शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मराठी दिन
Written By वेबदुनिया|

मराठी खरोखरच डाऊनमार्केट आहे काय?

मराठी साहित्य संमेलन सुरू होऊन दुसरे शतक उलटले तरी मराठीच्या 'मुमूर्षू'पणाची चिंता काही सरलेली नाही. दर अधिवेशनात मराठीसंदर्भात चिंता व्यक्त करणारा एक तरी परिसंवाद ठेवण्याची प्रथा पाळली जाते आहेच. दुसरीकडे राजकीय आखाड्यातही मराठी हे 'हॉट' मार्केट झाली आहे. दोन राजकीय पक्ष तिने जन्माला घातले आहेत. त्यांनी मराठीचा 'परवाना' फक्त आपल्याकडेच असा दावा केला आहे. त्यांना शह देण्यासाठी इतर प्रस्थापित पक्षही अधून-मधून 'आम आदमी' आणि 'भगवे' मुखवटे बाजूला काढून 'मी मराठी'चा गजर करताना दिसतात. त्यात गेल्या दोन ते तीन वर्षांत तर मराठीवरून रण माजले आहे.

हे रण भलेही स्वतःची राजकीय जागा शोधण्यासाठी उभे केलेले असले तरी कुणीही दुर्लक्षित करण्याएवढी मराठी भाषेची अधोगती झाली आहे काय? की शहरांत दिसणारे चित्र म्हणजे समस्त मराठी भाषक जनतेचे प्रातिनिधीक चित्र मानले गेले आहे? जागतिक पातळीवर नि राष्ट्रीय पातळीवरही मराठीची नेमकी स्थिती काय आहे? त्याकडे एक नजर टाकूया.

नुसती भाषा म्हणून बघायचे झाल्यास जगभरात मराठी भाषकांची संख्या अदमासे नऊ कोटीच्या आसपास आहे. याचा अर्थ युरोपातल्या अनेक स्वतंत्र भाषक राष्ट्रांची लोकसंख्याही तेवढी नाही. जागतिक मानांकनात मराठीचा क्रमांक पंधरावा आहे. महाराष्ट्राची राजभाषा असलेली मराठी गोव्याची सह राजभाषा आहे. शिवाय दमण-दीव व दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातही तिला सह राजभाषेचा दर्जा आहे. भारतीय राज्यघटनेतील बावीस अधिकृत भाषांत मराठी आहे.

महाराष्ट्राव्यतिरिक्त गोव्यात मराठी मोठ्या प्रमाणात बोलली जाते. त्याशिवाय मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, दिल्लीClick here to see more news from this city या राज्यातही मराठी भाषकांची संख्या मोठी आहे. तमिळनाडू, केरळमध्येही काही प्रमाणात मराठी भाषक आहेत. उत्तर प्रदेश, राजस्थानातही मराठी भाषक आहेत. बाहेरच्या देशांत अमेरिका, ग्रेट ब्रिटन, ऑस्ट्रेलिया यासह इतर अनेक देशांत मराठी भाषक मोठ्या प्रमाणात आहेत. केवळ भाषेच्या आधारावरच मराठी भाषकांची एवढी संख्या पाहिल्यानंतर त्यांच्या सर्व प्रकारच्या गरजा भागविणारी एक व्यवस्था आहेच की. राजकारणी आणि प्रशासन भाषेबाबत उदासीन असले तरी नऊ कोटी लोकांच्या मार्केटकडे कोणत्याही व्यावसायिक व्यक्तीला दुर्लक्ष करता येणार नाही.

म्हणूनच अगदी मनोरंजनाच्या दुनियेत पाहिले तरी मराठीत आजमितिस दहा उपग्रह चॅनेल्स आहेत. त्यात सात रंजनात्मक आणि तीन पूर्णवेळ बातम्यांची चॅनेल्स आहेत. ही सर्व चॅनेल्स आता जवळपास सर्व डीटीएच कंपन्यांना घ्यावी लागली आहेत. याशिवाय लोकल आणि काही शहरांपुरीत चालणारी चॅनेल्स वेगळी. याशिवायही इतर अनेक चॅनेल्स आता येऊ घातली आहेत. मराठी प्रेक्षकांच्या दबावामुळे झी, स्टार यांना मराठीत उतरावे लागले, तेही रंजन आणि बातम्या या दोन्ही विभागात. शिवाय ही चॅनेल्स जोरदार चालत असल्याने आता मराठी घरांत हिंदी वाहिन्या बघण्याचे प्रमाण कमी झाले आहे. याचा अर्थ या वाहिन्यांना स्वतःचा बांधिल प्रेक्षक वर्ग मिळाला आहे. सहाजिकच जाहिरातदारांनाही याची दखल घेऊन या वाहिन्यांना जाहिराती द्याव्या लागल्या आहेत. त्याही त्यांच्या मराठी भाषेत. ही मराठी भाषकांची ताकदच नाही काय?

राज्याच्या जवळपास सर्व शहरांत एफएम सेवा सुरू झाली आहे. एकेका शहरांत एकापेक्षा जास्त एफएम स्टेशन्स आहेत. मुंबईClick here to see more news from this city व पुणे वगळता बहुतांश ठिकाणी एफएम स्टेशन्स मराठीतून चालवली जातात. भलेही त्यावरची गाणी हिंदी असली तरी त्यांना मराठीला डावलणे शक्य झालेले नाही. आता मराठी संगीतालाही नवी संजीवनी लाभल्याने मराठी गाणीही त्यांना ऐकवावी लागणार आहेत. काही ठिकाणी ती ऐकवली जाताहेत. किंबहूना स्वतंत्र मराठी एफएम ही अद्याप मोकळी जागा आहे. तिथे अजूनही संधी आहे. नजिकच्या काळात एखादा अमराठी उद्योजक यात उतरला तर आश्चर्य वाटायला नको.

मराठी चित्रपटांचा झेंडा तर गेल्या काही वर्षांपासून डौलाने फडकू लागला आहे. याचे दोन थेट परिणाम झाले. एक तर मराठीतील गुणवान दिग्दर्शकांसह तांत्रिक चमूला हिंदीत म्हणजे राष्ट्रीय पातळीवर संधी मिळाली आहे. त्याशिवाय मराठीत दर्जेदार चित्रपट बनू लागल्याने हिंदीतील चित्रपट निर्मिती कंपन्या मार्केट लक्षात घेऊन मराठीत उतरल्या आहेत. झी टॉकीजने स्वतःच्या बळावर चित्रपट काढून ते यशस्वी करून दाखवले. त्यानंतर इरॉस, एबी कॉर्प्स, मुक्ता आर्टस यासह अनेक कंपन्या मराठीत आल्या आहेत. हे केवळ दाखवायचे प्रेम नाही. महाराष्ट्रात रहाणार्‍या आठ कोटी मराठी भाषकांना अव्हेरणे त्यांना शक्य नाही.

वर्तमानपत्रांचा विचार करायचा झाल्यास देशभरातील चौदा प्रमुख वर्तमानपत्रांच्या वाचक सर्वेक्षणाचा आढावा घेतल्यास पाचव्या क्रमांकाला लोकमत आणि चौदाव्या क्रमांकावर सकाळ हे दैनिक आहे. (आधार-रिडरशीप सर्व्हे) याचा अर्थ हिंदी भाषक मोठा प्रदेश असूनही मराठीचा झेंडा फडकतो आहे. याशिवायही बक्कळ प्रमाणात वर्तमानपत्रे नि नियतकालिके आहेत. आता नवीन वर्तमानपत्रेही येऊ घातल्याचे ऐकू येत आहे. हे मराठीच्या सामर्थ्याचेच प्रतीक नाही काय?

मराठीतील प्रकाशन संस्थांची संख्याही लक्षणीय आहे. हिंदी भाषक प्रदेश मोठा असला तरी पुस्तके खपण्याच्या बाबतीत तो प्रांत तितका सुपीक नाही. त्या तुलनेत मराठीत वाचन मोठ्या प्रमाणात होते, शिवाय पुस्तकेही बक्कळ निघतात. त्यांच्या विषयांची व्याप्तीही मोठी आहे. महत्त्वाची बाब म्हणजे अनुवाद, भाषांतर या बाबतीतही मराठी पुस्तके हिंदीच्या पुढे आहेत. इंग्रजी वा अन्य भाषांतील पुस्तकांचे जेवढे अनुवाद मराठीत प्रसिद्ध होतात, तेवढे इतर भाषांतही होत नसावेत. ही पुस्तके खपतात याचा अर्थ याचे मार्केट मोठे आहे. अनेक अमराठी प्रकाशक मराठीत पुस्तक निर्मिती करतात हे कशाचे लक्षण आहे?

मराठी लोकांपर्यंत पोहोचायचे असेल तर त्यांच्या भाषेमार्फत पोहोचले पाहिजे, हे व्यावासायिकांना बरोबर कळते. बहुतांश उत्पादनांच्या जाहिराती आता मराठीतून कराव्या लागल्या आहेत. उत्पादनांची पोस्टर्स होर्डिंग्जही मराठीतून येऊ लागली आहेत. अनेक उत्पादनांची माहितीपत्रके मराठीतून येऊ लागली आहेत. बर्‍याच बॅंकांनी आता आपल्या एटिएमची सेवा मराठीत देऊ केली आहे. बाकीच्यांना आता या दबावामुळे ती द्यावी लागणार आहे. अनेक कंपन्यांच्या कॉल सेंटरवर आता मराठीतून उत्तरे दिली जाऊ लागली आहे. मराठी लोकांची भाषाविषयक जागरूकता गेल्या काही वर्षांतील आंदोलनांमुळे वाढली आहे. त्याचा परिणाम म्हणून हे घडले आहे, यात काही शंका नाही. अनेकदा मराठी भाषक ग्राहकांना हाताळण्यासाठी मराठी बोलता येणार्‍या किंवा जाणार्‍या विक्रेत्याची, अधिकार्‍याची नियुक्तीही आता केली जाऊ लागली आहे, हे मराठी माणसाच्या मार्केटमधील ताकदीचेच यश आहे.

इंटरनेटच्या विश्वात तर मराठी झेंडा डौलाने फडकतो आहे. युनिकोड आल्यापासून तर मराठीची छाती आणखी रूंद झाली आहे. वर्तमानत्रांच्या साईट्स तर मराठीत आहेत, पण त्याशिवायही अनेक नवनवीन मराठी साईट्स सुरू झाल्या आहेत. होत आहेत. मराठी वेबविश्वाची समृद्धता अक्षरशः दीपवणारी आहे. मराठी विकीपेडीयातील लेखांची संख्या पंधरा हजाराच्या पलीकडे गेली आहे. गुगलच्या जवळपास सर्व सेवा मराठीतही आहेत. गुगलच नव्हे तर मायक्रोसॉफ्टपासून ते इतर अनेक कंपन्यांनी आपली सॉफ्टवेअर्स मराठीत आणली आहेत. त्यासाठी कोणतीही आंदोलने करावी लागली नाहीत, हे विशेष. मराठी ब्लॉगविश्व तर वेगाने विस्तारते आहे. एकट्या मराठी ब्लॉगविश्व. कॉमवर नोंदणी झालेल्या ब्लॉगची संख्याच सोळाशेच्या पलीकडे गेली आहे.

सिटी बॅंकेचे अध्यक्ष विक्रम पंडितांपासून अनेक महत्त्वाच्या व्यावसायिक जागांवर मराठी माणसे आसनस्थ आहेत. त्यांचे कर्तृत्व तेजाने झळाळून उठते आहे. ही माणसे मराठी माणसांचे आयकॉन ठरली आहेत. त्यांची मार्केटमधील उंची आपसूक मराठी माणसालाही उंची गाठून देते. त्याचवेळी सामाजिक क्षेत्रातील मराठी माणसांचे कर्तृत्वही त्याच्या वृत्तीचे निदर्शक आहे. म्हणूनच त्यांच्याविषयी इतर भाषकांनाही आदर आहे. प्रकाश आमटेंपासून अभय बंगांपर्यंत मोठ्या उंचीची ही मंडळी माणुसकी कवेत घेणारी असली तरी त्यांचे मराठीपणही कळत नकळत अधोरेखित होत असते हे नाकारूनही चालणार नाही.

एकूण मराठी नि मराठी माणसांच्या सामर्थ्याचा हा धावता आढावा घेतल्यानंतर त्यांना डाऊनमार्केट ठरविण्याची कुणाची छाती होईल असे वाटते काय?