रविवार, 19 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. मंथन
Written By वेबदुनिया|

अहंकार नडला नि मराठा मागे पडला- खेडेकर

'खालच्या जातीत गेल्यामुळे आपल्याला कमी लेखले जाईल. या विचारामुळेच मराठा समाजाने आतापर्यंत कधी आरक्षण मागून घेतले नाही. पण या आधीच्या पिढीचा हा अहंकार किंवा अज्ञान पुढच्या पिढीला नडला आहे. त्यामुळेच या पिढीला आरक्षणाची गरज प्रकर्षाने जाणवत आहे, असे मत मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर यांनी वेबदुनियाशी बोलताना व्यक्त केले.

मराठा समाजाचा समावेश ओबीसीमध्ये करावा आणि त्यांना २५ टक्के आरक्षण द्यावे अशी मागणी मराठा समाजातील सर्व संघटनांच्या तर्फे मुख्यमंत्री विलासराव देशमुखांना भेटून काल करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी त्याचा गांभीर्याने विचार करण्याचे आश्वासन दिले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात कायम सत्तेत असणारा, शिक्षणासह महत्त्वाची क्षेत्रे ताब्यात ठेवणार्‍या या समाजाला आरक्षणाची गरज का भासावी हे जाणून घेण्यासाठी श्री. खेडेकर यांच्याशी चर्चा केली. आरक्षणाच्या समर्थनार्थ त्यांनी अनेक मुद्दे मांडले. त्यांच्याशी नितिन फलटणकयांनी केलेली ही बातचीत...

प्रश्न: आतापर्यंत मराठा समाजाचेच नेतृत्व महाराष्ट्राला लाभले होते, मनोहर जोशी वगळता बहुतांश मुख्यमंत्री हे मराठाच होते. तरीही मराठा समाजाचा विकास झाला नाही?
खेडेकर: हे खरं आहे. आतापर्यंत राज्यात मराठा समाजाचेच नेतृत्व होते. किंबहुना स्वतंत्र्य महाराष्ट्रानंतर मराठा समाजालाच हा बहुमान मिळाला. परंतु मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेल्या कोणत्याही मराठा नेत्याने कधीही केवळ समाजाचा विचार केला नाही. त्या नेत्याने महाराष्ट्राचाच विचार केल्याने त्याने कधी समाजाला आपण आरक्षण मिळवून द्यावे यासाठी प्रयत्न केले नाही. आणि परिणामी मराठा समाजाची आरक्षणाची मागणी ही कालबाह्य होत गेली.

प्रश्न: मराठ्यांना आता आरक्षणाची गरज का भासत आहे?
खेडेकर: आतापर्यंत केवळ अज्ञान म्हणा किंवा अहंकार. मराठा समाजाने आरक्षणाकडे दुर्लक्ष केले. आपण आरक्षण मागितले तर तो आपला कमीपणा ठरेल असे मत काहींचे होते. यामुळे आरक्षणाचा प्रश्न मागे पडत राहिला. आज घडीला इतर समाजातील मुलांनी आपली प्रगती करून घेतली आहे. अनेक जण परदेशात आहेत, मराठ्यांची पोरं मात्र आजही गुरं- ढोरं राखताहेत. हे झालं ते केवळ आरक्षण नसल्यामुळे. आता पुढच्या पिढीला आरक्षणाची गरज भासत आहे. त्यांना त्यांच्या प्रगतीसाठी आरक्षणाचा आधार हवा आहे, हा त्यांचा हक्क आहे, तो त्यांना मिळत असेल तर त्यात वाईट ते काय?

प्रश्न: आगामी काळातील निवडणुकांना डोळ्यांपुढे ठेवून या प्रश्नाचे राजकारण करण्यात येत आहे का?
खेडेकर: नाही. असं म्हणणे चुकीचे ठरेल. हा राजकारणाचा प्रश्न नाही. हा समाजाचा प्रश्न आहे. एका विशिष्ट समाजाला आतापर्यंत आरक्षण देण्याचे टाळले गेले. आता ते मिळत आहे यात राजकारण आलेच कुठे? निवडणुकांचे म्हणाल तर आपला देश लोकशाही प्रधान असल्याने आपल्या देशात 12 महिने निवडणुका असतात, मग कोणताच प्रश्न काढायचा नाही का? निवडणुकांना अजून अवकाश आहे. आणि तोपर्यंत या प्रश्नाचे उत्तर जनतेकडेच असेल.

प्रश्न: आरक्षण मंजूर झाले तर फायदा काय?
खेडेकर: फायदा काय म्हणजे? आतापर्यंत आरक्षण न मिळाल्याने जे नुकसान झालेय ते तरी भरून निघेल. आरक्षण मिळाल्याने मराठा समाजाचा दर्जा सुधारेल. त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल. शिक्षण क्षेत्रात आजही मराठ्यांची वाईट परिस्थिती आहे.

प्रश्न: पण राज्यातील बहुतांश शिक्षण संस्थाही मराठ्यांच्याच ताब्यात आहेत ना?
खेडेकर: आहे, पण फायदा काय? मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे मराठा समाजाने स्वतः:चा विचार कधीही केला नाही. त्यामुळे अजूनही शिक्षणातही मराठे मागेच आहेत. आरक्षणानंतर त्यांना त्यांचा अधिकार तरी मिळेल.

प्रश्न: मराठा समाजाला चांगले नेतृत्व मिळत गेले. परंतु अजूनही विकास का झाला नाही?
खेडेकर: त्याला कारणही मराठा समाजच आहे. मराठा चळवळ काळाच्या ओघात मागे पडल्याने मराठ्यांना आरक्षणाच्या मुद्द्याचा विसर पडला होता. आता त्यांना त्याची जाणीव झाली आहे. आणि आरक्षण त्यांना मिळालेच पाहिजे.

आरक्षणासाठी मराठा जात बदलणार नाही- शालिनीताई पाटील