रविवार, 21 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 9 फेब्रुवारी 2023 (15:47 IST)

जडेजाची धमाकेदार गोलंदाजी

भारतीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ यांच्यात नागपुरात खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
 
त्यांचा पहिला डाव 177 धावांवर संपला. ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लबुशेनने सर्वाधिक (49) धावा केल्या. दुसरीकडे भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. रविचंद्रन अश्विनच्या खात्यात 3 विकेटही जमा झाल्या.
 
ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण भारतीय गोलंदाजांनी त्याला चुकीचे सिद्ध केले. मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांनी डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा या दोन्ही सलामीवीरांना अवघ्या 2 धावांच्या स्कोअरवर बाद केले. दोघांनाही एकच धाव करता आली. यानंतर स्टीव्ह स्मिथ (37) आणि लॅबुशेन (49) यांनी डावाची धुरा सांभाळली, पण उपाहारानंतर दोघेही बाद झाले. याशिवाय पीटर हँड्सकॉम्बने 31 धावा केल्या.
 
अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या डावात मोठी कामगिरी केली. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 450 बळी पूर्ण केले आहेत. यष्टिरक्षक फलंदाज अॅलेक्स कॅरी हा त्याचा 450 वा बळी ठरला आहे. उजव्या हाताचा फिरकी गोलंदाज अश्विन हा हा टप्पा गाठणारा भारताकडून दुसरा गोलंदाज ठरला आहे. तसेच तो कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा दुसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला आहे. केवळ अनिल कुंबळेने (619) त्याच्यापेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत.
 
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने वॉर्नरची विकेट घेताच एक मोठी कामगिरी आपल्या नावावर केली. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 बळी पूर्ण केले आहेत. भारताकडून 400 बळी पूर्ण करणारा तो पाचवा वेगवान गोलंदाज ठरला आहे. कपिल देव (687) हे भारताकडून सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज आहेत. झहीर खान (610), जवागल श्रीनाथ (551) आणि इशांत शर्मा (434) यांचाही या यादीत समावेश आहे.
 
रवींद्र जडेजाने हा पराक्रम केला
कसोटी संघात पुनरागमन करणाऱ्या जडेजाने अप्रतिम गोलंदाजी करताना 5 बळी घेतले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात कसोटी सामन्यात 50 बळी घेणारा तो चौथा भारतीय गोलंदाज ठरला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या कसोटीत जडेजाने तीन वेळा एका डावात 5 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. हरभजन सिंगने भारतात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. त्याने 14 कसोटीत 86 बळी घेतले आहेत.