रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated :नाशिक , सोमवार, 1 ऑगस्ट 2022 (16:20 IST)

संजय राऊतांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी, कोर्टात काय काय झालं?

sanjay raut
संजय राऊत यांना न्यायालयानं 4 ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे.
 
संजय राऊत यांना 8 दिवसांची ईडीची कोठडी सुनावण्यात यावी, अशी मागणी ईडीच्या वकिलांनी न्यायालयाकडे केली होती.
 
संजय राऊत यांना अंमलबजावणी संचलनालयानं म्हणजेच ईडीनं रात्री उशीरा अटक केली. रविवारी दिवसभराच्या चौकशीनंतर ई़डीनं त्यांना संध्याकाळी ताब्यात घेतलं होतं.
 
त्यानंतर आज दुपारी संजय राऊत यांना कोर्टात आणण्यात आलं. कोर्ट परिसरात येताना संजय राऊत लोकांकडे पाहून 'जय महाराष्ट्र' म्हणाले.
 
संजय राऊतांच्या रिमांडवर दोन्ही बाजूच्या वकिलांनी युक्तिवाद केला. ईडीच्या वतीने वकील हितेन वेणेगावकर यांनी युक्तिवाद केला.
 
ईडीच्या वकिलांनी मांडलेला युक्तिवाद-
प्रविण राऊत पत्राचाळ डेव्हलेपमेंट पाहत होता त्याला HDIL ग्रुपकडून 112 कोटी रुपये मिळाले. त्यातील 1 कोटी 6 लाख 44 हजार वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले, असा दावा ईडीच्या वकिलांनी केली आहे.
अलिबागची जमिन याच पैशातून खरेदी करण्यात आली. राऊत कुटुंबाला पत्राचाळ प्रकरणात. थेट आर्थिक फायदा झालाय.
प्रविण राऊत फक्त नावाला होता. तो संजय राऊत यांच्यावतीनं सर्व व्यवहार करत होता.
मग पत्राचाळ गैरव्यवहारातील पैसे असो की दादर येथील घर आणि अलिबाग येथील जमीन सर्व व्यवहार संजय राऊत यांच्या सांगण्यावरूनच करण्यात आले.
संजय राऊत यांनी काही पुराव्याशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला.
रात्री 10.30 नंतर चौकशी करणार नाही
राऊतांच्या बचावात वकिलांचा युक्तिवाद -
संजय राऊत यांची अटक ही राजकीय हेतूनं प्रेरित आहे.
या प्रकरणातील प्रमुख आरोपी प्रविण राऊत याला अटक करुन अनेक महिने झालेत. इतकी दिवस का नाही कारवाई केली कारण ही कारवाई राजकीय हेतूनं करायची होती.
संजय राऊत हार्ट रुग्ण आहेत. त्यांच्याशी उशीरा चौकशी करू नये.
राऊतांची चौकशी सुरू असताना वकीलांना उपस्थित राहू द्या.
संजय यांचा गुन्हा काय? - उद्धव ठाकरे
आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राऊत यांच्या भांडूपमधल्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली.
 
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, "संजय राऊंताचा मला अभिमान आहे. आजच्या राजकारणात बळाचा वापर चाललाय. दिवस फरतात हे लक्षात ठेवा. दिवस एकदा फिरले की तुमचं काय होईल याचा विचार भाजपनं करावा.
 
"संजय राऊत यांचा गुन्हा काय आहे? पत्रकार, शिवसैनिक आणि निर्भीड आहे. त्याला अटक केली आहे. मरण आली तरी शरण जाणार नाही, असं संजय म्हणाले."
 
"विरोधात बोललं तर त्याला अडकवायचं अशी देशात परिस्थिती निर्माण झालीय. न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. काळ बदलला की तुम्ही लोकांशी जसे वागले, तसाच काळ तुमच्याशी बोलेल," असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
 
आता पुढचं कोर्ट ठरवेल - फडणवीस
संजय राऊत यांच्यावरील ईडीच्या कारवाईविषयी बोलताना उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "कोणतीही यंत्रणा पुराव्यानिशी काम करते. यात एजन्सीने कारवाई केलीय. आता पुढचं कोर्ट ठरवेल."
 
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं, "ही अटक ईश्वराची ईच्छा होती. जसं कर्म तसं फळ मिळतं. जे काही केलं त्याची प्रायश्चित्त म्हणून ही अटक आहे. ही एका सामान्य राजकीय नेत्याला झालेली अटक आहे."
 
दरम्यान दुसरीकडे स्वप्ना पाटकर धमकी प्रकरणी संजय राऊत यांच्याविरोधात वाकोला पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय राऊत यांचा कथित कॉल रेकॉर्ड व्हायरल झाल्यानंतर राऊत यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
त्यामुळे राऊत यांच्या अडचणीत वाढ झालीय.
 
ईडीच्या कार्यालयाबाहेर रविवारी माध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी म्हटलं की, मला अटक करणार आहेत आणि मी अटक करून घ्यायला जातोय.
 
