Festival Posters
✕

महाविकास आघाडी सरकारला बसले दोन जोरदार धक्के

Updated: मंगळवार, 2 नोव्हेंबर 2021 (16:25 IST)
 
अनिल देशमुख यांना आज पहाटे झालेली अटक ही कधीतरी होणारच होती, मात्र अनिल देशमुख गेली ५ महिने ती अटक टाळण्याचा प्रयत्न करत होते, त्यासाठी त्यांनी एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटने समन्स पाठवूनही ते चौकशीला जात नव्हते, गेल्या सहा महिन्यांपासून ते परागंदा अवस्थेत होते, मतदारसंघातही  फिरकले नव्हते, काही राजकीय संघटनांनी त्यांच्या विरोधात बेपत्ता असल्याची पोलिसात तक्रार नोंदवण्याइतपतही प्रकरण गेले होते. दरम्यान त्यांची निवासस्थाने आणि इतर मालमत्ता यांच्यावर सीबीआय आणि ईडी यांनी छापेही घातले होते, त्यांचे दोन स्वीय सहायक आजही अटकेत आहेत. तरीही अनिल देशमुख अटक टाळण्याचा प्रयत्न करत होते, सर्व उपाय थकल्यावर नाईलाजाने ते ईडी कार्यालयात चौकशीला गेले, १३ तास चौकशी झाल्यावर त्यांना अटक झाली आहे, बहुदा त्यांची दिवाळी तुरुंगातच साजरी होईल असा कयास आहे.
 
अनिल देशमुखांना अटक होण्यामागे नेमके कारण कोणते याचाही विचार होणे गरजेचे आहे. अनिल देशमुख महाराष्ट्राचे गृहमंत्री होते, त्यांच्या काळात अंबानींच्या बंगल्यासमोर स्फोटके ठेवण्याचे प्रकरण घडले, त्यात सचिन वाझे नामक पोलीस अधिकारी गुंतला असल्याचे पुढे आले, याच प्रकरणात पुढे एक खूनही झाला, त्यात सचिन वाझेला अटक झाली, या प्रकरणाचा ठपका ठेवत मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांची  पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आली, यामुळे दुखावलेल्या परमवीर सिंहांनी अनिल देशमुखांवरच थेट आरोप केले, अनिल देशमुखांना मुंबई पोलिसांकडून मुंबईतील बार मालकांकडून दरमहा १०० कोटी रुपये वसूल करून हवे होते, ते काम देशमुखांनी सचिन वाझे यांच्यावर सोपवले होते, असा आरोप परमवीर सिंह यांनी केला. हे प्रकरण पुढे न्यायालयात गेले, आणि त्यामुळे अनिल देशमुखांना गृहमंत्रीपदाचा  राजीनामा द्यावा लागला. न्यायालयाच्याच आदेशाने हे प्रकरण ईडीकडे सोपवले गेले, तिथून पुढले सगळे नाट्य घडत गेले आणि त्याचा शेवट देशमुखांना अटक करून झाला आहे.
 
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या निकटस्थ नातलगांच्या बेनामी मालमत्ता जप्त होणे, हेदेखील गंभीर प्रकरण म्हणावे लागेल. पश्चिम महाराष्ट्रातील जरंडेश्वर साखर कारखाना अजित पवार भागधारक असलेल्या कंपनीने कवडीमोल भावात विकत घेतल्याचा आरोप झाला होता, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी  केंद्रीय तपासयंत्रणांनी अजित पवार आणि त्यांचे नातेवाईक यांच्या घर आणि कार्यालयांवर छापे घातले होते, त्यातून  मिळालेल्या माहितीच्या आधारे या बेनामी मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. या मालमत्ता बेनामी कश्या नाहीत हे सर्व संबंधितांना पुढील ९० दिवसात सिद्ध करायचे आहे, ते सिद्ध करू शकले तर त्या मालमत्ता वापस मिळतील अन्यथा मालमत्ता सरकारजमा होतीलच पण संबंधितांना  कडक कारवाईला सामोरेही  जावे लागू शकेल.
 
भारतीय समाजजीवनात फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळला असल्याचा आरोप केला जातो, पोलीस खाते, महसूल, उत्पादन शुल्क, सार्वजनिक बांधकाम, सिंचन ही सर्वच खाती भ्रष्टाचाराचे आगार समजले जातात. त्यामुळे या खात्यांमध्ये नोकरी आणि मलईदार पोस्टिंग मिळवण्यासाठीही  किंमत  मोजावी लागते, ही किंमत ते अधिकरी वसूल करत असतात, पोलीस खात्यात मलईदार पोस्टिंग मिळवण्यासाठी कोट्यवधी रुपये  मोजावे लागतात, असे बोलले जाते. ही रकम हस्ते परहस्ते राजकारण्यांपर्यंत पोहोचत असते.
 
