मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 1 ऑगस्ट 2022 (08:00 IST)

संजय राऊतांना अटक हा शिवसेनेच्या मुळावर घाव आहे का?

uddhav sanjay
दीपाली जगताप
शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ENFORCEMENT DIRECTORATE) पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटक केली आली. शिवसेनेत एकनाथ शिंदे गटाने बंड केल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या जवळच्या नेत्यावर केलेली ही पहिलीच मोठी कारवाई आहे.
 
शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये तीव्र राजकीय संघर्षाला सुरूवात झाली. गेल्या अडीच वर्षांत महाराष्ट्रात राजकीय घडामोडींमध्ये केंद्रस्थानी शिवसेना विरुद्ध भाजप हेच चित्र पाहायला मिळालं.
 
एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत 39 शिवसेना आमदारांचं उद्धव ठाकरेंविरुद्धचं बंड हे या संघर्षातील सर्वोच्च टोक मानलं गेलं आणि आता या संघर्षात उद्धव ठाकरें गटाकडून किल्ला लढवणाऱ्या संजय राऊत यांना अटक म्हणजे शिवसेनेवरील शेवटचा घाव आहे, असंही मानलं जात आहे.
 
ही कारवाई केंद्रीय तपास यंत्रणेची असली तरी ही राजकीय हेतूने प्रेरित आहे, असाही आरोप करण्यात येत आहे. शिवसेनेची आक्रमक ओळख संपुष्टात आणण्याचा हा प्रयत्न आहे का? 'उद्धव ठाकरे यांना एकटं पाडण्याची' ही रणनिती आहे का? संजय राऊत यांच्या अटकेचा शिवसेनेवर याचा काय परिणाम होईल? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
 
'उद्धव ठाकरेंना एकटं पाडण्याचा डाव'
गेल्या 40 दिवसांत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना अनेक धक्के बसले. विधानपरिषद निवडणुकीनंतर 21 जून 2022 रोजी शिवसेनेचे पहिल्या फळीतले नेते आणि ठाण्याचे तत्कालिन पालकमंत्री एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाले. बघता बघता काही दिवसांतच शिवसेनेचे 39 आमदार त्यांच्या गटात सामील झाले.
 
शिवसेनेत उभी फूट पडली. महाविकास आघाडी सरकार कोसळलं, उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला आणि एकनाथ शिंदे गटाने भाजपची साथ देत नवीन सरकार स्थापन केलं.
 
'शिवसेना संपली' अशा प्रतिक्रिया येऊ लागल्या. उद्धव ठाकरे यांना नव्याने पक्ष उभारणी करावी लागणार हे स्पष्ट झालं. आदित्य ठाकरे यांनी पक्ष बांधणीसाठी दररोज मेळावे घेण्यास सुरुवात केली.
 
हे कमी होतं की काय म्हणून आता शिवसेनेचे प्रवक्ते आणि उद्धव ठाकरे गटाची बाजू आक्रमकपणे मांडणारे खासदार संजय राऊत यांना आता ईडीने अटक केलीय.
 
ईडीच्या कारवाई दरम्यान संजय राऊत म्हणाले, "शिवसेनेला त्रास देण्याचा हा प्रयत्न आहे. मी झुकणार नाही. शिवसेना सोडणार नाही आणि शरण जाणार नाही." तर संजय राऊत यांचे बंधू आणि आमदार सुनील राऊत यांनी ही कारवाई म्हणजे, "उद्धव ठाकरे यांना एकटं पाडण्याचा डाव आहे," अशी प्रतिक्रिया दिली.
 
शिवसेना संपवण्याचा भाजपचा डाव आहे असा आरोप यापूर्वी उद्धव ठाकरे यांनीही केला आहे. संजय राऊत यांनी नुकत्याच घेतलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे म्हणाले होते, "त्यांना शिवसेना संपवायची होती. जे शिवसेनेबरोबर ठरवलं होतं, अडीच-अडीच वर्षांचं मुख्यमंत्रिपद, ते केलं असतं तर पाच वर्षांत एकदा तरी भाजपला मुख्यमंत्रिपद मिळालं असतं. आता ही जी तोडफोड केलीये, ती शिवसेना नाहीये. हे करून त्यांना शिवसेना संपवायची आहे. हिंदुत्वामध्ये वाटेकरी नको असेल."
 
भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांची विचारधारा हिंदुत्ववादी आहे. म्हणूनच भाजपला कोणीही स्पर्धक नको, त्यामुळे त्यांना शिवसेना संपवायची आहे, असं मानणारे काही नेते शिवसेनेत आहेत. त्यापैकी एक संजय राऊत हे आहेत, असंही जाणकार सांगतात.
 
उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचे वैयक्तिक संबंध चांगले आहेत, असं वरिष्ठ पत्रकार संदीप प्रधान सांगतात.
 
ते म्हणाले, "उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर थेट कारवाई करायची नाही, पण त्यांच्या जवळच्या नेत्यांवर मात्र कारवाई करायची ही रणनिती असल्याचं यातून दिसतं."
 
"शिवसेनेच्यावतीने आक्रमक बोलणारं तसं आता कोणी नाही. शिंदे सरकारविरोधात आता कोणी बोलणार नाही. त्यामुळे याचा फटका शिवसेनेला बसेल. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक चांगला वक्ता पक्षाकडे नसेल."
 
ईडी कारवाईबाबत भाजपवर करण्यात येणारे आरोप पक्षाच्या नेत्यांनी वेळोवेळी फेटाळले आहेत. संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यावर भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले, "अनेकांना जेलमध्ये टाकण्याची धमकी देणाऱ्या संजय राऊत यांना आज जेलमध्ये पाठवलं जात आहे. सत्यमेव जयते."
 
तर राऊत यांना रविवारी ताब्यात घेतल्यानंतर "माफीया नेते संजय राऊत यांच्यावर कारवाई झाली आहे. पत्राचाळ प्रकरणात 1200 कोटींचा घोटाळा आहे. दुबईमध्ये कोणाकोणाच्या भेटी या गोष्टी बाहेर येतील. आर्थर रोड जेलमध्ये नवाब मलिकचे शेजारी होण्याचा मान संजय राऊत यांना मिळेल," असं सोमय्या म्हणाले होते.
 
शिवसेनेची आक्रमक ओळख पूसट करण्याचा प्रयत्न?
शिवसेना पक्षाची ओळख ही कायम आक्रमकता, रस्त्यावर उतरणारे कार्यकर्ते आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई अगदी काही तासात बंद करण्याची क्षमता असलेला पक्ष अशी होती. पण कालांतराने पक्षाच्या भूमिकांमध्ये बदल होत गेला.
 
परंतु संजय राऊत यांचं 'सामना'तील 'रोखठोक' सदर आणि माध्यमांसमोर पक्षाची भूमिका मांडण्याची शैली ही बाळासाहेबांच्या शिवसेनेप्रमाणेच आक्रमक राहिली.
 
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत हे पक्षासाठी केवळ राज्यसभेचे एक खासदार नाहीत. तर संजय राऊत हे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर शिवसेनेचा चेहरा आहेत.
 
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याशीही अत्यंत जवळचे संबंध असणारे म्हणून संजय राऊत यांची ओळख आहे.
 
शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'मध्ये ते 1993 पासून कार्यकारी संपादक म्हणून काम पाहत आहेत. बाळासाहेब नसतानाही सामनामधून त्यांची शैली जिंवत ठेवण्यात संजय राऊत यांना यश आलं.
 
केवळ सामनामध्येच नव्हे तर शिवसेनेची आक्रमक ओळख कायम ठेवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे आणि म्हणूनच संजय राऊत यांची अटक ही शिवसेनेसाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.
 
संजय राऊत हे आक्रमक शिवसेनेचा चेहरा आहेत आणि त्यांना अटक केल्याने याचा मोठा फटका पक्षाला बसेल असं राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सांगतात.
 
ते म्हणाले, "संजय राऊत हे शिवसेनेची आक्रमक बाजू मांडणारे वक्ते होते. शिवसेनेत त्यांच्याइतकं आक्रमक आणि टोकाची टीका करणारं दुसरं कोणीही नाही. महापालिका निवडणुका जवळ आहेत. पक्षाची प्रतिमा तयार करण्यात प्रवक्त्यांचा मोठा वाटा असतो. शिवसेनेसाठी हे काम संजय राऊत करत होते. त्यामुळे शिवसेनेला नक्कीच याचा फटका बसेल."
 
