1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: रविवार, 26 मे 2024 (13:10 IST)

कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये पायल कपाडियांच्या चित्रपटाला ज्युरी पुरस्कार, छाया कदम यांचाही डंका

भारतीय चित्रपट निर्मात्या पायल कपाडिया यांच्या 'ऑल वी इमॅजिन अॅज लाइट'चित्रपटाला कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये ज्युरी अवॉर्ड (ग्रांप्री) मिळाला आहे.
 
हा चित्रपट समकालीन मुंबई शहरातील पार्श्वभूमीवर आधारित असला तरी, त्यात बॉलिवूड स्टार आणि अब्जाधीश उद्योजकांच्या धनाढ्य मुंबईचं चित्रण पाहायला मिळत नाही.
 
निर्मात्यांनी मुंबई शहरातील गल्ल्यांबरोबरच याठिकाणी इतर शहरांतून आलेल्यांचा आवाज चित्रपटातून सर्वांसमोर आणला आहे. कारण तेच या शहराची ओळख आहेत.
कपाडिया यांची ही पहिली नरेटिव्ह फिचर फिल्म आहे. गुरुवारी रात्री कान फिल्म फेस्टिव्हलच्या मुख्य स्पर्धा गटात हा चित्रपट सादर झाला. चित्रपट संपल्यानंतर याठिकाणी उपस्थित प्रेक्षक जवळपास आठ मिनिटं उभे राहून टाळ्या वाजत होते.
 
फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाला ज्युरी अवॉर्ड मिळाला आहे.
 
हे फक्त चित्रपट निर्मात्यांसाठीच नव्हे तर भारतासाठीचं मोठं यश आहे. गेल्या तीस वर्षांमध्ये पहिल्यांदाच कान फिल्म फेस्टिव्हलच्या मुख्य स्पर्धा गटात भारतीय चित्रपट सादर झाला.
 
या चित्रपटानं दिग्दर्शिका पायल कपाडियाही चर्चेत आल्या आहेत.
 
भारतीय चित्रपटांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार
या पुरस्कारामुळं कपाडिया फ्रान्सिस, फोर्ड कोपोला, योर्गोस लँथिमोस, अली अब्बास, जॅक्स ऑडियार्ड आणि जिया झांगके अशा दिग्दर्शकांच्या यादीत समाविष्ट झाल्या आहेत.
 
गेल्या चार दशकांमध्ये भारतीय चित्रपटांनी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत समाधानकारक कामगिरी केली आहे.
 
1988 च्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये मीरा नायर यांच्या सलाम बॉम्बे चित्रपटानं 'कॅमेरा डी’ओर' पुरस्कार पटकावला होता. 2001 मध्ये 11 सप्टेंबरला झालेल्या हल्ल्याच्या काही दिवसांपूर्वी मीरा नायर यांच्या मॉन्सून वेडिंगनं व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'द गोल्डन लॉयन' पुरस्कार मिळवला होता.
 
दिग्दर्शक रितेश बत्रा यांच्या 2013 मध्ये आलेल्या द लंचबॉक्स या बहुचर्चित चित्रपटानं कान महोत्सवात ‘ग्रँड गोल्डन रेल अवॉर्ड’ मिळवला होता.
 
याचवर्षी सन डान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये शुचि तलाती यांच्या 'गर्ल विल बी गर्ल्स' नं ग्रँड ज्युरी अँड ऑडियंस प्राइज मिळवलं होतं.
भारतात जगात सर्वाधिक चित्रपट तयार होतात. तरीही कानमध्ये 'पाम डी’ओर' किंवा या फिल्म फेस्टिव्हलमधील इतर काही महत्त्वाच्या पुरस्कारांपैकी एक जिंकण्याची शक्यता बॉलिवूडपासून खूप दूर असल्याचं पाहायला मिळतं.
 
पण याचवर्षी कपाडिया यांच्या या खास आणि प्रभावी चित्रपटानं भारतासाठी हा प्रतिष्ठित पुरस्कार पटकावण्याची आशा निर्माण झाली आहे.
 
चित्रपटाबाबतच्या आतापर्यंत समोर आलेल्या प्रतिक्रियांमध्ये चित्रपटाचं प्रचंड कौतुक झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
 
द गार्डियननं चित्रपटाला 5 स्टार रेटिंग दिलं आहे. हा एक उत्तम आणि माणुसकीचं दर्शन घडवणारा चित्रपट असल्याचं त्यात म्हटलं आहे. समीक्षकांनी तर या चित्रपटाची तुलना सत्यजित रे यांच्या महानगर आणि अरण्य दिन-रात्री बरोबर केली आहे.
 
तर इंडि-वायरनं त्यांच्या ए-ग्रेड समीक्षणात हा चित्रपट मुंबईचा एक वेगळा रोमँटिक पैलू दाखवतो असं म्हटलं आहे. लोक एकटे किंवा कुणाच्या साथीनं या शहरातलं आपलं स्थान कसं तयार करतात, हे त्यातून समोर येतं, असं त्यात म्हटलं आहे.
 
दोन नर्सची कहाणी
पायल कपाडिया या चर्चित कलाकार नलिनी मलानी यांच्या कन्या आहेत. मुंबई शहर त्याचं वैविध्य आणि बहुविध संस्कृतीबाबत त्यांना चांगली माहिती आहे.
 
कपाडिया यांच्या मते, "मुंबई शहरात काम करणं हे महिलांसाठी इतर शहरांच्या तुलनेत सोपं आहे."
 
"स्वतःचं घर सोडून कामासाठी दुसरीकडं जाणाऱ्या महिलांबाबत मला चित्रपट तयार करायचा होता."
 