राजकारणातही सत्ताधारी पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा मोजावा लागतो, अशी चर्चा आहे. त्याशिवाय निवडणुकीला लागणार खर्च वेगळाच असतो. मग निवडून येणारा  लोकप्रतिनिधी जनतेकडून आणि अधिकाऱ्यांकडून पैसा काढत असतो, यातूनच आपल्या देशात मोठ्या प्रमाणात काळा पैसा उभा राहत असतो. नोव्हेंबर २०२० मध्ये महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने विधानपरिषदेत राज्यपालांनी नियुक्त करायच्या  १२ आमदारांची यादी मंजूर करून राज्यपालांकडे पाठवली होती, त्यावेळी मुंबईतील एका काँग्रेस पदाधिकार्यांचा व्हिडीओ आणि त्याने राज्यपालांना  लिहिलेले पत्र समाजमाध्यमांवर व्हायरल झाले होते, त्यात काँग्रेस पक्षाने जी ४ नावे पाठवली त्या प्रत्येकाकडून पक्षाने ५ कोटी रुपये घेतल्याचा  आरोप करण्यात आला होता, या प्रकरणात पुढे काय झाले, ते कळले नाही मात्र राज्यपालांनी अद्यापही त्या प्रस्तावावर सही केलेली नाही, जर सही झाली असती तर आरोपकर्त्याने पुढे पाठपुरावाही केला असता.
हे मुद्दे बघता आपल्याकडे प्रशासन आणि राजकीय व्यवस्थेत भ्रष्टाचार किती बोकाळला आहे, हे स्पष्ट दिसून येते. जर आमदार व्हायला ५ कोटी रुपये मोजावे लागणार असतील तर  आमदार झाल्यावर हे ५ कोटी आणि नंतरचे २५ कोटी वसूल केले जाणारच त्यातूनच हा भ्रष्टाचार वाढतो आणि काळया पैश्याची  समांतर अर्थव्यवस्था उभी राहते.
 
राज्यातील महाआघाडी सरकार हे अनैतिकतेच्या आधारावरच उभे राहिलेले सरकार असल्याचे बोलले जाते. या महाआघाडीतील दोन पक्ष आधी सत्तेपासून  ५ वर्ष दूर होते, आताही हे सरकार किती टिकेल  ही भीती आहेच, तसेही राजकारणातला कुणीही धुतल्या तांदळाइतका स्वच्छ नसतो अश्यावेळी  अनैतिकतेच्या आधारावर सरकार उभे झाले असल्यामुळे विरोधक जास्तच आक्रमक आहेत. त्यातून अशी प्रकरणे बाहेर काढून अडचणीत आणणे  सुरु झाले आहे. आतापर्यंत अनेक मंत्र्यांवर वेगवेगळे आरोप झाले, संजय राठोड, यांना राजीनामाही द्यावा लागला मात्र अटक कुणाला झाली नव्हती  त्याचबरोबर कुणाची मालमत्ताही जप्त झाली नव्हती अजूनही अनेकांवर नवेनवे आरोप होत आहेत, आज अनिल देशमुख यांना अटक आणि  अजित पवारांची जप्त झालेली मालमत्ता हे महाविकास आघाडीला बसलेले दोन धक्के आहेत अजून किती धक्के बसतात याचे उत्तर  काळच देणार आहे.
 
अविनाश पाठक   

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

महाराष्ट्रात दुष्काळाचे संकट, अधिकारी लंडन दौऱ्यावर? आदित्य ठाकरेंचा उदय सामंत यांना सवाल

LIVE: दुष्काळाच्या काळात अधिकाऱ्यांच्या लंडन दौऱ्यावरून आदित्य ठाकरे यांचा उदय सामंतांना प्रश्न

खाजगी ट्रॅव्हल्समधून अवैध वसुली केल्याप्रकरणी एपीआय रवींद्र शेडगे यांचे निलंबन

चंद्रपूर येथील सैनिक शाळेतील पाचवीच्या एका विद्यार्थ्याचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू

दिल्लीत सीजेपीच्या आंदोलनामुळे पश्चिम रेल्वे कडून अनेक गाड्या रद्द

पुढील लेख
Show comments