ही कारवाई संजय राऊत यांच्यासाठी अनपेक्षित नव्हती. सत्तांतरानंतर ही कारवाई होणार असल्याची शक्यता होती. त्यामुळे संजय राऊत यांची मानसिक तयारी असणार असंही अभय देशपांडे सांगतात.
 
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तुलनेत पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची कार्यशैली मवाळ असल्याची टीका यापूर्वी अनेकदा झाली आहे.
 
बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना याची तुलना जहाल आणि मवाळ अशी केली जाते. त्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांसोबत सत्ता स्थापन केल्याने शिवसेनेवर होणारी ही टीका आणखी टोकाला पोहोचली. हिंदुत्ववादी शिवसेनेने धर्मनिरपेक्ष काँग्रेससोबत सत्तेसाठी हातमिळवणी केली असा आरोप भाजपने केला होता.
 
'संजय राऊतांवरच कारवाई का?'
 
महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेपासून ईडीने राज्यातील अनेक नेत्यांविरोधात चौकशी सुरू केल्याचं दिसतं. यात शिवसेनेचे संजय राऊत, माजी मंत्री अनिल परब,खासदार भावना गवळी, आमदार प्रताप सरनाईक, आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल अशा अनेक नेत्यांविरोधात ईडीने चौकशी सुरू केली आहे.
 
परंतु संजय राऊत वगळले तर आतापर्यंत यापैकी शिवसेनेच्या एकाही नेत्याला ताब्यात घेतलं नाही किंवा अटक केलेली नाही. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी म्हटलं होतं की, "अजून कोणाला अटक झाली आहे का? कारवाई केली पण अटक केली का?"
 
म्हणजे शिवसेनेच्या नेत्यांवर ईडीकडून कारवाईला सुरुवात झाली, पण एकाला तरी अटक झाली का? असं एकनाथ शिंदे म्हणाले होते.
 
भाजपसह शिंदे गटातील आमदारांच्या निशाण्यावर संजय राऊत होते. अगदी एकनाथ शिंदे यांच्यापासून ते संजय शिरसाठ, शहाजी पाटील यांच्यासारख्या अनेक आमदारांनी संजय राऊत यांच्यावरील नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती.
 
त्याचं प्रमुख कारण होतं की संजय राऊत यांचा महाविकास आघाडी सरकार आणण्यात मोठा वाटा होता. शिवाय, संजय राऊत यांनी सातत्याने भाजपवर टीका केली आणि त्यामुळे संघर्ष टोकाला गेला, असंही शिंदे गटातील आमदारांनी यापूर्वी म्हटलं आहे.
 
संजय राऊत यांना ताब्यात घेतल्यानंतर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत म्हणाले, "ईडीची चौकशी सुरू असणारे शिवसेनेतील इतर सर्वजण भाजपमध्ये गेले. सुडबुद्धीने कारवाई होत आहे. अर्जुन खोतकर, हर्षवर्धन पाटील यांच्या स्टेटमेंटचे हेच संकेत आहेत."
 
संदीप प्रधान सांगतात, "भाजपच्या जनादेशाविरोधात जाऊन महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केली. शिवसेना पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाईल अशी शक्यता नसतानाही महाविकास आघाडीचा जन्म झाला आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री बनला. यात संपूर्ण प्रक्रियेत संजय राऊत यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली."
 
केवळ राज्यातच नव्हे तर राष्ट्रीय राजकारणातही संजय राऊत सक्रिय होते. केंद्रीतील एनडीए सरकार विरोधात विरोधी पक्षांच्या बैठकांनाही संजय राऊत आवर्जून उपस्थित राहत होते. शरद पवार यांनी विरोधी दलांचं नेतृत्त्व करावं, असंही संजय राऊत म्हणाले होते. तसंच केंद्रातील भाजपचा प्रमुख विरोधक काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनाही ते अनेकदा भेटल्याचं समोर आलं होतं.