Marathi Biodata Maker

भारतीय मुलांमध्ये लठ्ठपणा का वाढतो आहे?

Updated: मंगळवार, 2 ऑगस्ट 2022 (14:57 IST)
 
वरवर पाहता हे आकडे लहान वाटू शकतात. पण युनिसेफ इंडियाचे पोषण प्रमुख डॉ. अर्जन डी वाक्ट सांगतात की, "भारताची लोकसंख्या पाहता, कमी टक्केही मोठ्या आकड्यांचे निदर्शक असतात."
 
युनिसेफच्या वर्ल्ड ओबेसिटी अ‍ॅटलास 2022नुसार भारतात 2030 पर्यंत 2.7 कोटी लठ्ठं मुलं (म्हणजे जगभरातल्या दहा मुलांपैकी एक) असतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. लठ्ठपणाचा सामना करण्यासाठी आवश्यक तयारीचा विचार करता भारत 183 देशांच्या यादीत 99व्या स्थानावर आहे. जास्तीचं वजन आणि लठ्ठपणाचा आर्थिक परिणाम वाढत असून तो 2019 मध्ये 23 अब्ज अमेरिकन डॉलर्सवरून 2060 साली 479 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
 
"भारतात लहान मुलांमधल्या लठ्ठपणाचं एक मोठं संकट उभं राहात आहे. लठ्ठपणाला कारणीभूत ठरणारं वर्तन लहानपणीच सुरू झाल्यानं, ही लठ्ठ मुलं पुढेही प्रौढ होतात, तेव्हाही लठ्ठ राहतात," असं डॉ. डी वाक्ट सांगतात.
 
हीच बाब आरोग्य तज्ज्ञांना चिंतेत टाकते. WHO च्या अहवालानुसार अतिरिक्त चरबीमुळे असंसर्गजन्य रोगांचा धोका वाढतो. यामुळे 13 प्रकारचे कर्करोग, टाईप टू डायबेटिस (मधुमेह), हृदयरोग आणि फुफ्फुसांचे आजार होऊ शकतात आणि कमी वयातल्या मृत्यूचं प्रमाण वाढतं. गेल्या वर्षी जगभरात 28 लाख लोकांचा मृत्यू हा लठ्ठपणामुळे झाला.
 
प्रौढांमधल्या लठ्ठपणाचं प्रमाण पाहता, गेल्या काही वर्षांत भारत आधीच जगातल्या पहिल्या पाच देशांमध्ये पोहोचला आहे. 2016 सालच्या एका अंदाजानुसार भारतात तेव्हा 13 कोटी 5 दशलक्ष लोकांचं वजन जास्त होतं किंवा ते लठ्ठ होते आणि हे नंबर वाढत आहेत.
 
डॉ. डी वाक्ट सांगतात, भारतासारख्या देशात - जिथे अजूनही पाच वर्षांखालील 36% मुलांची वाढ खुंटलेली पाहायला मिळते आहे तिथे - कुपोषणाविरुद्ध लढाईतलं यश अतिपोषणामुळे झाकोळलं जातंय.
 
"एकाच वेळी कुपोषित आणि अतिपोषित लोकांचं प्रमाण मोठं असल्याचं दिसून येतंय. वजन वाढणं आणि लठ्ठपणा या दोन्ही गोष्टी अतिपोषणाचा परिणाम आहेत. पण याचा अर्थ त्यांना पुरेसं आणि गरजेचं पोषण मिळतंय, असा मात्र होत नाही."
 
त्यांच्या मते पोषणाविषयीची माहिती नसणं हीच सर्वांत मोठी समस्या आहे. "मुलांना संतुलित आहार दिला, ज्यात कर्बोदकं (कार्बोहायड्रेट्स), प्रथिनं, जीवनसत्व, फळं आणि भाज्यांचा समावेश असेल, तर कुपोषण आणि अतिपोषण हे दोन्ही रोखता येतील. पण चांगलं अन्न काय असतं हे लोकांना माहिती नाही आणि ते फक्त पोट भरण्यासाठी खातात. ते जास्त कार्बोहायड्रेट्स खातायात, सोयीचे असलेले पदार्थ खातायत."
 
डॉ. डी वाक्ट सांगतात, की लहान मुलांमधल्या लठ्ठपणाची समस्या समाजाच्या सर्वच वर्गात आढळून येते. पण श्रीमंत, शहरी कुटुंबांमध्ये हे प्रमाण जास्त आहे, कारण तिथे मुलांना चरबी, साखर आणि मीठ जास्त असलेले खाद्यपदार्थ आणि पेयं दिली जातात.
 
2019 साली मॅक्स हेल्थकेअरनं दिल्ली आणि दिल्लीच्या उपनगरांत केलेल्या सर्वेक्षणातून समोर आलं की लहान बालकं (5 ते 9 वर्षे वय), टीनएजर्स (10 ते 14 वर्षे वयोगट) आणि पौगंडावस्थेतील मुलं (15 ते 17 वर्ष) यांच्यात लठ्ठपणा आणि वजन जास्त असण्याचं प्रमाण 40 टक्के एवढं आहे.
 
