Daily Horoscope
✕

आदित्य ठाकरे जिथून लढतील तो वरळी विधानसभा मतदारसंघ कसा आहे

Updated: मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019 (08:31 IST)
मुंबईतील वरिष्ठ पत्रकार आणि "बाळ ठाकरे अॅंड द राईज ऑफ द शिवसेना" पुस्तकाचे लेखक वैभव पुरंदरे यांच्या मते, "आदित्य ठाकरे यांच्यासाठी शिवसेना साहजिकच सुरक्षित मतदारसंघाची चाचपणी करणार, यात शंका नाही. त्यामुळेच वरळीचा विचार केला गेला असावा."

"युती होवो किंवा न होवो, या मतदारसंघात आदित्य यांना उभं करायचं याची तयारी शिवसेनेने पूर्वीपासूनच केली होती. या भागात शिवसेनेचं कामही चांगलं आहे. इथली यंग ब्रिगेड शिवसेनेच्या पाठीशी असल्यामुळेच या मतदारसंघाची निवड करण्यात आली. इथून आदित्य चांगल्या मताधिक्याने निवडून येऊ शकतात," असं मुंबई 'महाराष्ट्र टाइम्स'चे सहयोगी संपादक संजय व्हनमाने यांनी सांगितलं.

वरळी विधानसभा मतदारसंघ म्हणजे महाराष्ट्राची छोटी आवृत्ती असल्याचं संजय व्हनमाने सांगतात. "वरळीमध्ये गिरण्या आणि गिरणी कामगारांच्या चाळी मोठ्या प्रमाणावर होत्या. या परिसराला एकेकाळी गिरणगावही म्हणलं जायचं. गिरण्या बंद पडल्यानंतर वरळीमध्ये टोलेजंग इमारती, 5 स्टार हॉटेल्स, मल्टीप्लेक्स उभे राहिले आणि पुढच्या काळात या परिसराचा चेहरामोहरा बदलून गेला."

"वरळीमध्ये मोठमोठ्या चाळी आहेत. रेसकोर्स,ऑर्थर रोड जेल आहे, सर्वांत मोठा धोबीघाट आहे. महाराष्ट्रातल्या सर्वच भागातील लोक या ठिकाणी वास्तव्याला आहेत. गुजरातमधले अनेक नागरिक याठिकाणी राहायला आले आहेत. संमिश्र स्वरूपाची मतदारसंख्या या भागात पाहायला मिळते," असं ते पुढे सांगतात.
"सीताराम, मोरारजी, मफतलाल, डॉन मिल यासारख्या अनेक गिरण्या या मतदारसंघात आणि आजुबाजूला आहेत. मध्यंतरी संपामुळे अनेक गिरण्या बंद पडल्या आणि इथले बरेच मतदार उपनगरात, कल्याण-डोंबिवलीकडे वळले. पण तरीसुद्धा मराठी मतदारच या भागात महत्त्वाचा मानला जातो," असं संजय व्हनमाने सांगतात.

मतदारसंघातील प्रश्न कोणते ?

"बीडीडी चाळींचा पुनर्विकास आणि कोस्टल रोडला मच्छिमारांचा विरोध, हे दोन प्रमुख प्रश्न वरळी मतदारसंघात आहेत. त्याशिवाय मुंबईतील इतर मतदारसंघातील समस्यांप्रमाणेच इथेही समस्या आहेत," असंही संजय व्हनमाने सांगतात.

निवडणुकीवर परिणाम काय?
आदित्य ठाकरे यांचा वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण करणारा ठरू शकतो, असं राजकीय विश्लेषक संतोष प्रधान सांगतात.

महाराष्ट्रात शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा एक वर्ग आधीपासूनच आहे. आदित्य ठाकरे यांची उमेदवारी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करेल. पण महाराष्ट्राच्या राजकारणात यामुळे जास्त काही बदल घडणार नसल्याचं प्रधान यांना वाटतं.

"शिवसेनेत बऱ्याच वर्षांपासून काम करणारे अनेक नेते आणि कार्यकर्ते आहेत. शिवसेनेत नवं नेतृत्व आदित्य ठाकरे यांच्या स्वरूपात पुढे येईल. या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांचं नेतृत्व प्रस्थापित केलं जात आहे. त्यांच्या या निर्णयाचं स्वागत करण्यात येत असलं तरी वर्षानुवर्षं काम करणाऱ्या काही नेत्यांना हा निर्णय निराश करू शकतो. सत्ता मिळाल्यानंतर नव्या आदित्य ठाकरेंचं नेतृत्व नेत्यांना मान्य करावं लागेल," असंही ते सांगतात.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांना विधिमंडळ नेते बनवल्यानंतर अनेक प्रस्थापित नेत्यांच्या ते पचनी पडलं नव्हतं. अशीच परिस्थिती शिवसेनेत निर्माण होऊ शकते, असं प्रधान सांगतात.

सुनील शिंदे काय करतील?
"वरळीचे विद्यमान आमदार असलेले सुनील शिंदे आपली जागा आदित्य ठाकरे यांना देणार आहेत. त्यांना विधान परिषद अथवा इतर एखादं मोठं पद देऊन समाधानी करण्यात येईल," असं संजय व्हनमाने सांगतात.

ते सांगतात, "सुनील शिंदे हे हाडाचे शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. त्यांनी नगरसेवक पदापासून आमदारकीपर्यंत मजल मारली आहे. अनेक कार्यक्रमातं ते आदित्य ठाकरे यांच्यासोबत हिरीरीने सहभागी होतात. सुनील शिंदे बंडखोरी करण्याची कोणतीही शक्यता नाही."

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

पुढील लेख
Show comments