1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified बुधवार, 7 सप्टेंबर 2022 (19:58 IST)

ब्रह्मास्त्र : रणबीर कपूर-आलियाला महाकालेश्वर मंदिरात येता आलं नाही याचं वाईट वाटलं- अयान मुखर्जी

"मध्य प्रदेशात महाकालेश्वर मंदिरात आलिया-रणबीर माझ्याबरोबर येऊ शकले नाहीत याचं मला वाईट वाटलं. मी आधीही महाकालेश्वर मंदिरात गेलो होतो. तेव्हाच ठरवलं होतं की चित्रपट प्रदर्शित होण्याआधी पुन्हा एकदा इथे येईन. ते दोघेही महाकालेश्वर इथे येण्यासाठी उत्सुक होते. शेवटच्या क्षणापर्यंत ते दोघेही येण्यासाठी आतूर होते", असं ब्रहास्त्र चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जी यांनी म्हटलं आहे.
 
मध्य प्रदेशमधील उज्जैन येथे मंगळवारी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रणबीर आणि आलियाचा मार्ग अडवला होता. बीफ खाण्यासंदर्भात रणबीर कपूरने यापूर्वी केलेल्या विधानांच्या पार्श्वभूमीवर हा विरोध झाला होता.
 
ब्रहास्त्र चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. राजधानी दिल्लीत चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने आलिया बोलत होती. यावेळी अभिनेता रणबीर कपूर तसंच दिग्दर्शक अयान मुखर्जी हेही उपस्थित होते.
 
ते म्हणाले, "जेव्हा आम्ही पोहोचलो, यागोष्टी ऐकल्या तेव्हा मी एकटं जायचं ठरवलं. आधीही मी एकटाच गेलो होतो. चित्रपटासाठी प्रार्थन केली. आलिया गरोदर आहे. तिची तब्येत लक्षात घेता मी एकटं जायचं ठरवलं. एकटा गेलो याचं वाईट वाटलं. तिथे गेल्यावर मला असं वाटलं ते दोघेही आले असते तर बरं झालं असतं".
 
"ब्रहास्त्रच्या पोस्टरवर एक ओळ आहे- लाईट विल कम. लाईटचा अर्थ काहीही सकारात्मक आणि अध्यात्मिक. या कलाकृतीच्या माध्यमातून सकारात्मक ऊर्जा पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. चित्रपटात भारतीय संस्कृतीची महानता दाखवणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. हा चित्रपट सकारात्मकेसंदर्भात आहे", असं ते म्हणाले.
 
वातावरण चांगलंच आहे-आलिया
"कोणतं वातावरण? उन्हाळा-हिवाळा? वातावरण चांगलं नाही असं काहीही नाही. चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी अतिशय छान असं वातावरण आहे. आपण निरोगी, आनंदी, सुरक्षित असणं आवश्यक आहे. या चांगल्या गोष्टी अनुभवायला मिळत आहेत यासाठी आपण ऋणी असायला हवं. असं काहीही बोलू नका. तुम्ही काही पसरवू नका. नकारात्मक वगैरे काहीही नाही. सगळं सकारात्मक आहे. कोरोना संपुष्टात आलेला नाही पण चित्रपटगृहं सुरू झाली आहेत. लोक मोठ्या पडद्यावर जाऊन आमचं काम बघू शकत आहेत. वातावरणात बदल हाच की सप्टेंबर सुरू आहे, तो संपला की ऑक्टोबर येईल", अशा शब्दात आलियाने बॉयकॉट ट्रेंड तसंच अन्य गोष्टीबाबत नाव न घेता भूमिका स्पष्ट केली.
 
उज्जैनमध्ये काय घडलं होतं?
मध्य प्रदेशमधील उज्जैन येथे मंगळवारी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रणबीर आणि आलियाचा मार्ग अडवला होता. बीफ खाण्यासंदर्भात रणबीर कपूरने यापूर्वी केलेल्या विधानांच्या पार्श्वभूमीवर हा विरोध होता.
 
