणी हा उपक्रम महाराष्ट्र सरकार गेल्या 3 वर्षांपासून राबवत आहे.
 
या उपक्रमाद्वारे शेतकरी स्वत: त्यांच्या शेतातल्या पिकांची नोंद सातबारा उताऱ्यावर करू शकणार आहे.
 
यंदाच्या खरिप हंगामात 9 ऑक्टोबरपर्यंत 1 कोटी 11 लाख 80 हजार हेक्टर इतक्या क्षेत्रावरील ई-पीक पाहणी पूर्ण झाली आहे. तर जवळपास 50 लाखांहून अधिक हेक्टरवरील पीक पाहणी बाकी आहे.
 
2023 मध्ये पिकांची नोंद करण्यासाठी 15 ऑक्टोबर 2023 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर तलाठी स्तरावरील पीक पाहणी 16 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरपर्यंत केली जाणार आहे.
 
म्हणजे ज्या शेतकऱ्यांची पीक पाहणी करणं राहून जाईल, त्यांची पीक पाहणी तलाठ्यांना करावी लागणार आहे.
 
छत्रपती संभाजीनगरच्या हिरापूर गावातील शेतकरी लालचंद नागलोत सांगत होते की, “गावातल्या काही काही लोकांनी ई-पीक पाहणी केली आहे.
 
चर्चा चालू आहे की, पीक पाहणी करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे लोक करुन राहिले. त्याच्यामुळे पुढचे आपल्याला फायदे आहेत म्हणून.”
 
ई-पीक पाहणी कशी करायची
ई-पीक पाहणी अॅपवर वापरून पिकांची नोंद करण्यासाठी सगळ्यांत आधी तुम्हाला ई-पीक पाहणी हे अॅप डाऊनलोड करायचं आहे. त्यासाठी प्ले-स्टोअरवर जायचं आहे. तिथं E-Peek Pahani असं सर्च करायचं आहे. त्यानंतर इन्स्टॉल वर क्लिक करायचं आहे.
 
इस्टॉलेशन कम्प्लिट झालं की ओपन या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
 
त्यानंतर ई-पीक पाहणी नावाचं पेज तुमच्यासमोर ओपन होईल. याला डावीकडे सरकवल्यास हे अॅप वापरण्यासाठी लागणारी माहिती तिथं दिलेली असेल.
 
पुन्हा एकदा डावीकडे सरकवल्यास पिकांची नोंदणी करण्यासाठी ज्या बाबींची मदत होऊ शकेल, त्या दिलेल्या असतील. जसं की सातबारा उतारा, 8-अ इत्यादी.
 
त्यानंतर महसूल विभाग निवडायचा आहे
 
पुढे नवीन खातेदार नोंदणी या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
 
इथं सुरुवातीला विभाग, जिल्हा, तालुका आणि गाव निवडून पुढे जायचं आहे. मग पहिलं, मधलं किंवा आडनाव, तसंच खाते क्रमांक किंवा गट क्रमांक टाकून तुम्ही खातेदार निवडू शकता.
 
इथं गट क्रमांक या पर्यायावर क्लिक करून खाली तो क्रमांक टाकायचा आहे आणि मग शोधावर क्लिक करायचं आहे.
 
मग त्या गटातील खातेदार तुम्हाला निवडायचा आहे. त्यानंतर खातेदाराचं नाव आणि खाते क्रमांक तपासून समोर जायचं आहे.
 
त्यानंतर तुमच्यासमोर सांकेतांक पाठवा नावाचं पेज ओपन होईल.
 
आपली नोंदणी खालील मोबाईल क्रमांकावर करण्यात येत आहे, अशी सूचना तिथं दिलेली असेल. पण, तुम्हाला नंबर बदलायचा असल्यास मोबाईल क्रमांक बदला हे बटण दाबा, मोबाईल नंबर टाका आणि मग पुढे जा या पर्यायावर क्लिक करा.
 
