शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: रविवार, 31 जुलै 2022 (18:02 IST)

झुकणार नाही....संजय राऊत यांना अंमलबजावणी संचलनालयानं ताब्यात घेतलं, ट्विटमध्ये लिहिलं....

sanjay raut ED
शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांना अंमलबजावणी संचलनालयानं ताब्यात घेतलं आहे. राऊत यांना ईडी कार्यालयात नेण्यात आलं.
 
ईडीच्या कार्यालयाबाहेर माध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी म्हटलं की, मला अटक करणार आहेत आणि मी अटक करून घ्यायला जातोय.
 
"शिवसेनेला कमजोर करण्यासाठी ही कारवाई, संजय राऊत झुकेगा नहीं, शिवसेना सोडणार नाही. महाराष्ट्र कमजोर होतोय याचे पेढे वाटा, बेशरम लोक आहात, लाज वाटली पाहिजे तुम्हाला, शिवसेनेला झुकवण्यासाठी सुरू आहे. शिंदे गटाला लाज वाटली पाहिजे," असंही संजय राऊत यांनी म्हटलं.
 
या कारवाईनंतर संजय राऊत यांनी एक ट्वीटही केलं होतं. या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, जो कधीच हार मानत नाही, त्या व्यक्तीला तुम्ही हरवू शकत नाही. झुकणार नाही.
 
आज (31 जुलै) सकाळपासून राऊत दाम्पत्याची ईडीकडून चौकशी सुरू होती. राऊत यांच्या घरावर अंमलबजावणी संचलनालयाच्या (ईडी) पथकानं छापा मारला. मुंबईतील भांडुपमधील घरावर ईडीनं छापा मारला.
 
तब्बल 9 तास राऊत यांची चौकशी सुरू होती. संजय राऊत यांना ईडीनं चौकशीनंतर ताब्यात घेतल्याची माहिती संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी दिली.
 
या कारवाईबाबत पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत ते म्हणाले की "संजय राऊत यांची केवळ चौकशी होत आहे. कर नाही त्याला डर कशाला, रोज तेच सांगत होते की त्यांनी काही केलं नाही. ते महाविकास आघाडीतील मोठे नेते होते," असं शिंदे यांनी म्हटले.
 
दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या घरी असलेल्या छाप्यांवरून टीका करताना म्हटलं की, ही दमनशाही, दडपशाही सुरू आहे.
 
"संजय राऊत यांना आज अटक होण्याची शक्यता आहे. आज त्यांनी 'रोखठोक' लिहिलं, त्यात काही प्रश्न उपस्थित केले आहेत. हे कारस्थान निर्लज्जपणे सुरू आहे," असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.
 
राजन विचारे यांच्या नेतृत्वात ठाणे येथून शेकडो शिवसैनिक उद्धव ठाकरे यांना भेटायला 'मातोश्री'वर आले होते. त्यांच्याशी बोलताना उद्धव यांनी संजय राऊत यांच्या अटकेची शक्यता व्यक्त केली होती.