काही व्हीआयपी लोक मंदिरामध्ये येणार असल्याने आम्ही सुरक्षा व्यवस्था तैनात करत होतो. त्याचवेळी काही लोकांनी मंदिराला भेट देणाऱ्या या सेलिब्रिटींविरोधात आंदोलन करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी एकजण पोलीस अधिकाऱ्याशी हुज्जत घालू लागला," असं पोलीस अधीक्षक प्रकाश मिश्रा यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं
 
पोलिसांनी आंदोलकांविरुद्ध कलम 353 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सरकारी कर्मचाऱ्याच्या कामामध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाअंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
दरम्यान या दोघांना विरोध झाल्याने दिग्दर्शक अयान मुखर्जी यांनी एकट्यानेच महाकालेश्वर मंदिरात दर्शन घेतलं. रणबीर आणि आलिया हे त्यांच्या 'ब्रम्हास्त्र' या बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये फिरत आहेत.
 
2011 मध्ये रणबीरने रॉकस्टार चित्रपटाच्या प्रमोशनवेळी बीफ खायला आवडतं असं म्हटलं होतं. माझं कुटुंब पेशावरचं आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत पेशावरी खाद्यसंस्कृतीही इथे आली आहे. मी मटण, पायाही खातो. मी बीफचा चाहता आहे. मी बीफचा मोठा चाहता आहे असं रणबीर म्हणाला होता. ब्रह्सास्त्र चित्रपटाच्या प्रमोशनवेळी या जुन्या व्हीडिओचा संदर्भ देऊन चित्रपटावर बहिष्काराची मागणी करण्यात आली.
 
केसरिया गाण्याची झाली होती चर्चा
ब्रह्मास्त्र चित्रपटातील केसरिया हे गाणे रिलीज झाल्यानंतर या गाण्याची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. अरिजित सिंहच्या आवाजातील गाण्याने अनेकांना भुरळ घातली आहे तर लव्ह स्टोरिया हा शब्द गाण्यात आल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी त्यावर आक्षेप नोंदवला आहे.
 
हे गाणे मधुर आहे पण लव्ह स्टोरिया हा शब्द खटकतो अशी भावना काही चाहत्यांनी व्यक्त केली आहे.
 
काही जण म्हणत आहेत की एखादा इंग्रजी शब्द असेल तर त्यावर आक्षेप का असावा. केसरिया गाण्यावर नेटकऱ्यांनी भन्नाट मिम्स देखील काढले आहेत.
 
बिर्याणीत जेव्हा विलायची येते तेव्हा कसं होतं अगदी तसंच लव्ह स्टोरियां या शब्दामुळे झालं असं गौरी नाव्याच्या एका युजरने म्हटलं आहे.
 
जेठालालच्या फोटोचा वापर करून हे मीम बनवलं आहे.
तर काही जण म्हणत आहेत का चित्रपट नितांत सुंदर आहे. हा एक जादुई चित्रपट आहे.
या गाण्यातला लव्ह स्टोरिया हा शब्द 'फिट' होत नाही असं दर्शवणारं देखील एक मीम आलं आहे.
या ट्रोलिंगवर चित्रपट दिग्दर्शक आयन मुखर्जीची प्रतिक्रिया आली आहे. तो म्हटला की आम्ही खूप प्रेमपूर्वक या शब्दाचा वापर केला आहे. या शब्दामुळे गाण्याला एक वेगळी चव येईल असा विचार आम्ही केला होता. येणाऱ्या काळात हे आणे अधिक लोकप्रिय होईल असे आयन मुखर्जीने फिल्मी मिर्चीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
 
आधी झाली होती ब्रह्मास्त्रची अॅव्हेंजर्सशी तुलना
'यह कहानी है सारे अस्त्रों के देवता की- ब्रह्मास्त्र की और एक ऐसे नौजवान की जो इस बात से अनजान है के वो ब्रह्मास्त्र की किस्मत का सिकंदर है'
 
अमिताभ बच्चन यांच्या भारदास्त आवाजात आपल्या कथेच्या हिरोची ओळख करून देत बहुचर्चित ब्रह्मास्त्रचा ट्रेलर बुधवारी (15 जून) रिलीज झाला. दरम्यान, या चित्रपटाच्या ट्रेलरवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. बहुतांश नेटकरी ब्रह्मास्त्र चित्रपटाची तुलना हॉलीवूडच्या मार्वेल सिनेमॅटिक युनिव्हर्ससोबत करताना दिसत आहेत.
 
