1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. विधानसभा निवडणूक 2014
  4. मोदी नागपुरात फुंकणार विधानसभेचा बिगुल

मोदी नागपुरात फुंकणार विधानसभेचा बिगुल

लोकसभा निवडणुकीत प्रकर्षाने नागपूर टाळणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 21 ऑगस्टला नागपूर भेटीवर येत आहेत. त्यांची कस्तुरचंद पार्कवर जाहीर सभा होणार आहे. यावेळी 10 हजार कोटींची मेट्रो रेल्वे, पारडी अंडर ब्रिजसह एकूण 29 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे भूमिपूजन व उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून भाजप विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा बिगुल फुंकण्याच्या तयारीत आहे.
 
लोकसभा निवडणूक काळात नरेंद्र मोदी यांच्या विदर्भात बर्‍याच सभा झाल्या. मात्र, नागपुरात एकही सभा झाली नाही. पंतप्रधान झाल्यानंतर ते पहिल्यांदाच संघभूमीत येत आहेत. निवडणूक प्रचारकाळात नागपूर विमानतळावर त्यांचे आगमन झाले पण, ते तेथूनच चंद्रपूर येथे सभेसाठी गेले होते. यावेळी त्यांचा संपूर्ण दिवस नागपूर आणि आसपासच्या परिसरात राहणार आहे. 
 
विधानसभा निवडणुकीमुळे विविध प्रकल्पांचे भूमिपूजन करण्याचे केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांचे प्रयत्न आहेत. त्यासाठी पंतप्रधान येणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते मेट्रो रेल्वे, पारडी अंडर ब्रिज, बोरखेडी-तुळजापूर व्हाया यवतमाळ फोर लेनच्या राष्ट्रीय महामार्गाचे भूमिपूजन होणार आहे. फोर लेन प्रक्लपासाठी सुमारे 6 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यातून सांगली, सोलापूर कनेक्ट होतील, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
 
वर्धा येथील स्वावलंबीनगर शाळेच्या प्रांगणात बोरखेडी-तुळजापूर महामार्गाचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन होईल. खासदार रामदास तडस यांच्या मतदारसंघातच निवडणुकीची पहिली प्रचार सभा झाली होती, हे विशेष.
 
पंतप्रधानांच्या दौर्‍याबाबत नितीन गडकरी यांनी काही प्रमुख नेत्यांशी रविवारी वाडय़ावर चर्चा केली. खासदार अजय संचेती, खासदार तडस, शहर अध्यक्ष आमदार कृष्णा खोपडे, माजी खासदार बनवारीलाल पुरोहित उपस्थित होते.