1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: रविवार, 26 मे 2024 (13:27 IST)

अनसूया सेनगुप्ताला कानमध्ये पुरस्कार मिळवून देणारी भूमिका कशी मिळाली?

Anasuya Sengupta
भारतीय अभिनेत्री अनसूया सेनगुप्ता हिला कान फिल्म फेस्टिव्हलच्या अन-सर्टन रिगार्ड श्रेणीमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. तिने बल्गेरियन दिग्दर्शक कॉन्स्टँटिन बोजानोव्ह यांच्या 'द शेमलेस' चित्रपटात काम केलं आहे.
 
या चित्रपटात दिल्लीतील वेश्यालयात काम करणाऱ्या रेणुकाची कथा दाखविण्यात आली आहे, जी एका रात्री पोलिसाचा खून करून फरार होते.
 
रेणुका उत्तर भारतातील वेश्यांच्या समुदायात आश्रय घेते, जिथे तिची भेट देविकाशी होते. देविकाही वेश्या व्यवसायात ढकलली गेली असते.
 
कायदा आणि समाजापासून वाचण्यासाठी रेणुका आणि देविका या दोघी मिळून एका धोकादायक वळणावर निघालेल्या असतात. सगळ्यातून आपली सुटका करून घेणं हाच त्यांचा उद्देश असतो.
 
भारतीय पात्रांवर बनवलेल्या 'द शेमलेस' चित्रपटात दोन प्रमुख पात्र भारतीय महिला आहेत. या चित्रपटात शतकानुशतके जुन्या देवदासी परंपरेची झलकही पाहायला मिळते.
 
सेक्स वर्कर्सच्या जीवनावर अनेक चित्रपट बनवले गेलेत आणि बॉलीवूड चित्रपटांमध्ये सेक्स वर्कर्सची पात्रं छोट्या-मोठ्या भूमिकांमध्ये दिसली आहेत.
 
पण या बल्गेरियन दिग्दर्शकाच्या चित्रपटातील अनसूया सेनगुप्ताला तिच्या जबरदस्त अभिनयामुळे जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक पुरस्कार मिळाला आहे.
 
जादवपूर विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात पदवीधर असलेली अनसूया सेनगुप्ता मूळची कोलकात्याची आहे. अभिनयाच्या जगात करिअर करण्याचं तिनं काही ठरवलं नव्हतं. तिला पत्रकारिता करायची होती.
 
पण 2013 मध्ये तिने मुंबई गाठली आणि चित्रपटांसाठी प्रॉडक्शन डिझायनर म्हणून काम करायला सुरुवात केली.
'माय कोलकाता'ला दिलेल्या मुलाखतीत अनसूया म्हणाली होती, "माझ्या आवडत्या प्रकल्पांमध्ये संजीव शर्मा यांचा सात उचक्के (2016) आणि सृजित मुखर्जीचा 'फॉरगेट मी नॉट' यांचा समावेश आहे."
 
अनसूयाने मुलाखतीत सांगितलं होतं की, 'नशिबामुळे तिच्या आयुष्यात अनेक गोष्टी घडल्या आहेत. जसं की यशदीपला भेटणं आणि नंतर त्याच्याशी लग्न करणं.'
अनसूयाला रेणुकाची भूमिका मिळणं हाही योगायोग होता. या सगळ्याची सुरुवात एका फ्रेंड रिक्वेस्टने झाली.
 
तिने मुलाखतीत सांगितलं की तिला तिचा फेसबुक फ्रेंड बोझानोव्हकडून एका चित्रपटाच्या ऑडिशनसाठी बोलावणं आलं.
 
एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये अनसूयाने लिहिलंय की, "जून 2020 मध्ये कॉन्स्टँटिनने मला मेसेज केला आणि सांगितलं की त्याला त्याच्या आगामी चित्रपट 'द शेमलेस' मधील मुख्य भूमिकेसाठी अनसूयाची ऑडिशन हवी आहे."
 
अनसूयाने तिची ऑडिशन टेप पाठवली आणि कॉन्स्टँटिन बोझानोव्हने तिला चित्रपटाची अभिनेत्री म्हणून निवडलं.
 
या चित्रपटाचे चित्रीकरण नेपाळ आणि मुंबईत झालं आहे
 
व्हरायटीच्या रिपोर्टनुसार, हा पुरस्कार मिळाल्यानंतर अनसूयाने तो भारतातील LGBTQ समुदायाला समर्पित केला आहे.
 
ती म्हणाली, "तुम्हाला समानतेसाठी लढण्यासाठी LGBTQ असण्याची गरज नाही, गुलामगिरी समजण्यासाठी गुलाम होण्याची गरज नाही. आपल्याला केवळ एक मर्यादित व्यक्ती असणं गरजेचं असतं.

Published By- Priya Dixit