पौराणिक कथेचा आधार घेऊन बनवलेला हा चित्रपट तीन भागांमध्ये रिलीज होणार आहे. त्याचा पहिला भाग शिवा हा 9 सप्टेंबरला रिलीज होत आहे.
 
हिंदी, तमीळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत हा सिनेमा रिलीज होत आहे.
 
रणबीरकडे काही सुपर पॉवर्स आहेत. पण त्याला त्याची कल्पना नाहीये. अमिताभ बच्चन 'गुरू' अर्थात मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहेत.
या सिनेमात आलिया भट इशाच्या भूमिकेत असून तिची आणि शिव म्हणजेच रणबीर कपूरची लव्हस्टोरी पाहायला मिळेल, पण या प्रेमकथेसोबतच रणबीरच्या व्यक्तिरेखेवर जगाला वाचवायचीही जबाबदारी आहे. त्यासाठी त्याला काही नकारात्मक शक्तींसोबत लढा देत 'ब्रह्मास्त्र' मिळवायचं आहे.
 
या चित्रपटात रणबीर- आलियासोबत अमिताभ बच्चन, साऊथ सुपरस्टार नागार्जुन आणि अभिनेत्री मौनी राय हेदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
 
नागार्जुन आणि मौनी राय यांचेही चित्रपटातले लूक हटके आहेत.
 
अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रह्मास्त्रची घोषणा जुलै 2014 मध्येच करण्यात आली होती. तेव्हापासूनच या चित्रपटाची चर्चा सुरू होती. दिग्दर्शक अयान मुखर्जीला हा चित्रपट 2016 मध्येच रिलीज करायचा होता. मात्र काही कारणामुळे तो रखडला.
 
फेब्रुवारी 2018 ते मार्च 2022 या चार वर्षांच्या काळात ब्रह्मास्त्रचं शूटिंग पार पडलं. बल्गेरिया, लंडन, न्यूयॉर्क, एडिंबर्ग आणि वाराणसीमध्ये या चित्रपटाचं शूटिंग झालं.
याच चित्रपटादरम्यान आलिया आणि रणबीर एकमेकांच्या प्रेमात पडले होते. या वर्षी 14 एप्रिलला आलिया आणि रणबीर विवाहबद्ध झाले. त्याचदिवशी रणबीर आणि आलियाला लग्नाच्या शुभेच्छा देत ब्रह्मास्त्रमधील 'केसरिया' या गाण्याचा टीझर रिलीज केला गेला होता.
 
त्याआधी या चित्रपटातील रणबीरच्या शिव आणि आलियाच्या ईशा या कॅरेक्टर्सची ओळख करून देणारे पोस्टर्सही प्रसिद्ध केले होते.
 
अमिताभ हे प्रोफेसर अरविंद चतुर्वेदी हे कॅरेक्टर साकारत आहेत, तर नागार्जुन अनिश ही व्यक्तिरेखा साकारत आहेत. टेलिव्हिजनवरील चर्चित चेहरा मौनी राय या चित्रपटात नकारात्मक भूमिकेत आहे.
 
चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजच्या एक दिवस आधीच मौनी रायचा चित्रपटातला लूक रिलीज केला. ब्रह्मास्त्र पाहिल्यानंतर लोक मौनीच्या 'जुनून'चं कौतुक करतच बाहेर पडतील, असं दिग्दर्शक अयान मुखर्जीनं म्हटलं होतं.
 
