गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: गुरूवार, 19 ऑक्टोबर 2023 (10:56 IST)

'लोक म्हणायचे इथे भुतं आहेत, पण इतक्या मोठ्या दफनभूमीच्या शेजारी राहतो याची कल्पना नव्हती'

kachha gujarat
जगातील सर्वांत प्राचीन नागरी संस्कृतीशी संबंधित भारतातील एका विस्तीर्ण दफनभूमीच्या संशोधन कार्याला शास्त्रज्ञांनी सुरुवात केली आहे.
 
इथल्या अवशेषांवर केलेल्या संशोधनातून अगदी प्रारंभिक काळात भारतीय कसे जगले आणि मृत्यूमुखी पडले याचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न बीबीसीच्या सौतिक बिस्वास यांनी केला आहे.
 
2019 मध्ये शास्त्रज्ञांनी भारताच्या पश्चिमेकडील गुजरात राज्यात पाकिस्तानपासून नजिक कच्छ प्रदेशातील तुरळक लोकसंख्या असलेल्या दुर्गम गावाजवळ वाळूच्या ढिगाऱ्यांचं उत्खनन सुरू केलं तेव्हा संशोधकांना याबाबत पुसटशी कल्पनादेखील नव्हती.
 
"जेव्हा आम्ही उत्खननाला सुरुवात केली तेव्हा आम्हाला वाटलं की ही एक प्राचीन वस्ती आहे. आठवडाभरातच आमच्या लक्षात आलं की ही एक दफनभूमी आहे," असं संशोधनाचं नेतृत्व करणाऱ्या केरळ विद्यापीठातील पुरातत्वशास्त्रज्ञ राजेश एस.व्ही यांनी सांगितलं.
 
40 एकर जमिनीवर आत्तापर्यंत 150 हून अधिक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांचा समावेश असलेली तीन उत्खनन शिबिरं आयोजित केली गेली आहेत.
 
जगातील सर्वांत प्राचीन नागरी संस्कृतींपैकी एक असलेल्या सिंधू संस्कृतीची किमान 500 थडगी इथं असल्याचा अंदाज संशोधकांनी वर्तवला आहे. (यापैकी सुमारे 200 थडग्यांचं उत्खनन करण्यात आलं आहे.)
 
आताच्या उत्तर-पश्चिम भारत आणि पाकिस्तानमधील सुमारे 5,300 वर्षांपूर्वी भिंतीच्या, भाजलेल्या-विटांच्या प्रारंभिक शहरामध्ये राहणाऱ्या साध्या शेतकरी आणि व्यापा-यांच्या वसाहतीला हडप्पा संस्कृतीच्या नावानं ओळखलं जातं.
 
प्राचीन नागरी संस्कृतीचा शोध लागल्यापासून संशोधकांनी गेल्या शंभर वर्षांत भारत आणि पाकिस्तानमधील तब्बल 2,000 जागा शोधून काढल्या आहेत.
 
शास्त्रज्ञांच्या मते गुजरातमधील खाटिया गावाजवळील विस्तीर्ण दफनभूमी ही आत्तापर्यंत सापडलेल्या नागरी संस्कृतीपैकी सर्वांत मोठी ‘पूर्व शहरी’ दफनभूमी असू शकते. त्यांचा विश्वास आहे की, ती सुमारे 500 वर्षं वापरात होती, जी इसवी सन पूर्व 3200 ते इसवी सन पूर्व 2600 या दरम्यानच्या काळातील म्हणजेच सुमारे 5,200 वर्षांपूर्वीची सर्वांत जुनी दफनभूमी असू शकते.
 
आतापर्यंत केलेल्या उत्खननात एकच अखंड नर मानवी सांगाडा, तसंच कवटीचे तुकडे, हाडं आणि दात यांसह अर्धवट जतन केलेल्या सांगाड्याचे अवशेष सापडले आहेत.
 
उत्खननात दफन केलेल्या 100 पेक्षा जास्त बांगड्या आणि शिंपल्यांपासून बनवलेले 27 मणी असा कलाकृतींचा संग्रह देखील त्यांना सापडला आहे.
 
सिरॅमिकची भांडी, वाट्या, ताटं, लहान घागरी, चंचुपात्र, मातीची भांडी, पेले, बाटल्या आणि बरण्या सापडल्या आहेत. किरकोळ खजिन्यांमध्ये अर्ध-मौल्यवान दगड आणि नीलमण्यांचा समावेश आहे.
 
