मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. विजय तेंडुलकर
Written By वेबदुनिया|

'आंतरभारती' तेंडुलकर

- अभिनय कुलकर्णी

ND
तेंडुलकर किती मोठे होते, हे दुर्देवाने मराठी माणसाला कळलेच नाही. मराठी भाषा टिकविण्याची आंदोलने होत असताना हा मराठी नाटककार, मराठीत लिहून राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला होता. अनेक भारतीय भाषांत त्यांची नाटके अनुवादीत झाली आहे. इंग्रजीतही ती गेली आहेत. दोन वर्षापूर्वी अमेरिकेत आणि कोलकत्यातही त्यांच्या नाटकांचा महोत्सव झाला होता. पण त्याही पलीकडे तेंडुलकरांची नाटके देशभरात ठिकठिकाणी होत असतात. पण आम्ही त्यांना फक्त मराठीच्याच फक्त कोत्या दृष्टिकोनातून बघतो. त्यांच्या जाण्याबद्दल इतर भाषांमधील ज्येष्ठ व्यक्तिंशी बोलल्यानंतर आपण काय गमावले याची जाणीव झाली.

ज्येष्ठ बंगाली साहित्यिक सुनीलकुमार गंगोपाध्याय यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी तेंडुलकर हा 'ग्रेट' माणूस होता, अशा शब्दांत तेंडुलकरांविषयीच्या भावना मांडल्या. ते म्हणाले, की तेंडुलकरांची सखाराम बाईंडर, घाशीराम कोतवाल, कमला, ही नाटकं बंगालीतही आली. अधूनमधून ती सादरही होत असतात. कोलकत्यात अनेकांना ती आवडली आहेत.

रवींद्रनाथ टागोर, शरदचंद्र, बंकिमचंद्र यांच्यासारख्या महान साहित्यिकांचे साहित्य मराठीत आल्याचा आनंद आपल्याला जसा होतो, तसाच तेंडुलकरांची नाटके बंगालीत होऊन ती सादरही होतात, याविषयी मात्र आपला अभिमान फारसा दिसून येत नाही. किंवा अनेकदा ते माहितही नसतं.

तेंडुलकरांविषयी बोलताना मी दोन तीनदा त्यांना भेटलो. आमच्याच चांगली चर्चाही झाली. माझ्या शोध या पटकथेचे त्यांनी हिंदी रूपांतर केले होते. त्यानिमित्ताने माझा त्यांच्याशी संबंध आला होता, अशी आठवणही श्री. गंगोपाध्याय यांनी संगितली.

ND
तेंडुलकरांचा प्रभाव आसामी भाषेवरही आहे. आसामीतही त्यांची नाटके अनुवादित झाली आणि त्याचे प्रयोगही होतात. तेंडुलकर गेल्याची बातमी आसामी नाट्य संमेलनाचे कार्यकारी अध्यक्ष उमेश शर्मा यांना सांगितली तेव्हा ते हळहळले. ते म्हणाले, मी त्यांना कधी भेटलो नाही. पण ते आमचा आदर्श होते. आमच्यासाठी ते एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते. त्यांच्या नाटकांचे विषय, मांडणीचे तंत्र, नेपथ्य अशा अनेक बाबी आम्हीही स्वीकारल्या आहेत.

आसाममध्ये अनेक ग्रुप तेंडुलकरांची नाटके करतात. दुतल रॉय, माणिर रॉय, रवजिता गोगोई यांचा जिरसंग ग्रुप तेंडुलकरांची यापैकीच आहे. बहारूल इस्लाम आणि भागिरथी हेही तेंडुलकरांच्या नाटकाने प्रभावीत झालेले आहेत. तेंडुलकरांच्या जाण्याने आम्ही बरेच काही गमावले ही श्री. शर्मा यांची प्रतिक्रिया खूप काही सांगून जाणारी आहे.

नाट्यकर्मी तपन मुखर्जी हेही तेंडुलकरांचे चाहते आहेत. ते म्हणतात, की मी तेंडुलकरांना कधी भेटलो नाही, पण त्यांच्या नाटकांचा माझ्यावर मोठा प्रभाव आहे. त्यांच्या नाटकात असं काही होतं की त्यामुळे लोक त्याकडे खेचले जायचे. सामाजिक परिस्थितीवरील त्यांचे बोचरे भाष्य अनेकांना त्यामुळेच आवडतही नव्हते. 'सखाराम बाइंडर' या नाटकाचा प्रयोग इंदूरमध्ये झाला त्यावेळी तपन मुखर्जी यांनी त्यात भूमिका केली होती.