1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 13 फेब्रुवारी 2017 (11:21 IST)

शिल्पा नवलकर साकारणार दुष्यंतची आई

shilpa navalkar
एखादी विशिष्ट भूमिका करण्यासाठी कलाकाराची निवड केली जाते. शूटिंगही सुरू होतं.. पण, अचानक त्या कलाकाराची आयुष्याच्या रंगमंचावरूनच एक्झिट होते. सर्वांना दु:खद धक्का बसतो. पण 'शो मस्ट गो ऑन' या उक्तीसारखं शूटिंग पुन्हा नव्या दमाने, नव्या कलाकाराला घेऊन सुरू होतं. पण, अशा घटनेनंतरचे ते सुरुवातीचे काही क्षण भावनांचा कल्लोळ माजवतात. अशाच एका काळजाला चटका लावून गेलेल्या अनुभवाविषयी अभिनेत्री शिल्पा नवलकर यांनी आपलं मन मोकळं केलं.
 
स्टार प्रवाहवर सध्या सुरू असलेल्या दुहेरी या मालिकेत एक चांगलाच ट्विस्ट येणार आहे. दुहेरीचा नायक दुष्यंत याच्या भूतकाळातलं एक मोठं सत्य बाहेर येणार आहे. दुष्यंत या व्यक्तिरेखेची आत्या हीच त्याची खरी आई असल्याचं सत्य बाहेर येणार आहे. त्यामुळे त्याच्या आत्याची भूमिका करण्यासाठी अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांची निवड करण्यात आली होती. काही भागांचं शूटिंगही करण्यात आलं होतं. पण, नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. अश्विनी एकबोटेंच्या अकाली निधनामुळे त्यांची भूमिका आता शिल्पा नवलकर करणार आहेत. या भूमिकेविषयी आपला अनुभव शेअर करताना शिल्पा नवलकर म्हणाल्या की, ‘हा रोल जेव्हा माझ्याकडे आला तेव्हा त्या रोलवर अश्विनीची छाप होती.
ती माझी खूप जुनी मैत्रीण होती. त्यामुळे तिला श्रद्धांजली देण्यासाठी मी हा रोल स्वीकारला. पण, माझ्या मनात कोणतीही तुलना आली नाही. कारण, मी आणि संपूर्ण टीमने हे मनातून काढून टाकलं होतं की हा रोल पूर्वी एक वेगळी अभिनेत्री करत होती. त्यामुळे संपूर्ण पाटी कोरी करून आम्ही नव्याने या भूमिकेला सुरुवात केली. मन घट्ट करून मी या भूमिकेसाठी मेकअपला बसले. मेकअप दादांनी मेकअपची सुरुवात करताना लावतात तसं बेसचं एक बोट माझ्या कपाळावर लावलं. ते बोट लागताक्षणीच माझ्याही नकळत माझे डोळे भरून वाहायला लागले. त्यामुळे मेकअपदादांना मी थोडा वेळ थांबायला सांगितलं. अश्विनीची त्यावेळी मला खूप आठवण आली. एक कलाकार म्हणून आणि माणूस म्हणूनही हा प्रसंग मी कधीच विसरू शकणार नाही.’