"तरूण मुलं उशीरा झोपतात आणि अनेकदा मध्यरात्री काहीतरी खातात - असं अन्न बहुतेकदा सकस नसतं. रात्री उशीरा खाल्ल्यावर ते लगेच झोपतात आणि कोणत्याच कॅलरी नष्ट करत नाहीत (कुठला व्यायाम करत नाहीत). मग दिवसभर त्यांना आळसावल्यासारखं वाटतं, त्यामुळे ते कमी कष्ट घेतात, कमी कॅलरी जाळतात. यासोबतच मुलं खेळण्याऐवजी आणि इकडे तिकडे पळण्याऐवजी कॉम्प्युटर्स आणि फोनमध्ये जास्त वेळ घालवत आहेत," असं डॉ. चौबे सांगतात.
 
ते इशारा देतात की "लठ्ठपणा फक्त आरोग्यावरच परिणाम करत नाही, तर आपल्या जगण्याच्या प्रत्येक अंगावर, मानसिक स्वास्थ्य आणि सामाजिक आयुष्यावरही परिणाम करतो. लठ्ठ मुलांना अनेकदा पूर्वग्रह, गैरसमजाचा सामना करावा लागतो, ते समाजात वेगळे पडतात."
 
चेन्नईतले शल्यक्रिया विषारद आणि ओबेसिटी फाऊंडेशन ऑफ इंडियाचे संस्थापक डॉ. रविंद्रन कुमारन सांगतात की आत्ताच मुलांकडे लक्ष दिलं नाही, तर पुढे जाऊन देशातल्या लठ्ठपणाच्या समस्येचा सामना करणं सोपं जाणार नाही.
 
"तुम्ही अर्धा तास टीव्ही पाहिलात तरी अनेक जाहिराती दिसतील ज्या जंक फूड आणि सॉफ्ट ड्रिंक्सचा प्रचार करतात. अशा आरोग्य विरोधी जंक फूडविषयी चुकीचे समज पसरवणं थांबायला हवं आणि केवळ सरकारच ही गोष्ट करू शकतं."
 
अधिकाधिक मुलांना खेळण्यासाठी घराबाहेर काढण्याची गरज असल्याचंही ते सांगतात.
 
"एक देश म्हणून आपण शारीरिक क्षमता वाढवण्यावर फार भर देत नाही. आपल्या शहरांमध्ये फूटपाथ्स नाहीत, सुरक्षित सायकल ट्रॅक्स नाहीत आणि अशी मैदानंही फारशी नाहीत जिथे मुलं खेळू शकतात."
 
स्पोर्ट्स व्हिलेज सारख्या संस्था हीच परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करतायत, असं या संस्थेचे सहसंस्थापक आणि सीईओ शौमिल मजुमदार यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
 
"आपल्याकडे शाळा ही एकच जागा आहे जिथे मुलांना खेळण्यासाठी सुरक्षित जागा मिळते. त्यामुळे शाळांनी लठ्ठपणा रोखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावायला हवी," असं शौमिल सांगतात.
 
त्यांच्या संस्थेनं 254,000 मुलांचं सर्वेक्षण केलं होतं, ज्यातून समोर आलं की यातल्या निम्म्या मुलांचा BMI निरोगी नाही; मोठ्या प्रमाणात मुलांमध्ये लवचिकता नाही; मोठ्या प्रमाणात त्यांच्या पोट-पाठीचे स्नायू कमकुवत आहेत.
 
हा धोरणाचा प्रश्न नाही. "सर्व शाळांमध्ये शारीरिक शिक्षणाचा तास असतो. पण सामान्यतः जी मुलं खेळात पुढे असतात, केवळ त्यांच्याकडे लक्ष दिलं जातं. ज्यांना खेळायला आवडत नाही, त्यांच्यासाठी हा तास आवडीचा नसतो," असं शौमिल मजुमदार सांगतात.
 
"शाळेत मुलांना जसं सगळ्या विषयांचं प्राथमिक ज्ञान मिळायला हवं असं आपण मानतो, तसंच त्यांना प्राथमिक दर्जाचा फिटनेस कसा निर्माण करायचा हेही शिकवायला हवं."
 
वर्षानुवर्ष काम केलं, तर परिस्थिती सुधारू शकते असा त्यांचा अनुभव आहे. त्यांनी आजवर ज्या शाळांसोबत काम केल आहे, तिथल्या अनुभवाविषयी शौमिल सांगतात,
 
"आम्हाला काही बाबतीत फिटनेसमध्ये 5 ते 17 टक्के सुधारणा आढळून आली आहे. आम्ही अनेक मुलींना मैदानावर खेळण्यासाठी आणू शकलो. खेळातून जगातल्या सगळ्या समस्या सुटू शकतात असं आम्हाला वाटतं."

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

पुढील लेख
Show comments