गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (16:20 IST)

संजय राऊतांच्या घरावर ईडीचा छापा, घराबाहेर शिवसैनिकांचा ठिय्या

sanjay raut
शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांच्या घरावर अंमलबजावणी संचलनालयाच्या (ईडी) पथकानं छापा मारला आहे. मुंबईतील मुलुंडमधील घरावर ईडीनं छापा मारला आहे.
 
आज (31 जुलै) सकाळपासून राऊत दाम्पत्याची ईडीकडून चौकशी सुरू आहे.
 
संजय राऊत यांच्या घरावर छाप्यादरम्यानच ट्विटरवर ट्वीट्समागून ट्वीट्स पोस्ट केले आहेत.
 
पहिलं ट्वीट - 'तरीही शिवसेना सोडणार नाही.'
 
दुसरं ट्वीट - 'महाराष्ट्र आणि शिवसेना लढत राहील.'
 
तिसरं ट्वीट - 'खोटी कारवाई.. खोटे पुरावे. मी शिवसेना सोडणार नाही. मरेन पण शरण जाणार नाही. जय महाराष्ट्र'
 
चौथा ट्वीट - 'कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे. बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय. मी शिवसेनेसाठी लढत राहीन.'
 
पाचवं ट्वीट - 'शिवसेना झिंदाबाद!!! लढत राहीन.'
 
या छाप्याचे वृत्त कळताच, संजय राऊत यांचे समर्थक घराबाहेर जमण्यास सुरुवात झाली आहे. समर्थकांनी राऊतांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे.
 
संजय राऊत यांना पाठिंबा देण्यासाठी शिवसैनिक त्यांच्या घराबाहेर घोषणा देत आहेत.
 
शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट हे संजय राऊतांवरील कारवाईबाबत म्हणाले की, "संजय राऊत हे हुशार नेते आहेत. त्यांना ईडी किंवा कसलीच भीती वाटत नाही. आपण जे करतो ते खरंय, असा आत्मविश्वास त्यांना आहे."
 
"शिवसैनिक आज आनंदी झाला असेल. ज्याच्या भोंग्यामुळे महाराष्ट्राला त्रास झाला, शिवसेनेचे 40 आमदार गेले, 12 खासदार गेले. संजय राऊत मास लिडर नाहीत, त्यामुळे उठाव होणार नाही," असंही शिरसाट म्हणाले.
 
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या म्हणाले की, "ईडीच्या कारवाईचं स्वागत करतो. संजय राऊतांना हिशेब तर द्यावाच लागेल. 1200 कोटींचा पत्राचाळ घोटाळा असो वा वसई-नायगाव बिल्डरचा घोटाळा असो वा, माफियागिरी असो वा दादागिरी असो, प्रत्येकाला जेलमध्ये पाठवण्याची धमकी, महाराष्ट्राला लुटण्याचा महाविकास आघाडीचा प्रकल्प होता... आता हिशेब तर द्यावाच लागणार. आज महाराष्ट्राची जनता आनंदी आहे. कारण माफिया संजय राऊतना पण हिशेब द्यावा लागणार."