‘इन ऑल वी नो अॅज लाइट’ चित्रपटात कपाडिया यांनी केरळमधून येऊन मुंबई शहराच्या रुग्णालयात काम करणाऱ्या आणि याकाणी एका लहान अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या दोन नर्सचं जीवन दाखवलं आहे.
 
एक नर्स- प्रभा (कानी कुसरूती, गर्ल्स विल बी गर्ल्समध्येही भूमिका केली आहे) विवाहित आहेत. त्यांचे पती जर्मनीत राहतात. त्यांचं एकमेकांशी फार बोलणं होत नाही. पण अचानक एक दिवस पती त्यांना राईस कूकर सरप्राइज गिफ्ट म्हणून पाठवतो. विवाहित जीवनातील प्रेमाची ती अखेरची निशाणी असावी असं त्या कुकरबद्दल त्यांची भावना दाखवण्यात आली आहे.
 
दूसऱ्या नर्स- अनु (दिव्या प्रभा) जरा अधीक धाडसी आहेत. त्या एका तरुण मुस्लीम शियाझ (हृदु हारून) केबरोबर रोमान्स करत आहेत. त्याही केरळच्या आहेत.
 
अनु हिंदू आहेत आणि त्यांचे कुटुंब शियाझ बरोबरचं नातं स्वीकारणार नाही.
 
2.2 कोटींची लोकसंख्या असलेल्या मुंबई शहरात प्रत्येक जण स्थान शोधण्याच्या प्रयत्नात आहे. अशा गर्दीच्या स्थितीत अनु आणि रियाझ यांना खासगी वेळ घालवायलाही जागा मिळत नाही.
 
पण या दरम्यान त्यांच्या रुग्णालयात काम करणाऱ्या तिसऱ्या नर्स पार्वती (ही भूमिका कान महोत्सवात झळकलेल्या छाया कदम यांनी केली आहे.) शहर सोडण्याचा निर्णय घेतात. ज्या राहणारी झोपडपट्टी श्रीमंतांसाठी तयार केल्या जाणाऱ्या पुनर्विकास प्रकल्पांसाठी हटवलं जात असल्यानं त्यांना शहर सोडण्याचा निर्णय घ्यावा लागतो.
 
छाया कदम यांच्या भूमिकेची चर्चा
गेल्या काही दिवसांत विविध भूमिकांमुळं चर्चेत आलेल्या छाया कदम यांनीही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका केली आहे.
 
या चित्रपटात पार्वती नावाच्या नर्सच्या भूमिकेत छाया कदम दिसल्या.
 
विशेष म्हणजे यावर्षीच्या कान्स चित्रपट महोत्सवात छाया कदम यांच्या उपस्थितीनंही सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
 
आईची मराठमोळी नथ घातलेल्या छाया कदम महोत्सवाच्या रेड कार्पेटवर झळकल्या होत्या. त्याची सगळीकडं चर्चा झाली होती.
 
छाया कदम यांनी स्वतः या महोत्सवातील फोटो शेअर करत एआर रेहमान यांच्या बरोबरच्या भेटीबाबत सोशल मीडियावर पोस्ट करून आनंद व्यक्त केला होता.
 
मराठी सिनेसृष्टीतील कसलेल्या अभिनेत्री अशी ओळख असलेल्या छाया कदम यांचा गेल्या काही दिवसांत हिंदी सिनेसृष्टीतही डंका वाजल्याचं पाहायला मिळालं आहे.
 
विशेषतः त्यांच्या मडगाव एक्सप्रेस आणि लापता लेडिज या चित्रपटांतील भूमिकांचं प्रचंड कौतुक झालं.
 
महोत्सवात त्यांच्या चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादामुळं त्या भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. उपस्थितांनी त्यांच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक केल्याचं पाहायला मिळालं.
 
अ नाईट ऑफ नोइंग नथिंग
या सर्वांमुळं या पात्रांचं जीवन बदलण्याची संधी मिळू शकते का?
 
जागेसाठी संघर्ष, राजकारण हे सर्वकाही कपाडिया यांच्या विद्यार्थ्यांच्या संघर्षावरील चित्रपट - अ नाइट ऑफ नोइंग नथिंग- पेक्षा फार काही वेगळा नाही.
या चित्रपटाचं 2022 मध्ये डायरेक्टर्स फोर्टनाइट साइडबार सेक्शनमध्ये सादरीकरण करण्यात आलं होतं. कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटानं माहितीपटांसाठीचा महत्त्वाचा ‘गोल्डन आय’ पुरस्कार जिंकला होता.
 
'अ नाइट ऑफ नोइंग नथिंग' मध्ये देशातील प्रतिष्ठित फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट पुणेमध्ये 2015 मध्ये झालेला विद्यार्थ्यांचा संप दाखवला होता. कपाडियाही या संपात सहभागी होत्या. 2018 मध्ये त्यांनी दिग्दर्शनातील पदवी संपादन केली होती.
 
2022 मध्ये एका मुलाखतीत कपाडिया म्हणाल्या होत्या की, हा चित्रपट ‘सार्वजनिक विद्यापीठं आणि ज्या मूल्यांसाठी त्यांचं अस्तित्व आहे, तसंच ज्याठिकाणी प्रत्येक वर्ग, समाजातील लोक भौतिक आणि बौद्धिक स्वातंत्र्याचा आनंद उपभोगू शकतील, यासाठी लिहिलेलं एक प्रेमपत्र आहे.’
 
अशीच काहीशी भावना ‘ऑल वी इमॅजिन अॅज लाइट’ मध्येही पाहायला मिळते.
 
Published By- Priya Dixit