Koregaon Park Land Scam मुख्य आरोपी शीतल तेजवानीला अखेर अटक
पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून समोर आलेल्या शीतल तेजवानीला पुणे पोलिसांनी अखेर अटक केली आहे. हा गैरव्यवहार कोरेगाव पार्क परिसराजवळ ४० एकर शासकीय जमिनीशी संबंधित आहे. अशी माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शीतल तेजवानीला बुधवार, ३ डिसेंबर २०२५ रोजी अटक केली. शीतल तेजवानीवर आरोप आहे की, शासनाचे कोणतेही आदेश नसताना जमिनीचे मूळ वतनदार आणि वारसदार यांच्याकडून कागदपत्रे तयार करून शासनाची जमीन परस्पर विक्री करणे आणि फसवणूक करणे.
तेजवानीने मुंढवा येथील जमिनीचा ७/१२ बंद असतानाही व्यवहाराच्या वेळी तो जोडल्याचे पोलिस तपासातून निष्पन्न झाले आहे. तिच्याविरोधात खडक पोलीस ठाण्यात आणि बावधन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे. तसेच या जमीन व्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्याशी संबंधित असलेली 'अमेडिया' (Amedia Enterprises) कंपनी सहभागी असल्याचा आरोप आहे. अमेडिया कंपनीने ही जमीन खरेदी केली होती. तसेच अटकेपूर्वी शीतल तेजवानीने तिच्यावरील गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ती आता पोलीस कोठडीत असून, या प्रकरणाच्या तपासात आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रकरणाचा थोडक्यात आढावा
कोरेगाव पार्क येथील सुमारे ४० एकर शासकीय महार वतन जमीन बनावट कागदपत्रे आणि पॉवर ऑफ अॅटर्नीचा वापर करून अमेडिया एंटरप्रायझेस कंपनीला विकली गेली. या जमिनीचं बाजारमूल्य १८०० कोटी रुपये असताना ती केवळ ३०० कोटी रुपयांत विकली गेली. शीतल तेजवानीने २७२ वतनदारांकडून कुलमुखत्यारपत्र गोळा करून शासनाच्या परवानगीशिवाय बनावट दस्तऐवज तयार केले. यातून मुद्रांक शुल्कात सवलत मिळवली आणि शासनाची फसवणूक केली. ती या प्रकरणाची मास्टरमाईंड मानली जाते. तसेच अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील, निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले आणि दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांचाही सहभाग. पार्थ पवार हे कंपनीचे संचालक असल्याने राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहे.
तेजवानीची याआधी दोन-तीन वेळा चौकशी झाली होती, पण ती फरार असल्याचा संशय होता. तिचा फोन बंद होता आणि देशाबाहेर पळून जाण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा होती. अटकेच्या वेळी तिच्याकडून ३०० कोटींच्या व्यवहारातील कागदपत्रे जप्त करण्यात आली. आता तिच्या ताब्यातील इतर मालमत्ता तपासण्यात येत आहे.
पोलिसांनी सांगितले की, तपासात तिचा थेट सहभाग स्पष्ट झाला असून, आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे. अशी माहिती समोर आली आहे.
Edited By- Dhanashri Naik