गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 28 मार्च 2023 (22:24 IST)

GHAR BANDUK BIRYANI - महामानवाचा सहवास लाभलेल्या ज्येष्ठ टी. एन. गायकवाडांची नागराज मंजुळेंनी घेतली भेट

ghar banduk biryani
हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित 'घर बंदूक बिरयानी' हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर असतानाच या चित्रपटाची संपूर्ण टीम महाराष्ट्रात सध्या जोरदार प्रमोशन करीत आहे. झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे प्रस्तुत, आटपाट निर्मित 'घर बंदूक बिरयानी' हा चित्रपट येत्या ७ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार असून, नागराज पोपटराव मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर, सायली पाटील ही संपूर्ण टीम या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाली होती. छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या मिलिंद महाविद्यालयात या चित्रपटाचे प्रमोशन सुरु असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विद्यार्थी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, वयाची नव्वदी पार केलेल्या टी. एन. गायकवाड यांची त्यांच्या स्वगृही जाऊन नागराज पोपटराव मंजुळे यांनी आवर्जून भेट घेतली व त्यांच्यासोबत वेळ घालवला. त्यांच्याशी संवाद साधताना नागराज मंजुळे यांनी टी. एन. गायकवाड यांना एक प्रश्न विचारला; "बाबासाहेबांना तुम्ही हात लावला आहे का?" त्यावर टी. एन. गायकवाड म्हणले; "हो! बाबासाहेबांचे पाय मी नेहमी चेपायचो, त्यांचे पाय खूप मऊ होते." यावरून बाबासाहेबांना किती जवळून अनुभवले आहे याचा प्रत्यय येतो. जाता जाता टी. एन. गायकवाड यांनी स्वहस्ते नागराज पोपटराव मंजुळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनपटावर आधारित पुस्तक भेट म्हणून दिले.
 
नागराज पोपटराव मंजुळे म्हणाले; "बाबासाहेबांचा सहवास लाभलेल्या व्यक्तीची भेट होणे ही माझ्यासाठी फार मोलाची गोष्ट आहे. टी. एन. गायकवाडांसोबत बोलताना मला त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कसे होते हे जाणून घेता आले. इतक्या थोर व्यक्तीचे आशीर्वाद आमच्या चित्रपटाला मिळणे हे आमच्यासाठी फार अभिमानास्पद आहे."