ही थडगी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहेत. वेगवेगळ्या दिशांना तोंड असलेल्या वालुकाश्म खडकाच्या नळ्या यामध्ये सापडल्या आहेत. यामध्ये काही अंडाकृती तर इतर आयताकृती आकाराच्या आहेत.
 
काही छोट्या दफनभूमी आहेत जिथे मुलांना दफन करण्यात आलं होतं. मृतदेह सरळ ठेवलेले दिसतात, परंतु क्षारयुक्त मातीमुळे बहुतांश हाडांचं विघटन झालेलं आहे.
 
मिशिगनच्या अल्बिओन कॉलेजमधील मानववंशशास्त्राचे प्राध्यापक ब्रॅड चेस म्हणतात, "हा एक अतिशय महत्त्वाचा शोध आहे."
 
"गुजरातमध्ये अनेक पूर्व-शहरी दफनभूमींचा शोध लागला आहे, परंतु ही आजवरची सर्वांत मोठी दफनभूमी आहे आणि यामध्ये विविध प्रकारच्या दफनभूमींची रहस्यं उलगडण्याची क्षमता आहे, ज्यामुळे पुरातत्वशास्त्रज्ञांना या प्रदेशातील पूर्व-शहरी समाज अधिक सखोलपणे समजून घेण्यास मदत होईल, तसंच पूर्वी शोध लागलेल्या इतर छोट्या दफनभूमींबाबत यातून महत्त्वाचे संदर्भ मिळण्यास मदत होते," असं प्राध्यापर चेस म्हणतात.
 
आजघडिला पाकिस्तानात असलेल्या पंजाब प्रांताच्या सिंधू खोऱ्यातील यापूर्वीच्या उत्खननातून सिंधू लोकांच्या दफन पद्धतींबद्दल काही पुरावे सापडतात.
 
इजिप्त आणि मेसोपोटेमियामधील उच्चभ्रू लोकांमध्ये अंत्यसंस्काराला विशेष महत्त्व नव्हतं. मृत्यूनंतर कोणतेही दागिने आणि शस्त्रं मृतदेहासोबत ठेवली जात नसत. येथील बहुतेक मृतदेह कापडाच्या आच्छादनात गुंडाळलेले आणि आयताकृती लाकडी शवपेटीमध्ये ठेवलेले आहेत.
 
सिंधू संस्कृतीचे अभ्यासक असलेल्या विस्कॉन्सिन-मॅडिसन विद्यापीठाचे जोनाथन मार्क केनॉयर यांच्या म्हणण्यानुसार, शवपेटी खड्ड्यात ठेवण्यापूर्वी खड्डा अनेकदा मातीच्या भाड्यांनी भरलेला आढळतो.
 
काही लोकांसोबत इतरांना दिले जाऊ शकत नाहीत असे खाजगी दागिने - बांगड्या, मणी, ताईतासह पुरण्यात आले होते. काही महिलांना तांब्यापासून बनवलेल्या आरशासह पुरण्यात आलं होतं.
 
प्रौढांना अन्न वाढण्यासाठी आणि साठवण्याच्या विविध प्रकारच्या भांड्यांसह आणि काही विशिष्ट दागिन्यांसह दफन करण्यात आलं होतं. शिंपल्यांच्या बांगड्या सामान्यत: प्रौढ महिलांच्या डाव्या हातावर आढळतात. अर्भक आणि बालकांना सहसा कोणतीही भांडी किंवा दागिन्यांसह पुरले जात नव्हतं.
 
थडग्यांमध्ये भरपूर संपत्ती असल्याचा कोणताही पुरावा नव्हता आणि मृतदेहांच्या शारीरिक स्थितीवरून असं लक्षात येतं की बहुतेक लोक "चांगला आहार घेणारे आणि निरोगी होते, तर काहींमध्ये संधिवात आणि शारीरिक तणावाच्या खुणा दिसत होत्या".
 
पण तरीही गुजरातमधील मोठ्या दफनभूमीचं रहस्य अद्याप उलगडणं बाकी आहे.
 
शास्त्रज्ञांना अपघातानेच हा शोध लागला होता. 2016 मध्ये एक गावप्रमुख जो गाडीचा चालक म्हणूनही काम करत असे, तो केरळ विद्यापीठाच्या पुरातत्वशास्त्राच्या विद्यार्थ्यांच्या टीमला घेऊन जात होता जेव्हा त्याने ही जागा दाखवली होती.
 