लोकांच्या विविध प्रतिक्रिया
श्रेयस आठवले नामक एका खात्यावरून ब्रह्मास्त्रच्या ट्रेलरसंदर्भात एक ट्विट करण्यात आलं. यामध्ये श्रेयस म्हणतात, "स्कार्लेट विचने आता हॉलीवूडमधून बॉलीवूडमध्ये प्रवेश केला आहे, हे आताच कळलं."
व्हाय नामक अकाऊंटने म्हटलं, बॉलीवूडने अॅक्वामॅन आणि स्कार्लेट विचच्या रुपात मार्वेल आणि डिसीमधील पात्र एकत्र आणले.
 
पण काहीजण लोकांच्या या भूमिकेशी सहमत नसल्याचंही दिसून येतं. त्यांनी ब्रह्मास्त्रच्या ट्रेलरचं तोंडभरून कौतुक केलं आहे.
 
अभय सेंजालिया म्हणतात, "उत्कृष्ट ट्रेलर. कॉपी-कॉपी म्हणणाऱ्या व्यक्तींना मार्वेल आणि डिसीच्या कोणत्या चित्रपटांमध्ये या शक्ती आणि संकल्पना दिसल्या?"
वर्डमिंटर या खात्यावरून केलेल्या कमेंटमध्येही एक वेगळा युक्तिवाद करण्यात आला. त्यांनी म्हटलं, "मौनीचा लूक वांडावरून कॉपी करण्यात आलेला असेल तर या तर्कावरून जादूच्या लूकवरून अवतारचा लूक कॉपी करण्यात आला, असं म्हणता येईल."
ट्रेलर रिलीज होण्याच्या आधी आलिया-रणबीरनं काय म्हटलं?
ब्रह्मास्त्रच्या ट्रेलर रिलीजच्या आदल्या दिवशी आलिया भट आणि रणबीर कपूरनं सोशल मीडियावर एक व्हीडिओ शेअर केला होता.
 
आलियानं तिच्या व्हीडिओमध्ये म्हटलं होतं की, ब्रह्मास्त्रचा ट्रेलर रिलीज होत आहे. आमच्यासाठी हा खूप महत्त्वाचा क्षण आहे. मी आठवडाभरापासून झोपू शकले नाहीये.
 
रणबीरनं त्याच्या व्हीडिओत म्हटलं होतं, "उद्याचा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ब्रह्मास्त्रचा ट्रेलर रिलीज होत आहे. या चित्रपटाला आम्ही सगळं काही दिलं आहे... हृदय, रक्त आणि घाम. मी तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रियांची खूप उत्सुकतेनं वाट पाहात आहे.
 
ब्रह्मास्त्र आणि मेगास्टार चिरंजीवी
फॉक्स स्टार स्टुडिओज, धर्मा प्रॉडक्शन्स, प्राइम फोकस आणि स्टारलाइट पिक्चर्सशी निर्मिती असलेल्या ब्रह्मास्त्रसोबत हिंदी फिल्म इंडस्ट्रीसोबतच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतली दिग्गज नावंही जोडली गेली आहेत.
 
मेगास्टार चिरंजीवी ब्रह्मास्त्रच्या तेलुगू व्हर्जनला आवाज देत आहेत.
निर्माता-दिग्दर्शक करण जोहर याने सोमवारी (13 जून) ट्विटरवर पोस्ट शेअर करताना म्हटलं, "चिरंजीवी सर, टीम 'ब्रह्मास्त्र'मध्ये तुमचं स्वागत आहे! चित्रपटाच्या तेलुगू व्हर्जनला तुम्ही आवाज देत आहात. मी तुमचा खूप आभारी आहे आणि माझा सन्मान झाल्यासारखं मला वाटतंय. तुम्ही तुमच्या प्रतिभेनं या कुटुंबाला अजून मजबूत बनवाल."
 
करण जोहरनं चिरंजीवीचा एक व्हीडिओही शेअर केला आहे, ज्यामध्ये चिरंजीवी व्हॉईस ओव्हर देताना दिसत आहेत.