मोदी सरकारने खासदार निधी बंद केला तरी, अजितदादा खंबीरपणे आपल्या पाठिशी – डॉ. अमोल कोल्हे
भोसरी विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी विशेष प्रयत्न करुन राज्य सरकारकडून चार कोटी रुपयांचा विकास निधी आणला. त्या निधीतून भोसरी, तळवडे, रुपीनगर, चिखली, मोशीत रस्त्यांचे करण्यात येणारे डांबरीकरण, काँक्रीटीकरण, फुटपाथाच्या कामाचे भूमिपूजन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले.
खासदार निधी बंद असतानाही तीव्र इच्छाशक्तीच्या जोरावर कोल्हे यांनी भोसरीतील विकास कामांची घौडदौड थांबू नये यासाठी राज्य सरकारकडून विकास निधी आणला. मोदी सरकारने खासदार निधी बंद केला असला. तरी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे खंबीरपणे आपल्या पाठिशी आहेत. राज्य सरकारच्या माध्यमातून विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे डाॅ. कोल्हे यावेळी म्हणाले.
कोरोनामुळे केंद्र सरकारने खासदार निधी बंद केला. खासदार निधी बंद असला तरीही भोसरीतील विकास कामे रखडू नयेत यासाठी खासदार डॉ. कोल्हे यांनी राज्य सरकारकडे विशेष पाठपुरावा केला. इच्छाशक्तीच्या जोरावर नागरिकांच्या मागणीनुसार त्यांनी निधी खेचून आणला.
दरम्यान, महापालिका क्षेत्रात मुलभूत सोयी सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेअंतर्गत नगरविकास खात्याने 4 कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर केला आहे. त्यातून भोसरी विधानसभा मतदारसंघातील विविध भागातील रस्त्यांचे डांबरीकरण, काँक्रीटीकरण, अंतर्गत रस्ते, फुटपाथ, समाविष्ट गावात रस्ते, ओपन जीम बसवणे, अंतर्गत पाईप लाईन टाकणे, गल्ली बोळ रस्त्यांची सुधारणा याअंतर्गत केली जाणार आहे.
निधी मंजूर झालेल्या या विविध विकास कामांचे डाॅ. कोल्हे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) च्या माध्यमातून ही कामे केली जात आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने खासदार डॉ. कोल्हे यांनी भोसरी मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
दरम्यान, भोसरीकरांसाठी इतर विकास कामांच्या बरोबरीने कोरोना लसीकरणाकडे सुद्धा प्रामुख्याने लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. यामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीचे 50 हजार डोस पहिल्या टप्प्यात उपलब्ध करुन दिले. त्यातून नागरिकांचे लसीकरण सुरु आहे. दुस-या टप्यात आणखी डोस दिले जाणार आहेत.