अवघ्या 400 लोकसंख्येचं हे छोटे गाव, खाटियापासून फक्त 300 मीटर (985 फूट) अंतरावर होतं, जिथले लोक उदरनिर्वाहासाठी पावसावर अवलंबून असलेल्या शेतात भुईमूग, कापूस आणि एरंडेल पिकवायचे. त्या शेतकऱ्यांच्या शेताखाली ही दफनभूमी होती.
 
"पावसानंतर मातीच्या भांड्यांचे तुकडे आणि इतर सामान जमिनीच्या पृष्ठभागावर येताना दिसायचे. काही लोक म्हणत की इथे भुतं आहेत. पण इतक्या मोठ्या दफनभूमीच्या शेजारी आम्ही राहतो याची आम्हाला कल्पना नव्हती," असं माजी सरपंच नारायण भाई जाजानी म्हणाले.
 
"दरवर्षी जगभरातील शास्त्रज्ञ आमच्या गावाला भेट देतात आणि इथे दफन करण्यात आलेल्या लोकांबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करतात."
 
एकाच ठिकाणी मोठ्या संख्येने लोकांना दफन करण्यात आल्याने दफनभूमीच्या जागेच्या महत्त्वाबद्दलही प्रश्न निर्माण होतात. जवळपासच्या वसाहतींमधील लोकांसाठी सामूहिक दफनभूमी म्हणून त्याचा वापर होत असे, की आजूबाजूला एखादी मोठी लोकवस्ती असल्याचे संकेत यातून मिळतात?
 
शिवाय, या थडग्यांमध्ये सापडलेल्या नीलमण्यांचा सर्वांत जवळचा स्त्रोत दूर अफगाणिस्तानात सापडतो.
 
हे ध्यानात घेता भटक्या विमुक्तांसाठी एक पवित्र स्मशानभूमी म्हणून ती कार्यरत असेल का? किंवा ती "पर्यायी" दफनभूमी म्हणून कार्यरत होती का, जिथे मृत व्यक्तीच्या अस्थी स्वतंत्रपणे दफन केल्या जात होत्या?
 
केरळ विद्यापीठातील पुरातत्व शास्त्रज्ञ अभयन जी.एस. सांगतात, "आम्हाला अजूनही याबाबत पूर्ण माहिती नाही. अद्याप आजूबाजूच्या परिसरात वस्ती सापडलेली नाही. आम्ही अजूनही उत्खनन करत आहोत."
 
श्री केनोयर म्हणतात की त्यांना खात्री आहे की "दफनभूमीशी संबंधित काही वस्त्या असाव्यात, परंतु त्या कदाचित आधुनिक वस्त्यांच्या खाली दबलेल्या आहेत किंवा आतापर्यंत त्यांचा शोध लागलेला नाही."
 
चांगल्या दर्जाच्या दगडी भिंतींनी दफनभूमीची करण्यात आलेली बांधणी हेच सूचित करतात की, लोक दगडाने बांधलेल्या इमारतींशी परिचित होते आणि अशा दगडी इमारती आणि भिंतींच्या वस्त्या स्मशानभूमीपासून 19-30 किमी (11-18 मैल) अंतरावर आढळतात.
 
मानवी अवशेषांचा अधिक रासायनिक अभ्यास आणि डीएनए चाचण्या केल्यास इथं वास्तव्य केलेल्या आणि मरण पावलेल्या काही प्राचीन भारतीयांबद्दल आम्हाला अधिक माहिती मिळू शकेल.
 
सिंधू संस्कृतीची रहस्यं टिकून आहेत: उदाहरणार्थ, लेखनाविषयीची गुपितं अद्याप उलगडलेली नाही.
 
या हिवाळ्यात खटियाजवळील दफनभूमीच्या उत्तरेकडील जागेचं उत्खनन करण्याची शास्त्रज्ञांची योजना आहे.
 
जर त्यांना काही सापडले तर कोड्याचा एक भाग सोडवला जाईल. जर तसं नाही झालं तर ते उत्खनन सुरूच ठेवतील.
 
"आम्हाला आशा आहे की एकेदिवशी आम्हाला काही प्रश्नांची उत्तरं नक्की मिळतील," असं राजेश म्हणतात.