शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: रविवार, 31 जुलै 2022 (18:57 IST)

संजय राऊत यांच्यावरील कारवाईचे 5 राजकीय अर्थ

sanjay raut
- मयांक भागवत
शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांना अंमलबजावणी संचलनालयानं ताब्यात घेतलं आहे.
 
आज (31 जुलै) सकाळपासून राऊत दाम्पत्याची ईडीकडून चौकशी सुरू होती. राऊत यांच्या घरावर अंमलबजावणी संचलनालयाच्या (ईडी) पथकानं छापा मारला. मुंबईतील भांडुपमधील घरावर ईडीनं छापा मारला.
 
तब्बल 9 तास राऊत यांची चौकशी सुरू होती.
 
संजय राऊत यांना ईडीनं चौकशीनंतर ताब्यात घेतल्याची माहिती संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी दिली.
 
या कारवाईबाबत पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत ते म्हणाले की "संजय राऊत यांची केवळ चौकशी होत आहे. कर नाही त्याला डर कशाला, रोज तेच सांगत होते की त्यांनी काही केलं नाही. ते महाविकास आघाडीतील मोठे नेते होते," असं शिंदे यांनी म्हटले.
 
दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या घरी असलेल्या छाप्यांवरून टीका करताना म्हटलं की, ही दमनशाही, दडपशाही सुरू आहे.
 
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी "पत्राचाळ घोटाळा, वसई नायगाव, अलिबाग मधील जमिनी, मुंबईमधील सदनिका आणि परदेश वाऱ्या या सगळयांचा जेव्हा हिशोब लागणारं, तेव्हा नक्कीच आर्थर रोड जेलमध्ये नवाब मलिक यांचे शेजारी होण्याचा बहुमान संजय राऊत यांना मिळेल," असं ट्वीट केलं.
 
एकीकडे संजय राऊत यांच्या चौकशीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असताना या कारवाईचे राजकीय अर्थ जाणून घेणंही महत्त्वाचं आहे.
 
1. भाजपसोबत जाण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव
मागच्या काही दिवसापासून शिवसेनेच्या अनेक नेत्यांची ईडीची चौकशी सुरु होती. त्यामुळे अनेक शिवसेना नेत्यांनी भाजपसोबत जाण्याची उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली होती. एकनाथ शिंदे यांच्यासोबत भाजपबरोबर गेलेल्या नेत्यांपैकी प्रताप सरनाईक, भावना गवळी, यशवंत जाधव यांची देखील ईडीकडून चौकशी सुरु होती.
 
अर्जुन खोतकर यांनी शिंदे गटात जाताना ईडीच्या चालू असलेल्या कारवाईमूळे प्रवेश केला, असं स्पष्टपणे सांगितलं होतं.
 
सध्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलेल्या अनिल परब, संजय राऊत यांची चौकशी सुरु आहे. याच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपसोबत येण्यासाठी दबाव टाकला जात आहे. संजय राऊत यांची चौकशी हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी अल्टिमेट असल्याचे राजकीय जाणकारांकडून बोलले जात आहे.
 
2. शिवसेनेचा विरोध कमी होईल?
संजय राऊत लोकांमध्ये जाऊन, राज्यभेत आणि माध्यमांसमोरही भाजपविरोधी भूमिका जोरदारपणे मांडत आहेत. सध्या संजय राऊत हेच शिवसेनेचा माध्यमातील आक्रमक चेहरा आहे. केंद्र सरकार आणि भाजपच्या विरोधात ते सातत्याने बोलत आहेत. तयामुळे राऊत यांना अटक झाल्यास शिवसेनेचा विरोधाचा आवाज बंद होईल.
 
संजय राऊत यांच्यानंतर थेट उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांनाच माध्यमांसमोर भूमिका मांडायला यावं लागेल. कारण सध्या संजय राऊत यांच्याशिवाय इतर कोणताही नेता आक्रमकपाने भूमिका मांडत नाही.
 
3. मिशन मुंबई महापालिका निवडणूक
येणाऱ्या काळात मुंबई महापालिकेसह राज्यातील 15 महापालिकांच्या निवडणुका आहेत. भाजपने मुंबई महापालिकेवर लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून भाजप कायमच आक्रमक राहिली आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून महापालिका निवडणुकीत शिवसेनेला घेरता येईल आणि त्याचा राजकीय फायदा भाजपला उचलता येईल.
 
4. भाजपचं सुडाचं राजकारण?
संजय राऊत यांच्या कारवाईनंतर भाजपकडून मराठी माणसांवर कारवाई केली जाते. भाजपकडून कसं सुडाचं राजकारण केलं जात आहे. भाजपसोबत जाण्यासाठी अशा प्रकारे दबाव टाकला जातो, अशी टीका विरोधकांकडून होऊ शकते.
 
हा सूडाच्या राजकारणाचा मुद्दा घेऊन उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे मुंबई महापालिकेत मराठी जनतेसमोर जाऊ शकतात. त्याचा त्यांना राजकीय फायदा होणार का हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
 
5. मराठी अस्मितेचा मुद्दा
दोन दिवसापूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या विधानानंतर शिवसेनेकडून मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आणला गेला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे त्यावर प्रतिक्रिया म्हणाले की, हा मराठी माणसांचा, मराठी मातीचा अपमान आहे. त्यामुळे राज्यपालांनी माफी मागायला हवी
 
सध्या शिवसेनेकडून संजय राऊत हे मराठी असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली, अशी भूमिका शिवसेनेकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हे मराठी कार्ड येत्या निवडणुकांमध्ये शिवसेनेकडून वापरलं जाणार आहे.