शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 5 डिसेंबर 2019 (15:39 IST)

भाजपला आता बसणार धक्का बारा आमदार पक्ष सोडणार अशी चर्चा

विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीला पराभूत करायला माजी मुख्यमंत्री भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी पक्षात इतर पक्षातून मोठ्या प्रमाणात  मेगाभरती केली होती. त्याचा फायदा देखील पक्षाला झाला आणि १०० पेक्षा अधिक जागा निवडणून येत भाजपा सर्वात मोठा पक्ष बनला होता. मात्र आता याच मेगाभरतीचं भाजपवर बुमरँग होण्याची शक्यता दिसत आहे. आता भाजपचे १२ विद्यमान आमदार आणि एक राज्यसभा खासदार सत्ताधारी महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
 
या विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केलेले नेते पुन्हा पक्षात परतण्याच्या तयारीत आहेत. इतकच नाही तर भाजपामधील काही नाराज नेतेही इतर पक्षात जाण्याच्या तयारीत आहेत. या १२ आमदारांबरोबरच राज्यसभेतील एका खासदारानेही राजीनामा देऊन महाविकास आघाडीबरोबर येत पोटनिवडणुक लढवण्याची इच्छा दर्शवली आहे. या आगोदर शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील अनेक नेते भाजपात येणार असे म्हंटले होते. जेव्हा विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपाला विरोध करणाऱ्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या अनेक आमदारांना सरकारी निर्णयांचा फटका बसला होता. यापैकी अनेक आमदार हे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमधील शिक्षण सम्राट तसेच साखर कारखाना श्रेत्राशी संबंधित होते.
 
कोणते आमदार पक्ष सोडणार?
भाजपचे जे आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत अशी चर्चा आहे, त्यात मराठवाड्यातील ३, पश्चिम महाराष्ट्रातील ५ आमदारांचा समावेश आहे. सोबतच आणखी ४ आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा आहे. या आमदारांची स्वत:च्या पदाचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला जाण्याचीही तयारी दर्शवली आहे. राजीनामे देऊन पुन्हा निवडणूक लढण्याची तयारी असलेल्या आमदारांविषयी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसच्या नेतृत्वाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. भाजपचा नाराज राज्यसभा खासदार कोण, अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे. त्यामुळे जर असे झाले तर भाजपाला मोठे राजकीय नुकसान होण्याची शक्यता आहे.