दुसर्या दिवशी खीर केली. संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली, मुला, मुला, मला आता पोचती कर! ब्राह्मण म्हणू लागला, आजी आजी, तुमच्या कृपेनं मला आता सगळं प्राप्त झालं. आता तुम्हाला पोचती कसे करू? तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीसे होईल? म्हातारी म्हणाली, तू काही घाबरू नको. माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही. ज्येष्ठागौर म्हणतात ती मीच! मला आज पोचती कर! ब्राह्मण म्हणाला, हे दिलेले असंच वाढावं असा काही उपाय सांग! गौरीनं सांगितलं, तुला येताना वाळू देई, ती सार्या घरभर टाक, हांड्यावर टाक, मडक्यांवर टाक, पेटीत टाक, गोठ्यात टाक. असं केलंस म्हणजे कधी कमी होणार नाही.
ब्राह्मणानं बरं म्हटल. तिची पूजा केली. गौर आपली प्रसन्न झाली. तिनं आपलं व्रत सांगितलं. भादव्याच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं. दोन खडे घरी आणावे. ऊन पाण्यानं धुवावे. जेष्ठागौर व कनिष्ठा गौर म्हणून त्यांनी स्थापना करावी. त्यांची पूजा करावी. दुसरे दिवशी घावनगोड तिसरे दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा. सवाष्णीची ओटी भरावी. जेवू घालावं. संध्याकाळी हळदीकुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल. सतत संपत्ती मिळेल. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाच्या दारी, गाईच्या गोठी, पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण.