Marathi Biodata Maker
✕

लोकसभा 2019 : ‘मी आहे खेड्यातली पण मला शहरी विद्यार्थांना टक्कर द्यायचीये’

Updated: सोमवार, 1 एप्रिल 2019 (16:11 IST)
 
"मला माहितेय हा न्युनगंड आहे, पण मी काय करू? असं वाटतं माझा स्वतःशीच झगडा सुरू आहे. मी एक शब्दही बोलत नाही वर्गात, अगदी शिक्षकांनी एखादा प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर मला येत असलं तरी."
 
इतकी बोलघेवडी मुलगी कधी गप्प बसत असेल यावर विश्वास बसत नाही. पण तिच्या वाटेला तोच त्रास आहे जो खेड्यातल्या होतकरू तरूणांना सहन करावा लागतो.
 
ते शिक्षणासाठी आणि चांगल्या संधीच्या शोधात शहरात येतात खरे पण इंग्लिश न बोलता आल्यामुळे किंवा तिथल्या वातवरणात अॅडजस्ट न करता आल्यामुळे मागे पडतात.
 
बीनल म्हणते की ग्रामीण भागातल्या मुलांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळत नाही. Annual Status of Education Report 2018 (ASER) या अहवालानुसार खासगी शाळा शैक्षणिक दर्जाच्या बाबतीत गेल्या दहा वर्षांपासून सरकारी शाळांच्या पुढे आहेत.
 
"मी गुजराती मीडियमच्या सरकारी शाळेत शिकले. शाळेत सगळे म्हणायचे की मुलगी हुशार आहे. पुढे मी bachelor of business administration कोर्सला अॅडमिशन घेतली. नडियादला जायला यायला लागले आणि माझं सगळं विश्वच बदलून गेलं. खूप गोष्टी नव्याने कळाल्या, मी स्मार्ट नाही, शहरातल्या मुलांसारखं मला चांगलं बोलता येत नाही, त्यांच्या आणि आमच्या शिक्षणाच्या दर्जात प्रचंड फरक आहे," बीनल म्हणते.
 
आणि म्हणूनच येत्या निवडणुकांमध्ये बीनल त्याच प्रतिनिधींना मत देणार आहे जे ग्रामीण आणि शहरी भागातल्या शिक्षणाचा दर्जा एकसारखा करतील.
 
तिला वाटतं ग्रामीण भागातल्या मुलांच्या भविष्याशी सरकारला, किंवा कोणत्याही राजकीय पक्षाला काही देणं घेणं नाहीये. "त्यांना काय, ते फक्त शाळा बांधतात हे दाखवायला की बघा आम्ही शिक्षणासाठी किती भरीव काहीतरी करत आहोत, पण प्रत्यक्षात काय होतं? गुजरातमधले जास्तीत जास्त विद्यार्थी सरकारी शाळांमध्ये शिकतात. त्यांना अत्यंत वाईट दर्जाचं शिक्षण मिळतं."
 
आम्हाला जर चांगलं शिक्षणच मिळालं नाही तर आम्ही भविष्यातल्या स्पर्धेसाठी कसे तयार होणार हा तिचा मुख्य प्रश्न आहे.
 
बीनलचं गाव मोहोलेल नडियादपासून फक्त 14 किलोमीटर अंतरावर आहे. तिच्या गावाहून ती रोज नडियादला येते, कॉलेजसाठी.
 
नडियादच्या सगळ्यांत उच्चभ्रू रस्त्यावर तिचं मॅनेजमेंट कॉलेज आहे. इथेच तिच्या इच्छा आकांक्षांना पंख फुटतात. पण वर्गातल्या शिक्षकांसमोर काही बोलयची तिची हिंमत होत नाही. कारण तिच्या शिक्षणाने तिला नव्या युगाच्या स्पर्धेसाठी सक्षमच बनवलं नाही.
 
तीन भावंडांमध्ये सगळ्यांत धाकटी असणाऱ्या बीनलला तिच्या घरच्यांना अभिमान वाटेल असं काही करायचं आहे. "माझ्या घरच्यांनी मला शिकवण्यासाठी खूप कष्ट घेतलेत. मला वाटलं मी त्यांना काहीतरी करून दाखवेन, पण मी अभ्यासात मागे पडतेय," ती चिंतेने म्हणते.
 
ती सरकारच्या धोरणांवरही टीका करते. "सरकार गप्पा मारत स्किल इंडिया, डिजिटल इंडियाच्या, पण त्यातून ग्रामीण विद्यार्थ्यांना वगळून कसं चालेल? आम्हाला शिकवा ना, आम्हाला शिक्षणाच्या उत्तम सोयी उपलब्ध करून द्या."
 
ASER च्या रिपोर्टनुसार सरकारी शाळांमध्ये पाचवीत शिकणाऱ्या 44.2 टक्के मुलांना फक्त दुसरीच्या दर्जाचं वाचन आणि लेखन जमतं.
 
"आम्ही सरकारी शाळांमधली मुलं काय करतो, कशी शिकतो याच्याशी सरकारला कशाला देणंघेणं असेल. त्यांची मुलं तर मोठ्या मोठ्या शाळांमध्ये शिकतात." ती म्हणते.
 
ते फक्त नावाला शाळा-कॉलेज उभारतात आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळतात. म्हणूनच शिक्षणाचा दर्जा ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा मुद्दा असल्याचं बीनल सांगते.
 
"आम्ही गावाकडची पोरं शहरातल्या विद्यार्थ्यांशी स्पर्धा करू शकत नाही, मग परदेशातल्या विद्यार्थ्यांशी काय स्पर्धा करणार. इथे एकाच देशात एक भारत आणि एक इंडिया राहातात. दोघांचं जगच वेगवेगळं आहे. माझी इच्छा आहे दोघांनी एकत्र पुढे जावं, दोघांचा सारखाच विकास व्हावा," ती म्हणते.

अनघा पाठक
बीबीसी मराठी प्रतिनिधी

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

पुढील लेख
Show comments