बुधवार, 18 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By

शोभा मानसरोवराची

mansarovar
कैलास पर्वतावर भगवान शंकर-पार्वती यांचा निवास आहे असं भाविक मानतात. हिमालयाची विविध रूपे या प्रवासात दिसतात. नेपाळमधील हिरवेगार डोंगर, दरीतून खळखळणारी कोसी नदी, डोंगरावरील शेती, डोंगरावरील छोटी गावं, रिमझिम पडणारा पाऊस आणि घाटातील ओबडधोबड रस्ते हे दृश्य बरंच काही सांगून जातं. 
 
हिमालाची उंची वाढेल तशी वृक्षांची उंची कमी होत गेली आहे. विशेषत: तिबेटमध्ये सर्वच डोंगर उघडे बोडके वाटतात. उंच हिमालातील तिबेट हे एक पठार आहे. तिबेटमध्ये मातीचे रस्ते असले तरी चांगले आहेत. रस्त्याच्या बाजूनं झुळझुळणारे ओढे आणि उथळ नद्या!
 
जमिनीवरील रोपं खुरटी असली तरी त्यावरील फुलं मोहक वाटतात. नेपाळ आणि तिबेटमध्ये मात्र एक साम्य आहे आणि ते म्हणजे प्रेअर फ्लेगची तोरणं.
 
सरोवराच्या आजूबाजूला डोंगरांची तटबंदी आहे. डोंगर कमी उंचीचे आहेत. अधूनमधून बर्फाच्छादित शिखरं दृष्टीला पडतात. मागील बाजूस उंचच उंच हिमाच्छादित डोंगरांचे भव्य तट आहेत.  
 
मानसरोवराच्या उत्तरेला शुभ्र संपूर्ण हिमाच्छादित असा कैलास पर्वत आहे. पर्वताच्या बाजूला नदी, पर्वत, समोर शंखसदृश हिमावरण असे दृश्य दिसते. 
 
या पर्वतावर बर्फानेच कोरलेला शिखरांचा देखावा, सरोवरातील निळे पाणी, त्यांच रंगाच्या पाण्याचा लाटा, प्रकाशकिरण लाटावर पडल्यावर   चमचमत लाटांच्या वेलांटय़ा, काठावर पोहोचणार्‍या लाटांचा झुळुक झुळुक आवाज, समोर भव्य कैलास पर्वत, सूर्यास्तामुळे आकाशातली केशराची उधळण आणि त्यानंतर डोंगरामागून उगवलेला केवढा मोठा आणि प्रकाशमान चंद्र! सर्वच अविस्मरणी आहे. 
 
mansarovar
मानसरोवराकाठी रात्रीचे तार्‍यांनी चमचमणारे आकाश, अधूनमधून तुटणारे तारे आणि त्यांचा सरोवरात होणारा प्रवेश असं दृश्य क्वचितच  पाहायला मिळतं. पौर्णिमेच्या रात्री चंद्र प्रकाशाचं मानसरोवरातील लाटांवर होणारं प्रकाशनृत्य हा केवळ अद्वितीय अनुभव वाटतो. 
 
ज्यांना श्वसनाचे विकार, रक्तदाब, मधुमेह वा इतर काही आजार आहेत त्यांनी सर्वप्रथम डॉक्टरांकडून सर्व तपासणी करून डॉक्टरांनी होकार दिल्यास जाण्याचं ठरवावं. 
 
प्रवास करताना ट्रॅव्हल कंपनीची नीट माहिती असणं आवश्क आहे. या प्रवासात बर्‍याच ठिकाणी टॉयलेटची सोय अपुरी असते. गरम पाणी, अंघोळ विसरणं गरजेचं आहे. 
 
नगद पैसे जवळ असावेत. शक्यतो जरुरीपुरतेच फॉरेन एक्सचेंज भारतातून घेऊन जावं. प्रवासासाठी विमा काढताना नीट चौकशी करावी. 
 
म. अ. खाडिलकर