"शिवसेनेला कमजोर करण्यासाठी ही कारवाई, संजय राऊत झुकेगा नहीं, शिवसेना सोडणार नाही. महाराष्ट्र कमजोर होतोय याचे पेढे वाटा, बेशरम लोक आहात, लाज वाटली पाहिजे तुम्हाला, शिवसेनेला झुकवण्यासाठी सुरू आहे. शिंदे गटाला लाज वाटली पाहिजे," असंही संजय राऊत यांनी म्हटलं.
 
रविवारच्या कारवाईनंतर संजय राऊत यांनी एक ट्वीटही केलं होतं. या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, जो कधीच हार मानत नाही, त्या व्यक्तीला तुम्ही हरवू शकत नाही. झुकणार नाही.
 
दरम्यान, राऊत यांना ईडीच्या कार्यालयात नेत असताना बीबीसी मराठीच्या प्रतिनिधींनी त्यांना अटक होणार का असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी म्हटलं की, हम लढेंगे.
 
आज (31 जुलै) सकाळपासून राऊत दाम्पत्याची ईडीकडून चौकशी सुरू होती. राऊत यांच्या घरावर अंमलबजावणी संचलनालयाच्या (ईडी) पथकानं छापा मारला. मुंबईतील भांडुपमधील घरावर ईडीनं छापा मारला.
 
तब्बल 9 तास राऊत यांची चौकशी सुरू होती.
 
संजय राऊत यांना ईडीनं चौकशीनंतर ताब्यात घेतल्याची माहिती संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी दिली.
 
या कारवाईबाबत पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत ते म्हणाले की "संजय राऊत यांची केवळ चौकशी होत आहे. कर नाही त्याला डर कशाला, रोज तेच सांगत होते की त्यांनी काही केलं नाही. ते महाविकास आघाडीतील मोठे नेते होते," असं शिंदे यांनी म्हटले.
 
दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या घरी असलेल्या छाप्यांवरून टीका करताना म्हटलं की, ही दमनशाही, दडपशाही सुरू आहे.
 
"संजय राऊत यांना आज अटक होण्याची शक्यता आहे. आज त्यांनी 'रोखठोक' लिहिलं, त्यात काही प्रश्न उपस्थित केले आहेत. हे कारस्थान निर्लज्जपणे सुरू आहे," असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.
 
राजन विचारे यांच्या नेतृत्वात ठाणे येथून शेकडो शिवसैनिक उद्धव ठाकरे यांना भेटायला 'मातोश्री'वर आले होते. त्यांच्याशी बोलताना उद्धव यांनी संजय राऊत यांच्या अटकेची शक्यता व्यक्त केली होती.
 
"माफिया कमिशनर संजय पांडे यांच्यानंतर आता माफिया नेता संजय राऊत यांना अटक झाली आहे आहे. पत्राचाळ घोटाळा, वसई नायगाव, अलिबाग मधील जमिनी, मुंबईमधील सदनिका आणि परदेश वाऱ्या या सगळयांचा जेव्हा हिशोब लागणारं, तेव्हा नक्कीच आर्थर रोड जेलमध्ये नवाब मलिक यांचे शेजारी होण्याचा बहुमान संजय राऊत यांना मिळेल," असं ट्वीट भाजप नेते किरीट सौमय्या यांनी केलं आहे.
 
"ज्या प्रकारे आज संजय राऊत यांना अटक करण्यात आली आहे, त्यांनतर आता अनेक लोकांची नावं, अनेक कंपन्यांची नावं बाहेर येतील. त्याचे तार कुठेतरी उद्धव ठाकरे यांच्याशी जोडलेले मिळतील. त्यामुळे येणाऱ्या काळात मातोश्रीमध्ये सुद्धा या सगळ्यांचे कनेक्शन दिसेल," अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिली आहे.
 
त्यांनी म्हटलं, "अनिल परब, संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी मिळून महाविकास आघाडी स्थापन केली होती. त्या आघाडीच्या माध्यमातून जो भ्रष्टाचार झाला, कमिशनखोरी झाली. त्यावर ईडीचे लक्ष होते. त्यातूनच आज ईडीने संजय राऊत यांना आज अटक केल्यांनतर अनेक चेहरे बाहेर येतील."
 
संजय राऊत यांचे ट्वीट्स
ज्यावेळी संजय राऊत यांच्या घरावर छापे पडले, तेव्हा त्यांनी छाप्यादरम्यानच ट्विटरवर ट्वीट्समागून ट्वीट्स पोस्ट केले.
 
पहिलं ट्वीट - 'तरीही शिवसेना सोडणार नाही.'
 
दुसरं ट्वीट - 'महाराष्ट्र आणि शिवसेना लढत राहील.'
 
तिसरं ट्वीट - 'खोटी कारवाई.. खोटे पुरावे. मी शिवसेना सोडणार नाही. मरेन पण शरण जाणार नाही. जय महाराष्ट्र'
 
चौथा ट्वीट - 'कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे. बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय. मी शिवसेनेसाठी लढत राहीन.'
 
पाचवं ट्वीट - 'शिवसेना झिंदाबाद!!! लढत राहीन.'
 
या छाप्याचे वृत्त कळताच, संजय राऊत यांचे समर्थक घराबाहेर जमण्यास सुरुवात झाली आहे. समर्थकांनी राऊतांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे.