गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र-समीक्षा
Written By

चित्रपट परीक्षण: 7 रोशन व्हिला

7 roshan villa marathi movie review
आपल्याकडे थ्रिलर, हॉरर अन् सायको थ्रिलर असे सिनेमे तसे काहीशे कमीच बनतात अन् बनले तर त्यामधील भीतिदायकपण हा तेवढा प्रभावी असतोच अशातला भाग नाही पण या सगळ्याच्या धूसर सीमारेषेवरचा असणारा हा 7 रोशन व्हिला हा अक्षय दत्तचा सिनेमा पाहताना आपल्याला त्यामधला आवेग अन् त्याला असणारी गती, त्यामधील टिस्ट अँड टर्नसाठी वेगळा वाटतो. मुळात श्रीनिवास भणगे यांच्या कॉटेज नंबर 54 नाटकावर आधारित असणार्‍या या सिनेमामध्ये त्यामधला थरार वेगळा भासतो. 
 
खरं सांगायचं तर गोष्ट वेगळी किंवा तशा पद्धतीची नाही, हे सिनेमा पाहिल्यावर लक्षात येतं पण गोष्टी इतकंच थ्रिलर सिनेमात महत्त्व असतं ते ट्रीटमेण्टला. या सिनेमाच्या गोष्टीला दिलेला टिस्ट अँड टर्न अन् क्लायमॅक्सपर्यंत या सार्‍या गोष्टींमध्ये दिसणारे चेहरे त्यांच्या डोळ्यांमधल्या भावांना दिलेली भावनिक किनार या सगळ्या गोष्टींना एकप्रकारचा दर्प आहे. त्यामधला भ्रम अन् विभ्रमाचा खेळ हा रंगत जातो, पूर्वार्धापेक्षा उत्तरार्धात या सिनेमाच्या अधिक रंगतदार खेळ होतो या सगळ्यात मध्यांतराच्या वेळी येणारा सीन मात्र तुमच्या मनाला चुटपूट लावून जातो. आरंभ अन् धागेदोरेसारखा सिनेमा करणारा अक्षय दत्तचा हा प्रयत्न निश्चित दखल घेण्याजोगा आहे. कारण व्यावसायिक सिनेमांमध्ये यशाचं समीकरण बांधताना थ्रिलर सिनेमांचा उल्लेख होत नाही अन् त्यामुळेच अशाप्रकारचा सिनेमा करण्याच्या प्रयत्नाला स्पेशल ब्राऊनी पॉइण्ट्स द्यायला हवेत. तेजस्विनी पंडितसाठी ऑथर बॅक रोल असला तरी तिने तो खणखणीतपणे वाजवला आहे अन् त्यामुळे या गोष्टीला वजन मिळालं आहे. 
 
या सिनेमात राजस म्हणजे प्रसाद ओक अन् रेणू म्हणजे तेजस्विनी पंडित अन् ते दोघं 7 रोशन व्हिला या त्यांच्या महाबळेश्वरच्या बंगल्यात राहायला जात असल्यापासून एक भास आभासाचा खेळ अनुभवायला लागते ती रेणू. रेणू एका मानसिक विकाराची शिकार आहे, पण तिला होणारे हे भास हे तिथलं वास्तव आहे की आणखी काही यामध्ये तिचा पती राजस तिला या सगळ्यातून सावरण्यासाठी मदत करतोय, पण हे भासचक्र सुरूच आहे अगदी जिच्याकडून हा बंगला विकत घेतलाय, ती फेनीदेखील तिला भेटते ती वेगळ्या रूपात नेमकं हे सारं चक्र आहे तरी काय भय, वास्तव की मनाचे खेळ असणारा हा 7 रोशन व्हिला.