मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Updated : मंगळवार, 9 जुलै 2024 (08:48 IST)

जयपूर टू जैसलमेर

रेल्वेने हिरवा कंदील दाखवला आणि आमचा प्रवास सुरू झाला. या वेळेस राजस्थानला फिरण्याची संधी मिळाली. सोलापूरहून हैदराबाद एक्स्प्रेसने थेट हैदराबाद गाठले. सकाळी गुलाबी थंडी अनुभवाला मिळाली. गरम कॉफी घेतल्यानंतर विमानतळ गाठले. थोडावेळ विमानतळावर विश्रांती घेऊन विमानप्रवासाने जयपूरला पोहोचलो. आम्ही आठ दिवसासाठी टॅक्सी बुक केली होती. चालकाने स्मितहास्याने केलेल स्वागताने आम्ही भारावून गेलो. जयपूरमध्ये आम्ही तीन रात्री राहणार होतो, आर्थिकदृष्ट्या चांगले असे हॉटेल करून आम्ही भटकंती करण्याचे ठरविले. 
 
राजस्थानच्या स्वागत व आदरातिथबद्दल आम्ही ऐकले होते, ते प्रत्येक ठिकाणी अनुभवाला मिळाले. प्रथम  आम्ही जंतरमंतरला गेलो, जाता जाता हवा महलचे दर्शन झाले, काही छायाचित्रे काढून आम्ही जंतरमंतरवर पोहोचलो. कृत्रिमरीत्या तयार केलेली काही अप्रतिम साधने आम्हाला तेथे पाहावास मिळाली. थोडा वेळ असल्याने आम्ही बाजारपेठ फिरण्याचे ठरविले. गुलाबी थंडी, कचोरी आणि चहाचा आस्वाद घेत बाजारपेठेत विंडो शॉपिंग करीत फिरलो. राजस्थानी पध्दतीचे दागिने, कपड्यांचे अनेक प्रकार पाहून मनाला आनंद झाला. पिंक सिटी नावाने प्रसिध्द असलेले जयपूर पाहावास मिळाले. रात्री विश्रांती घेतली आणि आमचे पुढे आमिर किल्ला पाहावयाचे ठरले. यावेळी हत्तीवरून आम्ही किल्ल्याकडे वाटचाल केली. हा अनुभव निराळाच होता.
 
हत्तीवरून राजेशाही थाटात किल्ला गाठला. आमिर किल्ल्याचे वैभव पाहून डोळ्याचे पारणे फिटले. राजे महाराजे त्या काळात कसे राहात असतील, याचे वास्तविक दर्शन आम्हास होत होते. तेथून आम्ही जयगडला गेलो, सर्वात मोठी तोफ पाहून जयगडावरून नहारगडाला गेलो. दोनही किल्ले पाहून खूप भूक लागली होती. आम्ही राजस्थानी रेस्टॉरंटमध्ये जेवणाचा आस्वाद घेतला.
 
थोडी विश्रांती घेऊन आम्ही जलमहाल बघितला तेव्हा तेथे असणारी लहान-सहान दुकाने आम्ही पाहिली व तेथून राजस्थानी पध्दतीचे सामान खरेदी केले. दुसर्‍या दिवशी आमचे लक्ष्य होते सिटी पॅलेस. ते पाहून सुध्दा खूपच आनंद वाटला. राजा महाराजांचे वंशज अजून तेथे राहतात, हे ऐकून अगदी कुतूहल जागृत झाले. संध्याकाळी आम्ही हवामहल आतून पाहिला आणि राजस्थानी व्हिलेज चौकी दानिला येथे गेलो. तेथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम होते, त्याचा अनुभव घेतला. 
pushkar
जयपूर पाहून झाल्यानंतर आम्ही पुष्करकडे प्रस्थान केले. ब्रह्मदेवाचे देऊळ असलेल्या पुष्करला आम्ही पोहोचताच मंदिरात जाऊन दर्शन घेतले, मन प्रसन्न अवस्था अनुभवत होते. पुढे सरकत आम्ही पुष्कर सरोवरावर पोहोचलो. काही काळ सरोवरावर घालवून आम्ही अजमेरला प्रस्थान केले. अजमेरला पोहोचताच इलेक्ट्रिक रिक्षामधून दर्ग्यापर्यंत पोहोचलो. आत जाऊन दग्र्याचे दर्शन घेतले. मनाला अतिशय समाधान वाटले. रात्रीचा मुक्काम ठोकून दुसर्‍या दिवशी जोधपूर गाठले. जोधपूरला मेहरानगड व संग्रहाल पाहिले. तेथून उम्मेद भवन पाहण्याचा अनुभव घेतला. जसवंत पहाड पहात मडोले गार्डन गाठले, सर्व ठिकाणी विविध वास्तू, त्यांची ठेवण, नक्षीकाम पाहून आम्ही खूप खूश होतो, कारण भारतीय संस्कृती त्यात झळकत होती. अशा वास्तू पाहण्याचा अनुभव निराळाच होता. जोधपूरला थोडी खरेदी केली आणि राजस्थानी नाष्ट्याचा आस्वाद घेतला. आलू-पराठा आणि पुरी भाजीची चव न्यारीच होती.
jaisalmer fort
पुढे आमचा प्रवास जैसरमेरला होता, कोर राजस्थान म्हणून याला ओळखले जाते. येथील पिवळे दगडीकाम, नक्षीकाम प्रसिध्द आहे. प्रत्येक वेळी वेगळा अनुभव येत होता. आम्ही पुढे सम वाळवंटात राहावयाचे ठरविले, तंबूत आमची सोय केली गेली. गुलाबी थंडीत आम्ही जीप सफारी केली. तोही अनुभव खूप प्रसन्न करणारा होता. आमचे राजस्थानीपध्दतीने स्वागत झाले. तो वेगळा अनुभव होता. सांस्कृतिक कार्यग्रम पाहून आम्ही थोडे राजस्थानी नृत्यही केले. दुसर्‍या दिवशी सकाळी उंटावरून फेरफटका मारला. थोड्याच अंतरावर बॉर्डर असल्याने सैनिकांची वाहने आणि सैनिक दिसत होते. असा आमचा प्रवास हा वेगळाच झाला. आठ दिवस कसे गेले हे कळलेच नाही. राजस्थानी महाल, गड, नक्षीकाम, दागिने, सैन्याची शस्त्रे, सर्व पाहावयास मिळाले. गोड वाणी, मृदू स्वभाव व प्रत्येक पर्यटकास आवर्जून विचारणारा राजस्थानी माणूस, हे या राजस्थानचे वैशिष्ट्य जगप्रसिध्द आहे. म्हणूनच भारतीय नव्हे तर परदेशी नागरिकही येथे भरपूर येत होते. सुरक्षित वातावरण व सोयी यामुळे राजस्थानला लोकांची पसंती आहे. प्रवास संपताच मन सुन्न झाले. जैसलमेरहून विमानाने परत मुंबई गाठली. अनुभवाचे भांडार घेऊन परत सोलापूरला आलो. हा अनुभव नेहमीच स्मरणात राहील. 
 
ऋत्विज चव्हाण