आता तुम्ही गेल्या वर्षी या अॅपवर नोंदणी केली असेल, तर तुमची नोंदणी आधीच झाली आहे, तुम्हाला पुढे जायचे का, असा मेसेज तिथं येईल. पण तुम्ही यंदा पहिल्यांदाच नोंदणी करणार असाल तर तसा मेसेज इथं येणार नाही.
 
इथल्या हो या पर्यायावर क्लिक करा.
 
आता खातेदाराचं नाव निवडा. सांकेतांक विसरलात यावर क्लिक करा आणि मग सांकेतांक क्रमांक टाका. समजा ब्लँक स्क्रीन आली, तर मग होम या पर्यायावर क्लिक करा.
 
आता पीक पाहणीच्या अॅपवर तुम्ही तुमच्या पिकांची नोंद करू शकता. इथं पीक माहिती नोंदवा या पर्यायावर क्लिक करायचं आहे. मग खाते क्रमांक, गट क्रमांक निवडला की लागवडीखालील जमिनीचं एकूण क्षेत्र आणि पोटखराब क्षेत्र तिथं आपोआप येईल.
 
पुढे खरीप हंगाम निवडून, पिकाचा वर्ग जसं की निर्भेळ पीक आहे की मिश्र पीक किंवा इतर ते निवडायचं आहे. त्याचा प्रकार, पिकांची नावं आणि क्षेत्र हेक्टर आरमध्ये टाकायचं आहे.
 
एकदा का ही माहिती भरून झाली की पुढे जल सिंचनाचे साधन जसं की विहीर, तलाव हे निवडायचं आहे. त्यानंतर सिंचन पद्धत आणि लागवडीची तारीख निवडायची आहे.
 
पुढे अक्षांश रेखांश मिळवा या पर्यायावर क्लिक करायचं आहे. आणि मग शेवटी फोटो काढावर क्लिक करून पिकाचा फोटो अपलोड करायचा आहे. हा फोटो तुम्हाला तुमच्या शेतातून अपलोड करायचा आहे.
 
फोटो काढून झाला की बरोबरच्या खुणेवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही जी माहिती भरली, ती तुमच्यासमोर दाखवली जाईल. त्याखालच्या स्वयंघोषणेवर तुम्हाला टिक करून पुढे जायचं आहे.
 
पीक माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे, अशी सूचना येईल. ठीक आहे म्हणायचं आहे.
 
नोंदवलेल्या पिकांची माहिती पाहण्यासाठी पिकांची माहिती पाहा या पर्यायावर क्लिक करून तुम्ही भरलेली माहिती पाहू शकता.
 
ई पीक पाहणीचे फायदे काय?
ई-पीक पाहणी करताना दिलेली माहिती 4 प्रकारचे लाभ देण्यासाठी वापरली जात असल्याचं ई-पीक पाहणी प्रकल्पाचे राज्य समन्वयक श्रीरंग तांबे यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.
 
MSP मिळवण्यासाठी – तुम्हाला जर तुमचा शेतमाल किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत विक्री करायचा असेल तर त्यासाठीही तुमच्या संमतीनं हा डेटा वापरला जाऊ शकतो.
पीक कर्जाच्या पडताळणीसाठी - तुम्ही ज्या पिकावर कर्ज घेतलंय, तेच पिक लावलं का, याची बँक हा डेटा पाहून पडताळणी करू शकते. 100 च्या वर बँका आजघडीला हा डेटा वापरत आहेत.
पीक विमा योजनेच्या लाभासाठी – विम्यासाठी अर्ज करताना नोंदवलेलं पीक आणि ई-पीक पाहणीत नोंदवलेलं पीक, यात तफावत आढळल्यास पीक पाहणीतील पीक अंतिम गृहित धरलं जातं.
नुकसान भरपाईसाठी - नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचं नुकसान झाल्यास भरपाई देण्यासाठी.