मेटे म्हणतात, ब्राह्मणांनाही आरक्षण द्या  
					
										
                                          किरण जोशी
                                       
                  
				  				   
				   
                  				  				  													
						
																							
									   प्रचलित आरक्षण पद्धतीला धक्का न लावता मराठा समाजातील दुर्बलांना आरक्षण देण्याची आमची मागणी असली तरी  ब्राह्मण, मुस्लिम व इतर समाजातील दुर्बलांना आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही, असे मराठा समन्वय समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी 'वेबदुनिया'शी बोलताना स्पष्ट केले. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर शिवसेना नेते बाळासाहेब ठाकरे यांची सावध भूमिका संशयास्पद असून आर्थिक निकषावर आरक्षण मागण्याचा आमदार शालिनीताई पाटील यांचा मुद्दा  मुर्खपणाचा म्हणावा लागेल, अशी टीका त्यांनी केली. ब्राह्मणांसह इतर काही जातींना आरक्षण द्यायला विरोध नाही, असे म्हणणारे मेटे मराठा समाजाच्या आरक्षणावर कमालीचे आक्रमक झाले आहेत. आरक्षण देण्यास कोणी विरोध केल्यास त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल असा इशारा त्यांनी दिला. ते म्हणाले, मराठ्यांनी मनगटाच्या ताकदीवर आणि तलवारीच्या जोरावर अटकेपार झेंडे गाडले आहेत. याला इतिहास साक्षीदार आहे. पण, कर्तृत्व, बुद्धिमत्ता असूनही केवळ संधी नाही म्हणून या समाजाची अधोगती झाली आहे. हा समाज पुढारलेला असल्याचे वरकरणी दिसत असले तरी त्यातही दुर्बल घटक आहेत. त्यांच्या अधोगतीला प्रचलित आरक्षणप्रणाली कारणीभूत आहे. ही पद्धत मोडीत काढायचे धाडस कोणत्याही राज्यकर्त्यामध्ये नाही, हे सत्य आहे. म्हणूनच मराठा समाजाला आरक्षण द्यायला हवे ही आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचवेळी आम्हाला आरक्षण म्हणजे मागासवर्गीयांचे आरक्षण काढावे असा अर्थ नसल्याचेही सांगून मराठा समाजाबरोबरच ब्राह्मण, मुस्लिम व उर्वरित इतर समाजातील दुर्बल घटकांना आरक्षण दिल्यास आम्ही स्वागतच करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.आताच आरक्षण का? पूर्वी या समाजाकडे शेतीचे प्रमाण अधिक होते. समाजातील 75 टक्के लोक शेती करायचे. शेतीतून चांगले उत्पन्न मिळत असे. पण, शेतीचे प्रमाण कमी झाले, वाढती महागाई, नैसर्गिक आपत्नीमुळे शेतकरी कर्जबाजारी झाला. शेतक-यांच्या आत्महत्या पाहिल्या तर मराठा समाजातील शेतकरी अधिक आहेत हे लक्षात येईल. त्यात शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे समाज मागे राहिला. म्हणूनच या समाजाला आरक्षण हवे अशी मराठा आरक्षणाची कारणमीमांसा त्यांनी केली.  हे मताचे राजकारण नाही मेटे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आहेत. पण आरक्षणाच्या मुद्यावर आपण मराठा समाजाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केवळ मतांचे राजकारण करायचे असते तर केवळ राष्ट्रवादीनेच हा मुद्दा मांडला असता. मात्र, या मुद्यावर सर्वच पक्षांना पाठिंब्याचे आवाहन केले आहे आणि सर्वच पक्षांनी या मागणीला पाठिंबा दिला आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.  मराठा समाज पाठीशीरायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन मराठा आरक्षण यात्रेची सुरुवात झाली आहे. गावोगावी सभा होत आहेत. या सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. समाजातील तरुण रस्त्यावर उतरत आहेत, अशी माहिती देऊन या मुद्यावरून समाजात मतभेद अजिबात नसल्याचे त्यांनी सांगितले. बाळासाहेबांची भूमिका संशयास्पदआरक्षणाच्या मुद्यावर भूमिका घेण्यास शिवसेना चालढकल करत आहे. बाळासाहेब ठाकरे यांनीच गरीबांसाठी बंड केले होते पण, त्यांनाच ते पाठिंबा देत नाहीत ही भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप त्यांनी केला. त्याचवेळी आरक्षण रद्द करून आर्थिक निकषावर आरक्षण देण्याच्या आमदार शालिनीताई पाटील यांच्या मागणीची संभावना मुर्खपणात करून त्यासाठी घटना बदलावी लागेल, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. .. 
तर परिणाम भोगामराठा समाजावर आतापर्यंत अन्याय झाला आहे. यापुढे तो आम्ही सहन करणार नाही. या प्रश्नी समाजाच्या भावना संतप्त आहेत. त्यामुळे आरक्षणाविरोधात व पर्यायाने समाजाच्या प्रगतीविरोधात जाण्याचा प्रयत्न शासन, राजकीय पक्ष अथवा कोणीही करत असेल तर त्यांना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.